Jump to content

२२ जून १८९७ (चित्रपट)

२२ जून १८९७
दिग्दर्शन जयू पटवर्धन, नचिकेत पटवर्धन
निर्मितीनचिकेत पटवर्धन
कथा नचिकेत पटवर्धन
पटकथाशंकर नाग, नचिकेत पटवर्धन
प्रमुख कलाकार
संवादविजय तेंडुलकर
संकलन मधु सिन्हा
छाया नवरोज काँट्रॉक्टर
कला जयू पटवर्धन
संगीतआनंद मोडक
ध्वनी विनय श्रीवास्तव
वेशभूषा जयू पटवर्धन
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित ९ फेब्रुवारी १९७९
अवधी १२१ मिनिटे
पुरस्कारराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
आय.एम.डी.बी. वरील पान


२२ जून १८९७ हा एक इ.स. १९७९ मधील मराठी चित्रपट आहे. याची कथा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन यांनी लिहिली असून जयू पटवर्धन आणि नचिकेत पटवर्धन या पती-पत्नीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट चाफेकर बंधू द्वारे ब्रिटिश सरकारी अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड आणि 'चार्ल्स एगर्टन आयर्स्ट' यांच्या हत्येच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटाचा समावेश 'वन हंड्रेड इंडियन फीचर फिल्म्स: एन एनोटेड फिल्मोग्राफी' या पुस्तकात करण्यात आला आहे, जो पहिल्या भारतीय टॉकीजपासून ते तत्कालीन (१९८८) पर्यंतची प्रातिनिधीक निवड आहे.[] या चित्रपटाचे शीर्षक २२ जून १८९७ ही ब्रिटिश अधिकारी रँडच्या हत्येची तारीख आहे.

या चित्रपटाने इ.स. १९८० मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील 'रौप्य कमळ पुरस्कार' जिंकला होता. हा पुरस्कार दोन श्रेणींमध्ये म्हणजे, 'राष्ट्रीय एकात्मता' आणि 'कला दिग्दर्शनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट' यात मिळाला होता. या चित्रपटाने 'वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट' आणि 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी' १९८०चा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील जिंकला होता. 'यूएस लायब्ररी ऑफ काँग्रेस'मध्ये भारतीय चित्रपट आणि व्हिडिओंच्या निवडक संग्रहात या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटातील बहुतेक कलाकार हे पुण्यातील थिएटर अकादमीचे होते.[]

कथानक

फेब्रुवारी १८९७ मध्ये पुणे शहरात बुबोनिक प्लेगची साथ पसरली होती. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँडला पुण्याचे 'सहाय्यक जिल्हाधिकारी' आणि 'स्पेशल प्लेग कमिटीचे अध्यक्ष' असे पद देण्यात आले. त्यांनी यशस्वीपणे या महामारीला आटोक्यात आणले होते. परंतु लोकांना तेथून बाहेर काढण्याच्या, त्यांची घरे धुऊन काढण्याच्या, महिलांना भ्रष्ट करण्याच्या आणि दूषित वस्तू जाळण्याच्या त्याच्या पद्धतींमुळे समाजातील काही घटकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. २२ जून १८९७ रोजी राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाचा हीरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा करणारी पार्टी होती. तेथून रँड आणि ब्रिटिश लष्करी अधिकारी लेफ्टनंट 'चार्ल्स एगर्टन आयर्स्ट' यांची पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर सरकारी घरातून परत येत असताना हत्या करण्यात आली.

क्लायमॅक्स सीन म्हणजे मध्यरात्री पार्टी संपल्यानंतर इंग्रजी अधिकाऱ्यांच्या गाड्या गव्हर्नमेंट हाऊसच्या बाहेर जाऊ लागल्या. हत्या करणाऱ्यांच्या गटातील दामोदरने गेटच्या बाहेरून रँडच्या गाडीला पाहिले. रँड बाहेर येताच त्याने सिग्नल दिला, दुसरा मुलगा गाडीसोबत पळू लागला. बाळकृष्ण आणि इतर लोक जिथे थांबले होते तिथे गाडी पोहोचताच दामोदरने हाक मारली, 'गोंद्या आला रे!'. बाळकृष्णने गाडीवर उडी मारली आणि त्या व्यक्तीवर गोळी झाडली. पण त्यात एक चूक झाली, रँड समजून आयर्स्टला दामोदरने मारले होते. त्यांना त्यांची चूक कळली. रँडची गाडी घटनास्थळी आल्यावर दामोदरने त्यावर चढून रँडवर गोळी झाडली. आयर्स्ट जागीच ठार झाला आणि रँडचा ३ जुलै १८९७ रोजी रुग्णालयात मृत्यू झाला.

दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मचरित्र

दामोदर हरी चाफेकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात आणि चित्रपटात थोडा फरक आहे. आपल्या आत्मचरित्रात, दामोदर यांनी असे लिहिले की त्यांचा विश्वास होता की व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचा हीरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा करणाऱ्या पार्टीत सर्व श्रेणीतील युरोपीय लोक गव्हर्नमेंट हाऊसमध्ये जमा होतील आणि यामुळे त्यांना रँडला मारणे सोपे जाईल. दामोदर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या भावांनी गणेशखिंड रस्त्यावरील पिवळ्या बंगल्याच्या बाजूला रँडवर गोळ्या घालण्यासाठी एक योग्य जागा निवडली. प्रत्येकजण तलवार आणि पिस्तूल घेऊन सज्ज होता. याशिवाय बाळकृष्णाने एक छोटी कुऱ्हाड देखील घेतली होती. ते गणेशखिंडीवर पोहोचले. त्यांनी रँडची गाडी जवळून जाताना पाहिली, पण परत येताना त्याच्यावर हल्ला करण्याचे ठरवून त्यांनी गाडी जाऊ दिली. संध्याकाळी ७:००-७:३० वाजता ते शासकीय निवासस्थानावर पोहोचले, अंधार पडू लागला होता. शासकीय निवासस्थानात हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते, टेकड्यांवर शेकोट्या पेटल्या होत्या. त्यांनी बाळगलेल्या तलवारी आणि कुऱ्हाडीमुळे संशय येऊ शकतो, म्हणून त्यांनी तलवारी आणि कुऱ्हाड बंगल्याजवळील एका दगडी पुळ्याखाली ठेवल्या, जेणेकरून योग्य वेळी परत घेता येतील. ठरल्याप्रमाणे, दामोदर गव्हर्नमेंट हाऊसच्या गेटवर थांबले आणि रँडची गाडी बाहेर येताच त्याच्या मागे १०-१५ पावले वेगाने धावले. गाडी पिवळ्या बंगल्यात पोहोचताच दामोदरने वेगाने अंतर कापले आणि बाळकृष्णाला सांकेतिक शब्द "गोंद्या" अशी साद घातली. दामोदरने गाडीचा फ्लॅप उघडून अगदी जवळून गोळीबार केला. रँड जिवंत राहणार नाही याची खात्री करण्यासाठी दोघेही रँडवर गोळीबार करतील अशी मूळ योजना होती, तथापि, बाळकृष्ण मागे पडले आणि रँडची गाडी पुढे सरकली. गाडीत कुणीतरी कुजबुजताना ऐकून त्याला पण गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यात आयर्स्टचा मृत्यू झाला.[][]

श्रेय

चित्रपटाचे श्रेय खालीलप्रमाणे आहेत:[][]

  • कथा : नचिकेत पटवर्धन
  • पटकथा : शंकर नाग , नचिकेत पटवर्धन
  • संवाद : विजय तेंडुलकर
  • उत्पादन संघ :
    • सदानंद बोरसे
    • दिलीप लिमये
    • गंगाराम
    • मकरंद मोरे
    • प्रसाद पुरंदरे
  • सहाय्यक :
    • रेखा सबनीस (स्क्रिप्ट, सातत्य)
    • दिनेश मेहता (कॅमेरा)
    • काळशीकर (ध्वनी)
    • कारेकर (मेक-अप, पोशाख)
    • इस्लाम (संपादन)
    • भालेकर (उपकरणे)
  • साउंड रेकॉर्डिस्ट : विनय श्रीवास्तव
  • संगीत दिग्दर्शक : आनंद मोडक
  • संपादक : मधु सिन्हा
  • कला दिग्दर्शन : जयू पटवर्धन
  • वेशभूषा : जयू पटवर्धन
  • कॅमेरामन : नवरोज कॉन्ट्रॅक्टर
  • दिग्दर्शन : नचिकेत पटवर्धन आणि जयू पटवर्धन

पात्र

चित्रपटातील बहुतेक कलाकार पुणे थिएटर अकादमीचे विद्यार्थी होते. या चित्रपटातील कलाकारांची नावे खालीलप्रमाणे आहेत :[][][]

