Jump to content

अकबर इलाहाबादी

सय्यद अकबर हुसैन रिझवी तथा अकबर इलाहाबादी (१६ नोव्हेंबर, इ.स. १८४६,:बारा, अलाहाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत; इ.स. १९२१:अलाहाबाद) हे एक उर्दू कवी होते.

त्यांच्या वडिलांचे नाव सय्यद तफज्ज़ल हुसैन होते. अकबर इलाहाबादी यांना घरच्या गरीब परिस्थितीमुळे फक्त एक वर्ष शाळेत जायला मिळाले. पुढील शिक्षण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले. इ.स. १८६६मध्ये ते मुलकी परीक्षा पास होउन नायब तहसीलदार झाले; १८०७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात कोर्टाचे कागद सांभाळण्याचे काम करू लागले. इ.स. १८७२मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढे त्यांनी १८८० सालापर्यंत वकिली केली. इ.स. १८८८मध्ये सब जज होऊन, ते शेवटी जिल्हा न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले.

हास्यकवी

अकबर इलाहाबादी यांचा स्वभावच विनोदी होता. लोकांमध्ये मिळूनमिसळून राहण्याची त्यांची प्रवृत्ती होती. लहानपणापासूनच त्यांना कविता करण्याचा नाद होता. इलाहाबादींना फ़ारसी, अरबी आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान होते. सुरुवातला ते आपल्या कविता ख़ाजा हैदर अली आतिशांचे शिष्य गुलाम हुसैन वाहीद यांना दाखवत असत. अकबर इलाहाबादी हे पौर्वात्य संस्कृतीचे पुरस्कर्ते व पाश्चिमात्य संस्कृतीचे टीकाकार होते. हिंदुस्तानातल्या इंग्रज सरकारवर ते औपरोधिक कवितांमधून टीका करत. इंग्रजांचे पेन्शनर असल्याने, इलाहाबादी नेहमीच सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. परंतु पहिल्या महायुद्धाच्या वेळी व कानपूरमधल्या मशिदीवरून उसळलेल्या दंग्यावरून त्यांनी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नव्हती.

लोकप्रिय गझल

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गातात ती 'हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पी ली है, डाका तो नही डाला, चोरी तो नही की है' ही गझल अकबर इलाहाबादींची आहे.

शेवट

पत्‍नी आणि मुलाच्या अकाली निधनामुळे अकबर इलाहाबादी फार उदास असत. पुढे त्यांना स्वतःलाच आजार जडला आणि त्यातून बरे न होता आल्याने ते सप्टेंबर १९२१मध्ये मरण पावले.

सन्मान आणि पुरस्कार

  • अकबर इलाहाबादी हे अलाहाबाद विद्यापीठाचे फेलो होते.
  • सरकारने त्यांना खान बहादुर हा किताब दिला होता.