हिंदी मराठी उच्चार
- हा लेख पूर्ण झाल्या नंतर विकिबुक्स बंधुप्रकल्पात स्थानांतरित करण्याचे प्रस्ता
हिंदी आणि मराठी या दोन भाषा देवनागरी लिपीतच लिहिल्या जात असल्या तरी कधीकधी त्या लिपीत लिहिलेल्या शब्दांच्या मराठी उच्चारांपेक्षा हिंदी शब्दोच्चार वेगळे असतात. सुट्या व्यंजनाचा हिंदी उच्चार अकारान्त ते आकारान्त यांच्या दरम्यानचा, पण आकारान्ताकडे झुकणारा असा होतो. अ, क, ख, ग, घ हे उच्चार अनुक्रमे आ, का, खा, गा, घा असे ऐकू येतात. त्यामुळे सा रे ग म प ही अक्षरे हिंदी उच्चारात सा रे गा मा पा अशी होतात. दाक्षिणात्य तर, राम, मंत्र, योग हे शब्द अनुक्रमे रामा, मंत्रा आणि योगा असे उच्चारतात. या भाषांत अन्त्याक्षर हलन्त असलेले अनेक शब्द आहेत, त्यामुळे राम्, मंत्र्, योग् असे न लिहिले गेल्यामुळे ते अन्त्याक्षरी स्वराचा दीर्घ उच्चार करतात.
- तीन किंवा अधिक अक्षरे असलेल्या शब्दात दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अकारयुक्त व्यंजनाचा हिंदी उच्चार हलन्त होतो, तर मराठीत तो पूर्ण किंवा दीर्घ होतो. भावना हा शब्द हिंदीत भाव्ना असा उच्चारतात तर मराठीत उच्चार होतो - भाऽ वना. त्यामुळे उपराष्ट्रपती ह्या शब्दाचा हिंदी उच्चार उप्राष्ट्रपती असा केला जातो. सुदैवाने हिंदीत उच्चारानुसारी लेखन करायची परंपरा नसल्याने लिखाण उपराष्ट्रपती असेच होते. हिंदीत लिहिलेले इंदिरा गांधी हे इंद्रा गांधी असे वाचले जाते. मेनका गांधी या हिंदीत उच्चाराने मेन्का गांधी होतात. आपल्या नावाचा असा चुकीचा उच्चार होऊ नये, म्हणून त्या Maneka Gandhi असे स्पेलिंग करतात, आणि परिणामी इंग्रजी उच्चाराचे प्राथमिक ज्ञान नसलेले मराठीभाषक त्यांना मनेका गांधी म्हणतात.
- मराठीत शब्दातला अंत्य अकार हलन्त उच्चारतात, आणि उपान्त्य स्वर दीर्घ. त्यामुळे, गवत हा शब्द गवऽत् असा, आणि विष, गुण, हित हे शब्द अनुक्रमे वीष, गूण आणि हीत असे ऐकू येतात. हिंदीत गवत्, विष्, गु्ण् आणि हित् हेच शुद्ध उच्चार. याला काही अपवादही आहेत. उदा० मराठी शब्दातल्या शेवटच्या अकारान्त जोडाक्षराचा नेहमी पूर्ण उच्चार होतो, तर हिंदीत हलन्त. उदा० शुद्ध् (हिंदी) आणि शुद्धऽ(मराठी).
- अंत्य अक्षरावर जर रफार असेल तर तसले शब्द हिंदीत कधीकधी रफार सोडवून उच्चारले जातात. उदा० पूर्ण, मुर्गा, फर्क यांचे उच्चारण पूरण, मुरगा, फरक असे होऊ शकते. मराठीतले उच्चार पूर्णऽ, कार्यऽ, अर्कऽ वगैरे.
- लागोपाठ दोन आ-कार आले की हिंदीत अनेकदा त्यातल्या पहिल्याचा अ-कार होतो. उदा० मालाड, सामान, चाचाजी हे शब्द मलाऽड्, समाऽन्, चचाजीऽ असे उच्चारतात. मराठीत असे होत नाही.
- मराठीत जोडाक्षरानंतर किंवा ऋकारानंतर आलेल्या य किंवा हचा पूर्ण उच्चार होतो. उदा० क्षत्रियऽ, सक्रियऽ, आग्रहऽ. मृगऽ, कृषऽ वगैरे. हिंदीत हलन्त उच्चार.