  • दामोदर चापेकर : प्रभाकर पाटणकर
  • वासुदेव चापेकर : उदयन दीक्षित
  • बाळकृष्ण चापेकर : रवींद्र मंकणी
  • हरी विनायक चापेकर : वासुदेव पालांडे
  • द्वारका हरी चापेकर : शांता दत्तात्रेय जोग
  • सून : अरुंधती नाग, सुजल वाटवे, दिपाली कुलकर्णी
  • गोविंदमामा : सतीश खरे
  • महादेव रानडे : सदानंद बोरसे
  • आपटे : श्रीकांत गद्रे
  • दत्ता भुस्कुटे : सुरेश भासले
  • गणेश द्रविड : जयराम हर्डीकर
  • रामचंद्र द्रविड: संजीव अंबिका
  • निलू द्रविड : विकास देशपांडे
  • हवालदार रामा पांडू : मुकुंद चितळे
  • वॉल्टर रँड : जॉन इरविंग
  • बाळ गंगाधर टिळक : सदाशिव अमरापूरकर
  • इन्स्पेक्टर ब्रेविन : रॉड गिल्बर्ट
  • सहाय्यक :
उलरिच मर्केल, मर्विन पॉपलस्टोन, मिहीर थत्ते, श्री पेंडसे, प्रमोद काळे, हॅरी फॉक, फादर लेडरले, मॅथ्यू मॅनिंग, शिरीष मोरे, सुहास कुलकर्णी, किशोर जोशी, शिरीष बोधनी, सुभाष अवचट, झरीर रिपोर्टर, रॉबर्ट मॅनिंग, आनंद हागिर, पीटर सायलस, फ्रँक आणि दीपा हँडरिच, शैला जोशी, दिलीप लिमये, बाली अवस्थी, प्रिती लिमये, जिम बेन्सन, गे डेला शेव्हॅलेरी आणि इतर.

बाळकृष्ण चापेकर यांची व्यक्तिरेखा रवींद्र मंकणी यांनी साकारली होती. त्यांचा तो पहिलाच चित्रपट होता. मंकणी यांनी याबद्दल असे म्हणले की,

आम्हा सर्वांसाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता आणि या चित्रपटाने माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. आम्ही फुटेज वाया घालवू शकत नव्हतो कारण तो नऊ मिनिटे आणि सत्तावन सेकंदांचा शॉट होता.

[]

चित्रपट महोत्सवात सहभाग

  • कलकत्ता'८०: प्रादेशिक चित्रपट महोत्सव, एप्रिल १९८०
  • त्रिवेंद्रम, केरळ: प्रादेशिक चित्रपट महोत्सव, ऑक्टोबर १९८०
  • आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येथे:
    • ला रोशेल, फ्रान्स, जून 1980
    • मॉन्ट्रियल, कॅनडा, ऑगस्ट 1980
    • मॅनहाइम, पश्चिम जर्मनी, ऑक्टोबर 1980

पुरस्कार आणि ओळख

या चित्रपटाचा समावेश 'वन हंड्रेड इंडियन फीचर फिल्म्स: एन एनोटेड फिल्मोग्राफी' या पहिल्या भारतीय टॉकीजपासून आजपर्यंत (१९८८) या पुस्तकात करण्यात आला आहे.[] यूएस 'लायब्ररी ऑफ काँग्रेस'मध्ये भारतीय चित्रपट आणि व्हिडिओंच्या निवडक यादीत या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या मोशन पिक्चर, ब्रॉडकास्टिंग आणि रेकॉर्डेड साउंड डिव्हिजनमध्ये हा संग्रह समाविष्ट आहे. लायब्ररीने या संग्रहाचे अत्युच्च आणि अतिशय मनोरंजक असे वर्णन केले आहे. या संग्रहात नव्वद फीचर फिल्म्स आणि शंभर शॉर्ट फिल्म्स आहेत.

या चित्रपटाने राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.[][]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: मार्च १९८० []

  • सिल्व्हर लोटस: राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म
  • सिल्व्हर लोटस: सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन (जयू पटवर्धन)

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार: मार्च १९८०

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : दादासाहेब फाळके पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: नचिकेत आणि ज्यू पटवर्धन

संदर्भ

  1. ^ श्रीवास्तव बॅनर्जी. "One Hundred Indian Feature Films: An Annotated Filmography - Srivastava Banerjee - Google Books". p. १८२.
  2. ^ a b c d Kailashnath, Dr. Koppikar; Chheda, Subhash. "22 June 1897, Celebrating 25 years". 6 March 2009 रोजी पाहिले.
  3. ^ Chapekar, Damodar Hari. Autobiography of Damodar Hari Chapekar (PDF). From Bombay Police Abstracts of 1910. pp. 50–107.
  4. ^ Buzz Reporters (5 नोव्हेंबर 2009). "22 June 1897 – Film". www.buzzintown.com. 18 जानेवारी 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 मार्च 2009 रोजी पाहिले.
  5. ^ a b c "२२ जून १८९७". marathifilmdata.com. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ Genres. "22 June 1897". 20 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 September 2009 रोजी पाहिले.
  7. ^ Mehta, Sunanda (16 June 2006). "22 June 1897 will be 25 on Thursday: Milestone for film based on Chapekar brothers who assassinated Rand". The Indian Express. 14 February 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2009 रोजी पाहिले.
  8. ^ Shampa Banerjee, Anil Srivastava (1995) [1988]. One Hundred Indian Feature Films: An Annotated Filmography. Taylor & Francis. pp. 182–183. ISBN 978-0-8240-9483-6.
  9. ^ Cooper, Graham C. (May 1992). "A Selected List of Indian Films & Videos in the Library of Congress". 8 August 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 August 2009 रोजी पाहिले.

बाह्य दुवे