Jump to content

हडसर

हडसर
नावहडसर
उंची४६८० फुट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी.
ठिकाणपुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गावहडसर,जुन्नर
डोंगररांगसह्याद्री
सध्याची अवस्थाचांगली
स्थापनाअज्ञात


हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.

  • २१ डिसेंबर २०२०, रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले हडसर वरती लोकसहभागातून भव्य असे महाद्वार लावण्यात आले आणि ह्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

इतिहास

पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे.

सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.

१६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.

यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरूंग लावून फोडल्या.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

  • प्रवेशद्वार - हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कल, नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते.
  • पाण्याचे टाके व कातळात कोरलेली कोठारे - दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.
  • तलाव व महादेवाचे मंदिर - येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे.
  • बुरुज व तलाव - मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे.
  • कातळात कोरलेल्या गुहा - येथून थोडे पुढे कातळात खोदलेली प्रशस्त गुहा आहे.
  • इतर - मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर दिसतो. समोरच चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.

जाण्याच्या वाटा

या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत.

  • यापैकी एक वाट राजदरवाज्याची व दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या बांधून काढलेली आहे. राजदरवाज्याच्या वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते.
  • जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसऱ्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे.
  • मुंबई, ठाणे कडून येणाऱ्यांनी कल्याण वा ठाण्यावरून माळशेजमार्गे जाणारी कोणतीही एस. टी. बस पकडावी जसे - आळेफाटा, ओतूर, जुन्नर, अहमदनगर इ. त्यानंतर ३-४ तास प्रवास करून माळशेज घाट संपल्यानंतर १५-२० मिनिटावर असलेल्या सितेवाडी फाट्यावर उतरावे. तिथून किल्ला लगेचच नजरेस पडतो. उजवीकडे तिरप्या वाटेने वाडीतून घरे- शेतं ओलांडत अर्ध्या तासातच किल्ल्याची तटबंदी खाली येऊन पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी कातळात पायऱ्या खोदून काढल्या आहेत व आधारासाछी लोखंडी गज लावले आहेत त्यामुळे या वाटेने चालत राहावे. ही वाट खड्या चढणीमुळे अवघड वाटत असली तरी फार सोपी अशी आहे. एक पाऊल मावेल एवढ्या खोबण्या आहेत परंतु पकडायला मजबूत भक्कम आणि सुस्थितीत असलेले लोखंडी गजांमुळे भीती वाटत नाही. २०-२५ फुटांचा टप्पा हा उभ्या कातळात असल्याने सावधपणे पार केला की तिथेच समोर एक छोटी गुहा दिसते, त्यात गाळ असल्यामुळे ती पाहून पुढे गेल्यानंतर तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश करता येतो. सितेवाडी पासून इथपर्यंत येण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. ही वाट एस. टी. बसचा प्रवासखर्च, प्रवासवेळ, आणि पायपीट दमछाक वाचवणारी आहे त्यामुळे येण्या-जाण्यास फार सोयीची आहे.

बाह्य दुवे