- हिंदीत ऐ, औ, ऋ, ऌ, आणि ज्ञचे उच्चार अनुक्रमे ॲइ, ऑव्, रि, लि आणि ग्य असे होतात. त्यामुळे कैफ, मौज. मृग, कॢप्ति, ज्ञान वगैरे शब्द अनुक्रमे कॅइफ़, मॉव्ज़, म्रिग्, क्लिप्ति आणि ग्यान् असे ऐकू येतात. मराठीत हेच शब्द कइफ़, मउज़, म्रुगऽ, कॢप्ती, द्न्यान् असे उच्चारतात. प्रत्यक्षात ऋचा उच्चार रु आणि रि यांच्या दरम्यानचा आहे, आणि ऌचा लु आणि लि यांच्या मधला.
- शब्दात सुरुवातीला आलेले जोडाक्षर उच्चारणे अनेक हिंदीभाषकांना जड जाते. ते स्त्री, स्टेशन, स्कॉटलंड, स्पोर्ट्स आदि शब्द इस्त्री, इस्टेशन वा सटेशन. इस्कॉट्लंड. आणि इस्पोर्टस् वा सपोर्टस् असे उच्चारतात.
- हिंदीत झग्यातला झ आणि चमच्यातला च नाही. त्यामुळे मराठीतले माझे, त्याचे, असे लिहिलेले शब्द हिंदी माणूस, माझ्ये, त्याच्ये असे उच्चारील; मराठीतले उच्चार मा़ज़्हऽ, त्याच़ऽ, असे आहेत आणि हे शब्द संवादात आले तर लिखाण माझं, त्याचं असे होईल. मराठीतील चमचा हिंदीत च्यमच्या होतो.
- मराठीतला गोवे हिंदीत गोवा होतो आणि कोंकणीत गोंय(गोंऽय्).
- मराठीतले केलं, गेलं, मेलं (मराठी उच्चार अनुक्रमे केलऽ, गेलऽ, मेलऽ) हिंदीभाषक केलम्, गेलम्, मेलम् असे वाचेल.
- हंस/अंश मराठीत हऊंस/अऊंश तर हिंदीत हन्स, अन्श असे उच्चारतात. हिंदीत ब्राह्मण्, आह्वान् असे उच्चारले जाणारे शब्द मराठीत ब्राम्हऽण, आव्हान असे ऐकू येतात. हिंदीत च़, ज़्ह़, ळ, ख्र (ख् + र), ऱ्ह आणि ऱ्य ही अक्षरे नाहीत, त्यामुळे त्यांचे उच्चार हिंदीत नाहीत.
- मराठीतली पणजी पोर्तुगीजमध्ये पंजिम् होते, कोंकणीत पणजे; म्हापसे कोंकणीत म्हापशें आणि पोर्तुगीजमधे मापुसा (Mapuca), आणि मांडवी नदी कोंकणीत मांडवी न्हय, तर पोर्तुगीजमध्ये मंडोवी रिओ होते.
- हिंदीत अर्धनासिक अनुस्वार दाखवण्यासाठी अक्षराच्या शिरोरेघेच्या किंचित वरच्या बाजूला चंद्रबिंदू काढतात. ज्या अक्षरांना मात्रा, वेलांटी किंवा रफार आहेत त्यांना चंद्रबिंदू काढायला जागा नसल्याने तसे चंद्रबिंदू (उदा० मैँ, हैँ ) काढणे हल्ली टाळतात. अकार, आकार, आणि उकार असलेल्या अक्षरावरचे चंद्रबिंदू टाळता येत नाहीत. उदा० हंसी (उच्चार हन्सी, हंसाची मादी), आणि हँसी (उच्चार ह+ं+सी, हास्य), आँवला, एँठ, मुँह, मूँग वगैरे. मराठीतला बँक हा शब्द हिंदीत बैंक असा लिहावा लागतो, मराठीप्रमाणे बँक असा लिहिला तर त्याचा उच्चार बअंऽक असा होईल. हं हं, टपालहंशील, चिंवि जोशी किंवा दपां खांबेटे सारखे अपवाद सोडल्यास मराठीत अर्ध-अनुस्वारित उच्चार नाहीत. जे होते ते १९६२ च्या शुद्धलेखनाच्या नियमांनी बाद केले. तरीसुद्धा अशा अपवादात्मक अर्धानुनासिक उच्चारांसाठी चंद्रबिंदू देता येत नाही. संस्कृतमध्ये चंद्रबिंदू होते, तेच हिंदीने कायम ठेवले.