हसरत मोहानी
हसरत मोहानी | |
---|---|
जन्म नाव | हसरत मोहानी |
जन्म | १ जानेवारी १८७८ मोहान, संयुक्त प्राच - उत्तर प्रदेश, भारत |
मृत्यू | १३ मे, १९५१ (वय ७२) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
हसरत मोहानी: (जन्म : १ जानेवारी १८७८; - १३ मे १९५१) एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचाा जन्म उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील 'मोहान' या गावी झाला. त्यांचं पूर्ण नाव फजलुल हसन होतं. हसरत हे त्यांचं उपनाम होतं. मोहान या गावाच्या नावावरून त्यांचं नाव मोहानी पडलं. पुढे ते हसरत मोहानी नावानेच प्रसिद्ध झाले. प्रखर राष्ट्रवादी म्हणून इतिहासात हसरत मोहानींची नोंद आहे. स्वातंत्र्य चळवळीत दोन गट होते. एक टिळकपंथीय तर दुसरा गांधीपंथीय. मोहानी टिळकपंथीय गटातले होते. आपल्या जहाल राष्ट्रवादी धोरणातून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. एक वेळ अशी आली की कुठलाही गुन्हा, कुठलेही राजकीय उठाठेवी केलेली नसताना ब्रिटिशांनी त्यांना अटक करण्याचं धोरण स्वीकारलं होतं. अनेकदा त्यांना अटक झाली. त्यांची संपत्ती जप्त झाली. त्यांची पुस्तके, लिखाणाचे कागद, हस्तलिखित, प्रकाशित लेख आदी जप्त करून नष्ट करण्यात आले. असं अनेकदा घडलं. तरी मोहानींनी ब्रिटिशांविरोधातला लढा शिथील केला नाही. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे हसरत मोहानी हे पहिले गृहस्थ होते. १९२१ला अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी प्रथमच केली. तसंच 'इन्कलाब जिंदाबाद'चा नारा देणारेही ते पहीलेच. ही घोषणा त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीचा केंद्रबिंदू होती. मोहानी गझलकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुमारे ७०० गझल लिहिल्या आहेत. त्यातील बहुतेक गझल या स्वातंत्र्य आंदोलनाला समर्पित आहेत. त्यांनी आपल्या गझलातून त्यांनी वसाहतवादाचा जोरदार विरोध केला. दुःखद बाब ही की, मुसलमानांनी मुहंमद इकबाल सारखं मौलाना मोहानी यांनादेखील रोमँटिक शायरी पुरतच बंदिस्त करून टाकलं. त्यामुळे मोहानींच्या व्यक्तिचित्रणाचे वेगवेगळे पैलू बाहेर येऊ शकले नाहीत. उर्दू भाषेतही त्यांच्यावर फारसं लिखाण झालेलं नाही. गझल वगळता इतर बाबतीत त्यांचे व्यक्तिचित्र पडद्यातच राहीलं. मोहनी एक पत्रकार संपादकही होते. त्यांनी तीन ते चार नियतकालिके व दैनिकं सुरू केली होती. त्यातून ते राजकीय प्रश्नावर लिहीत असत. आपल्या लेखणीतून त्यांनी ब्रिटिशांविरोधात जाहीर भूमिका घेतलेली आहे. त्यांचे लिखाण जहाल स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यांचे वृत्तपत्र अलीगडमधील कुठलेही प्रेस छापण्यास पुढे येत नसत. त्यांनी वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेले राजकीय लिखाण प्रचंड आहे. त्याचं संकलन होण्याची गरज आहे.