Jump to content

अकार्बनी रसायनशास्त्र

अकार्बनी रसायनशास्त्र ही रसायनशास्त्रातील एक उपशाखा आहे. हिच्यात खनिज पदार्थांतील रसायने, मूलद्रव्ये आणि अजैविक संयुगे यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये आवर्त सारणी मधील सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास केला जातो. कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व अजैविक रसायनांविषयीच्या शास्त्रास अकार्बनी किंवा अजैविक रसायनशास्त्र असे नाव दिले जाते.

ज्यांच्यात कार्बन हा घटक नाही अशा सर्व द्रव्यांचा विचार अकार्बनी रसायनशास्त्रात केला जातो. तथापि कार्बन असणाऱ्या काही संयुगांचा, उदा., कार्बोनेटे, सायनाइडे व कार्बन डाय-ऑक्साइडसारखी काही संयुगे यांचा समावेश अकार्बनी रसायनशास्त्रात करण्याचा प्रघात आहे.

रसायनशास्त्राचा एक विभाग. आधुनिक रसायनशास्त्राच्या अध्ययनाच्या प्रारंभीच्या काळात खनिज पदार्थांतील रसायनांसंबंधी बरेच अध्ययन झाले होते व प्रयोगशाळेत ती रसायने तयार करता येत असत परंतु प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जैव क्रियांनी (शरीरात होणाऱ्या क्रियांनी) तयार होणारी रसायने प्रयोगशाळेत करता येत नसत. जैव क्रियांनी तयार झालेल्या रसायनांना खनिज रसायनांचे नियम लागू पडत नाहीत अशी समजूत होती.

म्हणून रसायनशास्त्राचे जैव (सजीव-ऑर्‌गॅनिक) व अजैव (निर्जीव, खनिज इन-ऑर्‌गॅनिक) असे विभाग करण्यात आले. परंतु पुढ जैव रसायनेही प्रयोगशाळेत तयार करता येऊ लागली व अजैव (खनिज) आणि जैव रसायनांना सारखेच नियम लागू पडतात असे कळत आले. त्यामुळे सैद्धांतिक दृष्ट्या रसायनशास्त्राचे जैव व अजैव असे विभाग करता येत नाहीत. जैव रसायनशास्त्र आणि अजैव रसायनशास्त्र असे काटेकोर विभाग नसले तरी सोयीसाठी ते तसेच ठेवलेले आहेत.

जवळजवळ सर्व जैव रसायनांचा मुख्य घटक कार्बन असतो म्हणून त्यांना कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व अजैव रसायनांविषयीच्या शास्त्रास अकार्बनी रसायनशास्त्र या संज्ञा येथे वापरल्या आहेत.

[]
  1. ^ 1.Marathi Vishwakosh - khand 1