Jump to content

हुजूर दफ्तर

हुजूर दफ्तर हे महाराष्ट्रातील पुणे येथे असलेले मराठा साम्राज्यातील सर्व शासकीय कागदपत्रांची नोंद ठेवणारे भांडार होते. पेशव्यांचा प्रशासकीय व्यवस्थापनाचा व्याप प्रचंड असल्याने यास हुजूर दफ्तर म्हणले जात असे. तेथून मराठा साम्राज्यातील स्वराज्य व साम्राज्य प्रदेशातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारभार पाहिला जाई. फडणवीस आणि दिवाण हे पेशव्याचे दोन वंशपरंपरागत मंत्री पेशव्याच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली या कार्यालयाचा कारभार पाहत.

प्रशासन

हुजूर दफ्तराच्या कार्यालयात वेगवेगळे विभाग होते. येथून साम्राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशांचा व प्रशासनातील मुलकी, लष्करी, अर्थ आणि हिशेब, व्यापार आणि उद्योग, मराठा सरदारांशी आणि परकीय सत्तांशी पत्रव्यवहार ही कामे पाहण्यासाठी प्रत्येक विभागाला एक अधिकारी होता. या अधिकाऱ्याला प्रधान म्हणले जाई. प्रत्येक विभागात कारकून, हिशेब तपासनीस, सरकारी कागदपत्रांची नोंद ठेवणारे आणि इतर हलकीसलकी कामे करणारे कर्मचारी असत.