१३ (संख्या)/महात्म्य
संख्या महात्म्य 🌹संख्या १३
तेरा अवगुण वाणीचे
१ उपरोधिक , २ महाभयंकर , ३मर्मभेदक , ४ वाहावलेली , ५ टवाळकी , ६ छलयुक्त , ७ वर्मास झोंबणारी , ८ कठिण , ९ गडबडीनें उच्चारलेली , १० कपटाची , ११ आशाळूपणाची , १२ संशयांत पाडणारी आणि १३ प्रतारणा करणारी .आटु वेगु विंदाणु । आशा प्रतारणु ॥हे संन्यसिले अवगुणु । जया वाचा ॥ ( ज्ञा . १३ - २७२ )
तेरा अग्नि ( आयुर्वेद )
पांच भौतिक अग्नि आणि सप्तधातूंतील सात धात्वग्नि व १ जठराग्नि . असे तेरा अग्नि मानव शरीरांत आहेत असे शास्त्रकार सांगतात . त्यांत मुख्य जठराग्नि होय .
तेरा आद्य नाटयाचार्य ( नाटय अथवा कुशीलव शास्त्र )
१ ब्रह्मा , २ शंख , ३ भरत , ४ नारद , ५ हनुमान , ६ व्यास , ७ वाल्मीकि , ८ लवकुश , ९ श्रीकृष्ण , १० अर्जुन , १११ पार्वती , १२ सरस्वती व १३ तुंबरु . ( हिंदी सा . को . )
तेरा गुण ( गार्हस्थ्य जीवनाचे )
१ मनुष्यत्वाची प्राप्ति , २ सत्कुलांत जन्म , ३ ऐश्वर्य , ४ दीर्घायुष्य ,५ स्वस्थ शरीर , ६ सन्मित्र - समागम , ७ सत्पुत्र , ८ सती भार्या , ९ परमेश्वरभक्ति , १० विद्वत्ता ११ सुजनता , १२ इंद्रियनिग्रह आणि १३ सत्पात्रीं दानांत प्रीति , हे तेरा गुण पूर्व पुण्याईनें पाप्त होतात . ( सु . )
तेरा गुण ( तांबूलाचे )
१ कडसर , २ सुवासिक , ३ उष्ण , ४ मधुर , ५ खारट , ६ तुरट , ७ जंतुहारक , ८ दुर्गंधिनाशक , ९ पित्तशामक , १० कफनाशक , ११ मुखाची शोभा वाढविणारा , १२ मुखशुद्धि करणारा आणि १३ कामावासना प्रदीप्त करणारा .तांबूलं कटुतिक्तमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितम् ।पित्तघ्नं कफनाशनं कृमिहरं दुर्गंधिनिर्नाशनम् ॥वक्त्रस्याभरणं विशुद्धकरणं कामाग्निसंदीपनम् ।तांबूलं सखये त्रयोदशगुणाःअ स्वर्गेऽपि ते दुर्लभाः ॥ ( सु . )
तेरा प्रकार राज्यशासनाचे
१ साम्राज्य , २ भौज्य , ३ स्वाराज्य , ४ वैराज्य , ५ पारमेष्ठय , ६ राज्य , ७ महाराज्य , ८ आधिपत्यमय , ९ सामन्तपर्यायी , १० जनराज्य , ११ विप्रराजा , १२ समर्थराज्य व १३ अधिराज्य , असे शासनाचे तेरा प्रकार प्राचीन काळीं होते .( वैदिकधर्म खंड १ला )
तेरा महारथी पांडवांकडील
१ अर्जुन , २ सात्यकि , ३ धृष्टद्युम्न , ४ घटोत्कच , ५ शिखंडी , ६ अभिमन्यु , ७ भीम , ८ नकुल , ९ सहदेव , १० युधिष्ठिर , ११ विराट , १२ उत्तर व १३ द्रुपद ( भारतसावित्री )
तेरा यम नक्षत्रें
१ अनुराधा , २ ज्येष्ठा , ३ मूळ , ४ पूर्वाषाढा , ५ उत्तराषाढा , ६ श्रवण , ७ धनिष्ठा , ८ शततारका , ९ पूर्वाभाद्रपदा , १० उत्तरभाद्रपदा , ११ रेवती, १२ आश्चिनी व १३ भरणी . ( तै . ब्रा . )
तेरा योग
१ चर , २ क्रकच , ३ दग्ध , ४ मृत्युदा , ५ सिद्धि , ६ उत्पात , ७ मृत्यु , ८ काल , ९ अमृतसिद्धि , १० यमदंष्ट्र ,११ मुसल , १२ वज्र व १३ अमृत ( ज्योतिष )
तेरा वस्तु मंगल दायक
१ शेळी , २ बैल , ३ चंदन , ४ वीणावाद्य , ५ आरसा , ६ मध , ७ तूप , ८ लोखंड , ९ तांब्याचें भांडें , १० शंख , ११ स्वर्णनाम , १२ शालीग्राम व १३ गोरोचन या तेरा वस्तू मंगलदायक म्हणून घरीं असाव्यात .
तेरा विमानशास्त्राचे आचार्य ( प्राचीन )
१ भरद्वाज २ वाल्मीकि , ३ नारायण , ४ शौनक , ५ गर्ग , ६ वाचस्पति , ७ आक्रायणि , ८ धुंडीनाथ , ९ बोधानंद , १० यतीश्वर , ११ लल्ल , १२ शंख व १३ विश्वंमर यांत भरद्वाजऋषि हे या विमानशास्त्राचे सर्व प्रथम निर्माते होत . ( विमानशास्त्र प्रस्तावना )
तेरा जण शोच्य होत
१ भित्रा क्षत्रिय , २ पडेल तें खाणारा ब्राह्मण , ३ निराकांक्षी व्यापारी , ४ आळशी शूद्र, ५ शीलहीन विद्वान् , ६ दुर्वृत्त कुलीन , ७ भ्रष्ट ब्राह्मण , ८ व्यभिचारिणी स्त्री , ९ विषयलंपट योगी , १० आपलें अन्न स्वहस्तें शिजविणारा , ११ अक्कल नसून वक्तृत्व करणारा , १२ शासनावांचून राष्ट्र आणि १३ प्रजेविषयीं बेपर्वा राज्यकर्ते . हे तेरा जण शोच्य म्हणजे कींव करण्यासारखे होत .
त्रयोदशाक्षरी मंत्र
" श्रीराम जय राम जय जय राम " नव्हे मिथ्य बोलणें सत्यवाचा ।जपा अतंरीं मंत्र तेराक्षरांचा ( करुणाष्टकें )
त्रयोदशगुणी विडा
१ पान , २ सुपारी , ३ चुना , ४ कात , ५ लवंग , ६ वेलदोडा , ७ जायफळ , ८ जायपत्री , ९ कंकोळ , १० केशर, ११ खोबरें , १२ बदाम आणि १३ कापूर , ह्मा तेरा जिनसा मिळून तयार केलेला विडा . ( सु . )