हुतात्मा दिन
भारतामध्ये बऱ्येच दिवस हे असे आहेत की जे हुतात्मा दिन (हिंदी - शहीद दिवस, English - Martyrs' Day ) म्हणून पाळले जातात. देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलीदानाबद्दल अशा लोकांच्या स्मरणार्थ हे दिवस शहीद दिवस म्हणून पाळले जातात, राष्ट्रीय स्तरावर सर्वोदय दिवस म्हणून देखील ओळखला जातो. ज्यामध्ये २३ मार्च आणि ३० जानेवारी हे मुख्यता पुर्ण देशभर शहीद दिवस म्हणून पाळले जातात.[१]
शहीद दिवस राष्ट्रीय स्तरावर
३० जानेवारी
३० जानेवारी हा राष्ट्रीय स्तरावर शहीद दिवस म्हणून पाळला जातो, कारण याच दिवशी म्हणजेच ३० जानेवारी १९४८ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे याने बिर्ला हाऊस (आता गांधी स्मृती)च्या कंपाऊंडमध्ये महात्मा गांधींच्या छातीत आणि पोटात तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. [२][३]
दरवर्षी या दिवशी महात्मा गांधीना श्रद्धांजली वाहली जाते.
२३ मार्च
भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. त्यामुळेच २३ मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.[१][४]
इतर काही दिवस जे हुतात्मा दिन म्हणून पाळले जातात
१२ जानेवारी
मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चार हुतात्म्यांना १२ जानेवारी १९३१ला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली..हा दिवस सोलापुरात 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.[५]
१९ मे
आसाम राज्यातील बराक व्हॅलीची बंगाली भाषा चळवळ ही लोकसंख्येतील लक्षणीय प्रमाणात बंगाली लोक असतानाही आसामीला राज्याची एकमेव अधिकृत भाषा बनवण्याच्या आसाम सरकारच्या निर्णयाचा निषेध होता. बराक खोऱ्यात, सिल्हेटी भाषिक बंगाली लोकसंख्या बहुसंख्य आहे. मुख्य घटना, ज्यामध्ये राज्य पोलिसांनी १५ लोक मारले होते, १९ मे १९६० रोजी सिलचर रेल्वे स्थानकावर घडली. १९ मे हा आता बराक व्हॅली मध्ये भाषा शहीद दिवस ("भाषा शहीद दिन") म्हणून ओळखला जातो. [६]
२१ ऑक्टोबर
२१ ऑक्टोबर हा पोलीस शहीद दिन (किंवा पोलीस स्मृती दिन) आहे, जो पोलीस विभागांद्वारे देशभरात साजरा केला जातो. या तारखेला १९५८ मध्ये, चालू असलेल्या चीन-भारत सीमा विवादाचा भाग म्हणून, लडाखमधील भारत-तिबेट सीमेवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्तीवर चीनी सैन्याने हल्ला केला होता.[७]
१७ नोव्हेंबर
लाला लजपत राय यांनी सायमन कमिशनच्या विरोधात काढलेल्या मिरवणूकी दरम्यान इंग्रजांनी आंदोलकांवर जबरदस्त लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज दरम्यान लाला लजपतराय यांना गंभीर दुखापत झाली, त्यांना डोक्यावर देखील मार बसला. आपल्या शेवटच्या भाषणात ते म्हणले माझ्या "शरीरावर लागलेला एक एक घाव ब्रिटिश साम्राज्याचा मृत्यूचे कारण असेल". पोलिसांकडून झालेल्या या लाठिचार्ज मुळे १७ नोव्हेंबर १९२८ला त्यांचा मृत्यू झाला.[८][९]
१९ नोव्हेंबर
१८५७ च्या स्वातंत्रसंग्रामात मुख्य भूमिका बजावणाऱ्या मराठा शासित झाशी संस्थानाच्या राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिवस (१९ नोव्हेंबर १८३५) या प्रदेशात शहीद दिन म्हणून पाळला जातो. आणि १८५७ च्या बंडात ज्यांनी आपले प्राण दिले त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहली जाते.[१०]
२४ नोव्हेंबर
शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते. गुरू तेग बहादूर २४ नोव्हेंबर १६७५ रोजी शहीद झाले होते. औरंगजेबाला गुरू तेग बहादूर यांनी इस्लाम स्वीकारावा अशी इच्छा होती परंतु गुरू तेग बहादूर यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाने गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद केला होता.[११]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b "२३ मार्च रोजीच का साजरा केला जातो शहीद दिवस?; जाणून घ्या त्यामागील कारण..." eSakal - Marathi Newspaper. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "हुतात्मा दिनी गांधीजींचे विस्मरण". Loksatta. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "हुतात्मा दिन". www.sudarshannews.in. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-03-23). "Martyrs Day 2022 : शहीद दिनानिमित्त भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन". marathi.abplive.com. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!". 24taas.com. 2017-01-11. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "Language Martyrs Day observed on 19 May in Barak Valley, Assam". Jagranjosh.com. 2014-05-20. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "पुलिस स्मृति दिवस 2020: 21 ऑक्टोबर की कहानी, जब चीन के सामने अड़ गई थी पुलिस". आज तक (हिंदी भाषेत). 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "लाला लजपतराय यांची संपूर्ण माहिती। Lala Lajpat Rai Information in Marathi". भाषण मराठी - Bhashan Marathi. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-11-23. 2022-03-26 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "राणी लक्ष्मीबाई जन्मदिन विशेष : आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटवणाऱ्या वीरांगनेची गाथा | 📝 LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2018-11-19. 2022-03-26 रोजी पाहिले.
- ^ "गुरु तेग बहादुर शहीदी दिवस: औरंगजेब ने इस्लाम स्वीकार न करने पर कटवा दिया था सिर". Jansatta (हिंदी भाषेत). 2022-03-26 रोजी पाहिले.