Jump to content

हंट्सव्हिल (अलाबामा)

हंट्सव्हिल अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील मोठे शहर आहे. मॅडिसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,८०,१०५ होती तर हंट्सव्हिल महानगराची लोकसंख्या ४,१७,५९३ होती.

हंट्सव्हिल टेनेसी नदीच्या काठी वसलेले आहे. येथे नासाचे मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर, युनायटेड स्टेट्स आर्मी एव्हियेशन मिसाइल कमांड आणि इतर अंतराळ विज्ञान आणि क्षेपणास्त्रांशी संबंधित अनेक संशोधनसंस्था आणि उद्योग आहेत.

क्षेपणास्त्र संशोधन

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या सैन्याने फोर्ट ब्लिस, टेक्सास येथून सुमारे १,००० व्यक्तींना येथे स्थलांतरित केले. यांत युद्धाच्या शेवटी पकडून आणलेल्या २०० जर्मन शास्त्रज्ञ आणि कुशल कामगारांचा समावेश होता. वर्नर फोन ब्रॉनच्या नेतृत्वातील हे लोक जर्मन क्षेपणास्त्र संशोधनातील आघाडीची फळी होती. त्यांच्या ज्ञानाचा व कुशलतेचा वापर करून १९५० च्या दशकात अमेरिकेने येथे क्षेपणास्त्र संशोधन केंद्र स्थापित केले. अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ हा येथे विकसित केलेल्या ज्युपिटर-१ या अग्निबाणाच्या सहाय्याने प्रक्षेपित केला गेला. १९५० ते १९७० दरम्यान हंट्सव्हिल हे उच्च तंत्रज्ञानाचे केंद्र होते.