हेडलाइन्स फ्रॉम द हार्टलँड
हेडलाइन्स फ्रॉम द हार्टलँड हे भारतीय समीक्षक व स्तंभलेखक शेवंती निनन यांनी लिहिलेले पुस्तक आहे. [१] पुस्तकात १९९० ते २००६ या कालखंडादरम्यान, हिंदीभाषी राज्यांतून प्रसिद्ध झालेल्या हिंदी भाषेतील पुस्तकांची चिकित्सा केली आहे.
ठळक मुद्दे
जर्मन तत्त्ववेत्ता युर्गेन हेबरमास याच्या मते, गुणवत्ता व विवेकवादी चिकित्सात्मक चर्चाविश्व आणि संख्या किंवा प्रसिद्धी या दोन गोष्टींतून सार्वजनिक वातावरण घडते. हिंदी भाषिक राज्यांमध्ये २० व्या शतकाच्या सुरुवातीला हेबरमासने मांडलेल्या गुणवत्ता या संकल्पनेतून हे सार्वजनिक वातावरण घडलेले दिसत, तर २० व्या शतकाच्या उत्तरार्धात संख्यात्मकतॆचा स्वीकार केल्याने सार्वजनिक वातावरण उभे राहिले आहे. बाजारीकरणामुळे सार्वजनिक वातावारणाचा दर्जा घसरतो. परंतु या तत्त्वाला तडा देत १९९० च्या मध्यात हिंदी भाषिक राज्यांतील हिंदी वृत्तपत्रांचा वाढता वाचक वर्,ग हा केवळ ग्राहक नव्हे तर राजकीय जाणीवा जागृत झाल्याने एकत्र आलेले नागरिक आहेत अशी भूमिका या हिंदी प्रसारमाध्यमांनी घेतली.
पार्श्वभूमी व पद्धतिशास्त्र
या पुस्तकाच्या लिखाणासाठी आवश्यक आकडेवारी, तथ्ये व मुलाखतींचे एकत्रीकरण करण्यास ४ वर्ष लागली, असे afaqs.com वरील एक मुलाखतीत निनन यांनी सांगितले आहे. [२]
हे पुस्तक सखोल संशोधनावर आधारित असून, या संशोधनासाठी मुलाखतींचा व विविध प्रादेशिक हिंदी भाषिक वर्तमानपत्रांमध्यॆ प्रसिद्ध झालेल्या संख्यात्मक माहितीचा आधार घेतलेला आहे.
पुस्तकाचे सार
हिंदीचे भाषा म्हणून असणारे नियम व आवश्यकता, वाचकांच्या आकांक्षा, वाचकांचे दैनंदिन जीवनमान यामुळे ती कशी वाकवली गेली याचा वेध शेवंती निनान यांनी घेतलेला आहे.
यातील दुसरे प्रकरण या गोष्टींचा हिंदी प्रकाशनांच्या वाढीवर झालेला परिणाम, हिंदी प्रकाशनांनी आणलेली शैली व प्रवास, आणि 'आज' व 'प्रताप' सारख्या प्रकाशनांनी इतिहास व संस्कृती यांमध्ये दिलेले योगदान या बाबींवर प्रकाश टाकते.
तिसऱ्या प्रकरणामध्ये निनान याकडे लक्ष वेधतात की, वृत्तपत्रांचा प्रसार वा वाढता खप यामागे केवळ राज्याच्या साक्षरतेचा स्तर उंचावला आहे असे म्हणता येत नाही, तर साक्षरतेच्या पलीकडले शिक्षण, बातम्यांची भूक, संवादाचे वाढते जाळे, राजकीय जागृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्याने उदयाला येणाऱ्या ग्रामीण मध्यमवर्गाच्या बदलत चाललेल्या जीवनपद्धती व इच्छा-आकांक्षा व्यक्त होण्यासाठी मिळालेले एक माध्यम म्हणून या प्रसारमाध्यमाकडे बघावे लागेल.
४ थ्या प्रकरणामध्ये विकास आणि स्थानिकीकरण या दोहोंतील नात्यांवर भाष्य केलेले आहे. या दोन प्रक्रियांमुळे अधिकाधिक मुद्रणालये निघाली व घराघरांत वृत्तपत्र असणे आणि सांस्कृतिक अस्मिता व एकात्मता व्यक्त करण्याकरिता वृत्तपत्र हे महत्त्वाचे साधन ठरले.
