स्थितप्रज्ञ
ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशा माणसाला कोणतीही आशा, अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुख व दुःख यांमुळे त्याला आनंद किंवा उद्वेग होत नाही.
कासव ज्याप्रमाणे आपले अवयव (डोके व हात, पाय) स्वतःच्या इच्छेनुसार आवरून घेते किंवा बाहेर काढते त्याप्रमाणे त्याची इंद्रिये त्याच्या पूर्णपणे ताब्यात असतात. आत्मबोधाने तो सदा संतुष्ट असतो.
याबाबत ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायात सविस्तर वर्णन आहे.
ज्ञानेश्वरी अध्याय २ मधील वर्णन
म्हणे अर्जुना परियेसीं| जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं| तो अंतराय स्वसुखेंसीं| करीतु असे || २९१||
जो सर्वदा नित्यतृप्तु| अंतःकरण भरितु| परी विषयामाजीं पतितु| जेणें संगें कीजे || २९२||
तो कामु सर्वथा जाये| जयाचें आत्मतोषीं मन राहे| तोचि स्थितप्रज्ञु होये| पुरुष जाणैं || २९३||
नाना दुःखीं प्राप्तीं| जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं| आणि सुखाचिया आर्ती| अडपैजेना || २९४||
अर्जुना तयाच्या ठायीं| कामक्रोधु सहजें नाहीं| आणि भयातें नेणें कहीं| परिपूर्णु तो || २९५||
ऐसा जो निरवधि| तो जाण पां स्थिरबुद्धि| जो निरसूनि उपाधि| भेदरहितु || २९६||
जो सर्वत्र सदा सरिसा| परिपूर्णु चंद्रु कां जैसा| अधमोत्तम प्रकाशा- | माजीं न म्हणे || २९७||
ऐसी अनवच्छिन्न समता| भूतमात्रीं सदयता| आणि पालटू नाहीं चित्ता| कवणें वेळे || २९८||
गोमटें कांहीं पावे| तरी संतोषें तेणें नाभिभवे| जो वोखटेनि नागवे| विषादासी || २९९||
ऐसा हरिखशोकरहितु| जो आत्मबोधभरितु| तो जाण पां प्रज्ञायुक्तु| धनुर्धरा || ३००||
कां कूर्म जियापरी| उवाइला अवेव पसरी|ना तरी इच्छावशें आवरी| आपुले आपण || ३०१||
तैसीं इंद्रियें आपैतीं होती| जयाचें म्हणीतलें करिती| तयाची प्रज्ञा जाण स्थिति| पातली असे || ३०२||