Jump to content

ॲडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर)

ॲडमिरल ग्राफ स्पीचे १९३६ मधील छायाचित्र

ॲडमिरल ग्राफ स्पी ही जर्मनीची डॉइचलांड वर्गाची क्रुझर होती. ही लढाऊ नौका राइक्समरीनच्या तीन अशा क्रुझरांपैकी एक होती.

हीची बांधणी ऑक्टोबर १९३२ ते जानेवारी १९३६ दरम्यान विल्हेमहाफेन येथील राइक्समरीनवेर्फ्टमध्ये झाली. १०,००० लॉंगटनाची रचना असलेल्या या नौकेचे अखेरचे वजन १६,०२० लॉंगटन भरले. ग्राफ स्पीला ताशी २८ नॉट (५२ किमी, ३२ मैल) इतका वेग होता व त्याकाळच्या बहुतांश लढाऊ नौकांना ग्राफ स्पीला गाठणे शक्य नव्हते. त्यावर ११ इंची व्यासाच्या सहा तोफा प्रत्येकी तीनच्या समूहात बसविण्यात आल्या होत्या. एखाद्या जलद नौकेने ग्राफ स्पीला गाठलेच तर या प्रचंड तोफा तिचे बारा वाजविण्याचे काम चोख करीत.

ग्राफ स्पीने स्पॅनिश यादवीमध्ये पाच गस्ती घातल्या तसेच मे १९३७ मध्ये इंग्लंडचा राजा सहाव्या जॉर्जच्या राज्याभिषेकास ती हजर होती. दुसरे महायुद्ध सुरू होताना तिला दक्षिण अटलांटिक महासागरात व्यापारी जहाजांच्या मागावर पाठविण्यात आले होते. सप्टेंबर आणि डिसेंबर १९३९ दरम्यान ग्राफ स्पीने ५०,०८९ टन वजनाच्या नऊ जहाजांना जलसमाधी दिली. त्यानंतर ब्रिटिश क्रुझरांनी तिला गाठले. त्यांच्याशी झुंज देताना ग्राफ स्पीचे मोठे नुकसान झाले व तिने उरुग्वेचे मॉंटेव्हिडियो बंदर गाठले. तटस्थ बंदरात शिरून ब्रिटिशांनी ग्राफ स्पीवर हल्ला चढविला नाही परंतु त्यांनी बंदराबाहेर ठिय्या देउन ग्राफ स्पीचा रस्ता रोखून धरला. दरम्यान ब्रिटिशांचा मोठा तांडा मॉंटेव्हिडियोजवळ चालून येत असल्याची आवई उठलेली होती. यावर विश्वास ठेवून ग्राफ स्पीच्या कॅप्टन हान्स लॅंगडॉर्फने मॉंटेव्हिडियो बंदराच्या मुखात आपल्या नौकेला समाधी दिली.

या नौकेला ॲडमिरल मॅक्सिमिलयन फोन स्पीचे नाव देण्यात आले होते.