२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | बांगलादेश | ||
सहभाग | १० | ||
सामने | २३ | ||
अधिकृत संकेतस्थळ | womens | ||
दिनांक | ३ – २० ऑक्टोबर २०२४ | ||
|
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती असेल.[१] सदर स्पर्धा ही ३ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती.[२] परंतु, बांगलादेशमध्ये चालू असलेल्या राजकीय अशांततेमुळे स्पर्धा आता त्याच वेळापत्रकानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात आली आहे, तरीही यजमानपदाचे अधिकार बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे आहेत.[३] ऑस्ट्रेलियाचा महिला संघ हा गतविजेता आहे, त्यांनी मागील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
पार्श्वभूमी
आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे आयोजित महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांदरम्यान आयोजित एक व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धा आहे. आता दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा २००९ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या शेवटच्या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. गतविजेता ऑस्ट्रेलिया होता, ज्याने मागील आवृत्तीच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
यजमानांची निवड
ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसीने घोषणा केली की २०२४ महिला टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाईल आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) अधिकृत यजमान राहील.[४]
स्वरूप
१० पात्र संघांना प्रत्येकी ५ संघांच्या २ गटांमध्ये विभागण्यात आले; एका गटातील सर्व ५ संघ इतर सर्व संघांसोबत सामने खेळतील. प्रत्येक गटामध्ये १० सामने खेळविले जातील आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.
वेळापत्रक
२८ जुलै २०२४ रोजी, आयसीसीने घोषणा केली की ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खेळवली जाईल. ती बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती. तथापि, ऑगस्ट २०२४ रोजी आयसीसीने जाहीर केल्यानुसार, बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय स्थितीमुळे कारण काही सहभागी संघांच्या देशांतर्फे लागू करण्यात आलेल्या प्रवास सल्ल्यामुळे सदर स्पर्धा आता त्याच तारखांनुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे.
१६ ऑगस्ट २०२४ रोजी, आयसीसीने जाहीर केले की सराव सामने २७ सप्टेंबर ते १ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले जातील. परंतु, २६ ऑगस्ट २०२४ रोजी, सुधारित वेळापत्रकाच्या घोषणेनंतर, सराव सामने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत खेळविले जातील.
संघ आणि पात्रता
एप्रिल २०२२ मध्ये, आयसीसीने स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेची पुष्टी केली.[१] यजमान म्हणून बांगलादेश या स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरला. पात्रता स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आयर्लंडचा पराभव करून स्कॉटलंडने प्रथमच महिला टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.[५][६] श्रीलंका दुसरा पात्र संघ ठरला. त्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीत संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून नवव्यांदा टी२० विश्वचषक गाठला.[७]एकंदरीत, २०२३ मधील दहा पैकी नऊ संघ २०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत पोहोचले, फरक इतकाच की फक्त स्कॉटलंडने आयर्लंडची जागा घेतली.[८]
पात्रता निकष | जागा | पात्र संघ |
---|---|---|
यजमान | १ | बांगलादेश |
२०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक (यजमान वगळून मागील स्पर्धेतील ६ अव्वल संघ) | ६ | ऑस्ट्रेलिया इंग्लंड भारत दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड वेस्ट इंडीज |
आयसीसी महिला आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारी (२७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुढील अव्वल क्रमांकाचा संघ) | १ | पाकिस्तान |
२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता | २ | स्कॉटलंड श्रीलंका |
एकूण | १० |
संदर्भयादी
- ^ a b "मोठ्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्रता मार्ग निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० एप्रिल २०२२. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२७ पर्यंतच्या आयसीसी महिला जागतिक स्पर्धांसाठी यजमानांची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ जुलै २०२२. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नवे ठिकाण म्हणून संयुक्त अरब अमिरातीच्या निवड". www.icc-cricket.com. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक संघर्षग्रस्त बांगलादेशातून युएईमध्ये हलवला". क्रिकबझ्झ. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंडवर विजय मिळवून स्कॉटलंडने पहिल्या महिला टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळवले". www.icc-cricket.com. ५ मे २०२४.
- ^ "महिला टी२० विश्वचषक पात्रता: स्कॉटलंडची आयर्लंडवर मात, बांगलादेश विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविले". बीबीसी स्पोर्ट. ५ मे २०२४.
- ^ "युएईवर मात करत श्रीलंकेचे महिला टी२० विश्वचषक जागेवर शिक्कामोर्तब". www.icc-cricket.com. ५ मे २०२४.
- ^ "स्कॉटलंडकडून दारुण पराभवानंतर आयर्लंड महिला टी२० विश्वचषक स्पर्धेला मुकला". द आयरिश टाइम्स.