अंबाझरी तलाव
अंबाझरी तलाव नागपूर शहरात असून तो शहराच्या पश्चिम भागात आहे. नागपूर शहरातल्या सुमारे ११ तलावांपैकी हा एक तलाव आहे. नागपुरातून वाहणारी नाग नदी या तलावातून उगम पावते.
या तलावाचे पूर्वीचे नाव 'बिंबाझरी' असे होते. नागपूरच्या गोंड राजाच्या शासनादरम्यान या तलावाची निर्मिती झाली. त्यासाठी, नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. उत्तर भारतातून नागपुरात या कामासाठी आलेल्या 'कोहळी' समाजाच्या लोकांनी हा तलाव निर्माण केला. भोसले घराण्याच्या शासनकाळात या तलावात सुधारणा केल्या गेल्या. नंतर सन १८६९ या साली पडलेल्या दुष्काळामुळे तलावाच्या बांधकामात अनेक बदल करण्यात आले. या तलावाची उंची १७ फुटाने व क्षमता तिपटीने वाढविण्यात आली. सन १८७० साली नागपुरात म्युनिसिपालिटी आली. तिने एक प्राथमिक कार्य म्हणून, शहरात या तलावातून घरोघरी पाणीपुरवठ्यासाठी नळयोजना अंमलात आणली. [२] सन १८७० मध्ये भोसल्यांच्या काळात, मातीचे धरण बांधून निर्माण केलेल्या या कृत्रिम तलावातून त्याकाळचे सरदार, अधिकारीवर्ग इत्यादींना खापराच्या(माती भाजून तयार केलेल्या) नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. या तलावासभोवताली आंब्याची झाडे होती म्हणून यास अंबाझरी हे नाव पडले, असे म्हणतात. या तलावाने पूर्वी सलग सुमारे ३० वर्षे नागपूर शहरास पाणीपुरवठा केला आहे. यातील पाणी सध्या प्रदूषित झाल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यानंतर, शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे व पाण्याचे इतर स्रोत उपलब्ध झाल्यामुळे या तलावातून पाणीपुरवठा करणे बंद झाले. मात्र, येथून जवळच असलेल्या हिंगणा औद्योगिक परिसरास या तलावातील पाणी अजूनही पुरविले जाते.
या तलावाशेजारीच एक उद्यान आहे. त्याचे नाव अंबाझरी बगीचा. या बगिच्यात विविध प्रकारची झाडे आहेत. येथे पूर्वी तलावात बोटिंगची सोय होती. हे उद्यान सुमारे १८ एकर जागेत आहे..[३]