अंजली कऱ्हाडकर
अंजली कऱ्हाडकर, माहेरच्या अंजली परांजपे ( १६ डिसेंबर, इ.स. १९६१) या एक मराठी कवयित्री, लेखिका, कीर्तनकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या केंब्रिज विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त नाट्य प्रशिक्षकही आहेत. त्यांच्या दिवंगत आईचे नाव मंगला परांजपे.
अंजली कऱ्हाडकर यांना २५व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत 'लेकुरे उदंड झाली' (हिंदी-मराठी) आणि 'सूर्याची पिल्ले' या नाटकांतील भूमिकासाठी ३ रजत पदके मिळाली होती.
तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या अंजली कऱ्हाडकर वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनयाने, लेखनाने व दिग्दर्शनाने रंगभूमीशी जोडल्या गेल्या आहेत. नव्या पिढीपर्यंत उत्तम साहित्य व चांगल्या कलाकृती पोहोचाव्यात या उद्देशाने त्या शिवमंगल स्वरनाट्यधारा हा उपक्रम चालवतात. त्यांची पुणे जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये कलापिनी नावाची नाट्यसंस्था आहे.
अंजली कऱ्हाडकर या संगीत विषय घेऊन एम.ए. झाल्या असून पुण्यात एस.एन.डी.टी. कॉलेजात संगीत शिकवतात. पुण्यातल्याच सिंबायोसिस इंटनॅशनल स्कूलमध्ये त्या नाट्यशिक्षक आहेत.
कऱ्हाडकर करीत असलेले नाट्यप्रयोग
- अनंत युगाची जननी (अंजली कऱ्हाडकर यांचा एकपात्री नाट्य प्रयोग)
- एका नाटकाचा मृत्यू (प्रायोगिक नाटक, लेखक - महेश एलकुंचवार, दिग्दर्शक - अंजली कऱ्हाडकर)
- कथा ही बिलासखानी तोडीची (संगीत नाटक, निर्मात्या - अंजली कऱ्हाडकर). मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये झालेल्या ३ दिवसांच्या मराठी संगीत नाटक महोत्सवात २७-२-२०१३ रोजी हा नाट्यप्रयोग झाला होता.
- छू मंतर (एकांकिका, लेखक - वसंत कानिटकर)
- 'जननी' या विषयावरील आईची विविध रूपे आपल्या अभिनयाने सादर करणारा एकपात्री नाट्यप्रयोग. या प्रयोगात अंजली कऱ्हाडकर 'अखेरचा सवाल' या नाटकातील अखेरच्या घटका मोजणाऱ्या कॅन्सरग्रस्त नंदूची आई, बहिणाबाईची माहेरवाशीण, राजमाता जिजाबाई, 'लेकुरे उदंड झाली' नाटकातील मधुराणी, 'वीज म्हणाली धरतीला'मधील झाशीची राणी, सुधा मूर्तीच्या कथेतील शिक्षिका गौरम्मा, 'हिमालयाची सावली'मधील बायो कर्वे यांचा अभिनय सादर करतात.
- पुलंचे ’पौष्टिक जीवन (अंजली कऱ्हाडकर यांची भूमिका असलेला व २०१० साली परांजपे संमेलनात सादर केलेला नाट्यप्रयोग)
- राणीला लागले खूळ (बालनाट्य; अंजली कऱ्हाडकर यांचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन; गीते शांता शेळके आणि अंजली कऱ्हाडकर); १ल्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत या बालनाट्याला २रे पारितोषिक मिळाले होते.