Jump to content

स्वामी आनंद ऋषी

स्वामी आनंद ऋषी (जन्म : १ ऑक्टोबर १९२८) यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव खरे असे होते. आचार्य रजनीशांनी १९७१ साली दिलेल्या नवसंन्यास दीक्षेनंतर ते स्वामी आनंद ऋषी झाले.

आनंद ऋषींचे शालेय शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण बृहन्‌ महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झाले. बी.कॉम. नंतर त्यांनी कलकत्ता व लंडन येथील कॉस्ट अकौंटिंग इन्स्टिट्यूट्समधून FICWA व FCMA या फेलोशिप मिळवल्या.

आनंद ऋषी हे आई, वडील भाऊ व पाच बहिणी अशा मोठ्या कुटुंबात पुण्यात लहानाचे मोठे झाले. इ.स. १९५५ साली त्यांचा विवाह कुमारी इंदुमती कर्वे यांच्याशी झाला. पत्‍नी, तीन कन्या, तीन जावई आणि पाच नातवंडे असा त्यांचा परिवार.

स्वामी आनंद ऋषी यांनी रबर, साखर, रसायने, औषधे, पोल्ट्री व हॉटेले अशा विविध उद्योगधंद्यांच्या अर्थखात्यांमध्ये अनेक स्तरांवर नोकरी केली. इ.स. १९८८ साली स्वामी आनंद ऋषी यांनी ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या अमेरिकेतील एका उपकंपनीच्या अर्थशाखा उपाध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्यावर पुण्याच्या वेंकटेश्वर हॅचरी ग्रुपमध्ये सल्लागार व संचालक म्हणून त्यांनी आठ वर्षे काम पाहिले.

आनंद ऋषी १९६३ साली थिऑसॉफिस्ट झाले. पुढे ओशो हे नाव धारण करणारे आचार्य रजनीश यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि इ.स. १९७८ साली राजपत्रात प्रसिद्ध करून त्यांनी कायदेशीरपणे स्वामी आनंद ऋषी हे नाव स्वीकारले.

इ.स. १९८८ साली नोकरीतून निवृत्त झाल्यावर स्वामी आनंद ऋषी यांनी अनेक पुस्तके लिहिली. पातंजलयोग, पुनर्जन्म, ओशो, ध्यान, अध्यात्म इत्यादी विषयांवर त्यांचे अनेक स्फुट लेख प्रकाशित झाले आहेत, आणि याच विषयावर त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रवचने दिली.

ठाण्याच्या थिऑसॉफिकल सोसायटी, ओशो फ्रेन्ड्स, घंटाळी मित्रमंडळ योग विभाग, ताओ आनंद आध्यात्मिक केंद्र आदी संस्थांमध्ये स्वामी आनंद ऋषी यांचा सहभाग असे.

स्वामी आनंद ऋषी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अष्टावक्र गीता (नवीन प्रकाशन, पुणे)
  • दहा हजार बुद्धांसाठी शंभर कथा( उन्मेष प्रकाशन, पुणे)
  • ध्यानप्रचीती (नवीन प्रकाशन, पुणे)
  • पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास (राजहंस प्रकाशन, पुणे)
  • पातंजलयोगदर्शन : ओशो भाग २ व ३ (मूळ इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद, प्रकाशक - जीवनजागृती केंद्र, पुणे)
  • पातंजलयोगदर्शन - सारांश, सूत्रे व अर्थ (घंटाळी मित्र मंडळ (ठाणे) यांचे प्रकाशन)
  • पुनर्जन्म - कल्पना की वास्तव (मनोरमा प्रकाशन, मुंबई)
  • Empty (One Discourse) - Osho (मूळ हिंदी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद, प्रकाशक - साधना प्रतिष्ठान, पुणे)
  • Patanjalayogadarshan - A Critical Study (मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद, प्रकाशक - योग विद्या निकेतन, मुंबई)
  • Patanjalayogadarshan - Summaary, Sanskrit Sutras, Transliteration and English Translation (मूळ मराठीचा इंग्रजी अनुवाद, प्रकाशक - घंटाळी मित्रमंडळ, ठाणे)
  • पुनर्जन्माचे गूढ (मनोरमा प्रकाशन, मुंबई)
  • मला उमजलेले ओशो (उन्मेष प्रकाशन, पुणे)

स्वामी आनंद ऋषी ह्यांना किंवा त्यांच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार

  • पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचा उत्कष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (१९९६-९७)
  • पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास या ग्रंथासाठी ठाण्याच्या श्रीदत्तपद्मस्वामी यांनी आनंद ऋषी यांना दिलेला समाजगौरव पुरस्कार (१९९९)
  • पुनर्जन्म : कल्पना की वास्तव या ग्रंथाला पुण्याच्या गीताधर्म मंडळाने दिलेला प्रा. अकोलकर पुरस्कार (इ.स. २०००)
  • पुनर्जन्म : कल्पना की वास्तव या ग्रंथाला ठाण्यात झालेल्या ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातर्फे पुरस्कार (इ.स. २०१०)