पाचव्या प्रकरणामध्ये स्थानिक पातळीवर नागरिक पत्रकारांचा उदय कसा झाला व ज्या जात, वर्गाच्या, सत्तास्थानाच्या पार्श्वभूमीतून हे पत्रकार आलेले होते ते घटक वृत्तपत्रांतून कसे पुढे आणले गेले याचे परीक्षण केले आहे.
६ व्या प्रकरणामध्ये वृत्तपत्रांचा खप वाढविण्यासाठी वाचकांना कुपन्स सारख्या गोष्टी देणे, स्थानिक पातळीवरील राजकीय जाहिरातींचा वर्तमानपत्रांत समावेश करणे यासारख्या ज्या रणनीती आखल्या गेल्या त्याची चिकित्सा निनान करतात.
आठव्या प्रकरणामध्ये,पत्रकारितेची नैतिकता व राजकीय दुवे या दोहोंतील स्वच्छ नातेसंबंधांचा अभाव पत्रकार व राजकारणी या दोहोंत निर्माण झालेले देवाणघेवाण या स्वरूपाचे संबंध याचा वेध घेतला आहे.
नवव्या प्रकरणातही पत्रकार व राजकारणी यां दोहोंतील संबंधांचा वेध घेतलेला आहे, परंतु तो जात व समूह या दोहोंच्या अंगाने घेतला गेला आहे. उच्च जातीतून आलेले पत्रकार लालू प्रसाद यादव, मायावती यांसारख्या पहिल्या पिढीतील दलित राजकीय नेत्यांच्या विरोधात कसे ठाकतात याची मांडणी केलेली आहे. तसेच, या प्रकरणामध्ये ९० च्या दशकात 'बाबरी मस्जिद' प्रकरण आक्रमकतेने पुढे आणण्यात वृत्तपत्रांची भूमिका काय होती याचेही परीक्षण केले आहे.
दहाव्या प्रकरणामध्ये राज्याचा विकासाचा मुद्दा हा प्रादेशिक चर्चाविश्वात वृत्तपत्रांद्वारे कसा आणला गेला हे बघितलेले आहे.स्थानिक पत्रकार हे विकासाचे मध्यस्थ बनले, परंतु विस्तृत पातळीवर विकास या प्रक्रियेची मांडणी करण्यापेक्षा विकासाबद्दलच्या कहाण्याच कश्या रचल्या गेल्या हे त्या दाखवतात.
११ व्या प्रकरणामध्ये, प्रादेशिक भाषांतील वृत्तपत्राचा राजकीय नेते, ग्रामीण व शहरी कार्यकर्ते व नागरी समाज यांवर कसा प्रभाव पडला व प्रदिशिक सामूहिक अस्मिता कश्या अधिक बळकट झाल्या यांचा वेध घेतलेला आहे.
योगदान
सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ उदुपा या म्हणतात की उत्तरी भारतातील छोट्या गावांत वृत्तपत्रांमुळे काय काय सूक्ष्म बदल झाले हे समजून देण्यात या पुस्तकाचे मोठे योगदान आहे. [३] भारतीय इतिहासकार रामचंद्रगुहा यांच्या मते हे पुस्तक संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे; शिवाय हे संशोधन सहज पद्धतीने मांडण्यात आलेले आहे[४].भारतीय इतिहासतज रामचंद्र गुहा म्हणले की शेवंती निनन यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून पत्रकारितेचे राजकीय व आर्थिक विश्व सखोलपणे उलगडलेले आहे. इंडियन एक्सप्रेस, दि आफ्टरनून डिस्पॅच ॲन्ड कुरियर आणि पिच या विविध इंग्रजी वृ्त्तपत्रांनी या पुस्तकाचा साशंक स्वीकार केला आहे.[५]
संदर्भ सूची
- ^ "Sevanti Ninan". Center for the Advanced Study of India (CASI) (इंग्रजी भाषेत). 2013-08-19. 2018-06-01 रोजी पाहिले.
- ^ "An interaction with media critic Sevanti Ninan". www.afaqs.com (इंग्रजी भाषेत). 2018-06-01 रोजी पाहिले.
- ^ http://jou.sagepub.com/content/10/2/263.extract#[permanent dead link]
- ^ "Headlines From the Heartland". SAGE Publications Inc (इंग्रजी भाषेत). 2018-05-14. 2018-06-01 रोजी पाहिले.
- ^ "Headlines From the Heartland". SAGE India (इंग्रजी भाषेत). 2018-05-14. 2018-06-01 रोजी पाहिले.[permanent dead link]