हिराबाई बडोदेकर
हिराबाई बडोदेकर | |
---|---|
उपाख्य | गानहिरा |
आयुष्य | |
जन्म | २९ मे १९०५ |
मृत्यू | २० नोव्हेंबर १९८९ |
पारिवारिक माहिती | |
आई | ताराबाई माने |
वडील | अब्दुल करीम खाँ |
जोडीदार | माणिकचंद गांधी |
संगीत साधना | |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
घराणे | किराणा |
व्यक्तिगत माहिती
"गानकोकिळा हिराबाईं बडोदेकर -: यांचा जन्म २९ मे १९०५ रोजी मिरज येथे झाला. त्यांच्या घरात तीन पिढ्या संगीताची परंपरा होती. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांना संगीताची लहानपणापासून ओढ होती. त्यांचे मोठे भाऊ प्रसिद्ध गायक सुरेश बाबू माने यांच्याकडेच हिराबाईनी प्रथम संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे गुरू अब्दुल करीम खां यांच्या बरोबर गाण्याची संधीही त्यांना मिळाली. इ.स.१९२१ पासून हिराबाईनी स्वतंत्र गाण्यास सुरुवात केली. इ.स. १९२८ मध्ये हिराबाईनी संगीताचे शिक्षण देणारी नूतन संगीत विद्यालय ही संस्था सुरू केली. नूतन संगीत विद्यालयाच्या जोडीने त्यांनी नूतन संगीत नाटक मंडळी ही संस्थाही स्थापन केली. सौभद्र, पुण्यप्रभाव, विद्याहरण, एकच प्याला, युगांतर इ. नाटकांचे त्यांनी प्रयोग केले. उत्तम नाट्यगीतांबरोबर अतिशय परिश्रमपूर्वक त्या अभिनयही करीत. सुसंस्कृत समाजात स्त्री कलावंताना नंतर जे सन्मानाचे स्थान मिळू लागले त्याचे संपूर्ण श्रेय हा हिराबाईं बडोदेकर यांना आहे. गानमहर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रेरणेने हिराबाईं बडोदेकर यांचा पहिला जाहीर जलसा २१ डिसेंबर १९२१ रोजी झाला, बैठकीत गाणाऱ्या पहिल्या महिला गायिका तसेच डॉ. मारुळकर यांच्या दृष्टीने स्त्रियांचे घराणे सुरू करणाऱ्या पहिल्या घरंदाज गायिका म्हणून त्यांचा लौकिक झाला. ख्याल, ठुमरी, टप्पा, दादरा, तराणा, कजरी, भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, चित्रगीत अशा विविध गीत प्रकारामध्ये हिराबाईं बडोदेकर यांनी आपले स्थान अढळ केले होते. कंपनीला कर्ज झाल्याने हिराबाईनी १९३४ मध्ये नूतन संगीत नाटक मंडळी बंद केली. जनाबाई, सुवर्ण मंदिर, हृदयाची श्रीमंती, प्रतिभा या चित्रपटांतूनही हिराबाईनी कामे केली. त्यांना गायनहिरा, गानकोकिळा या उपाध्या मिळाल्या. अश्या या पहिल्या युगप्रवर्तक गायिका गानकोकिळा हिराबाईं बडोदेकर यांचे निधन वयाच्या ८४ व्या वर्षी २० नोव्हेंबर १९८९ रोजी पुणे येथे झाले.[१]
संगीत कारकीर्द
प्रसिद्ध गायक, सुरेश बाबू माने, वहीद खां, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीम खां यांच्याकडे संगीत साधना.
पुरस्कार
- इ.स. १९६५ मध्ये त्यांना संगीत नाटक कला अकादमीचा सन्मान प्राप्त झाला.
- इ.स. १९७० मध्ये पद्मभूषण सन्मान मिळाला.
- ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष. pp. १९७. ISBN 978-81-7425-310-1.