स्त्रासबुर्ग
स्त्रासबुर्ग Ville de Strasbourg | |||
फ्रान्समधील शहर | |||
| |||
स्त्रासबुर्ग | |||
देश | फ्रान्स | ||
राज्य | अल्सास | ||
विभाग | बास-ऱ्हिन | ||
क्षेत्रफळ | ७८.२६ चौ. किमी (३०.२२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ७०० फूट (२१० मी) | ||
लोकसंख्या (२०१९) | |||
- शहर | २,८७,२२८ | ||
- घनता | ३,४८८ /चौ. किमी (९,०३० /चौ. मैल) | ||
- महानगर | ७,९०,०८७ | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
https://www.strasbourg.eu/ |
स्त्रासबुर्ग (फ्रेंच: Strasbourg; जर्मन: Straßburg) हे ईशान्य फ्रान्समधील अल्सास प्रांतातील प्रमुख शहर आहे. स्त्रासबुर्ग शहर जर्मनी व फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ऱ्हाइन नदीच्या काठावर वसले आहे. युरोपियन संघाच्या संसदेचे मुख्यालय स्त्रासबुर्ग शहरात स्थित आहे. तसेच युरोपियन संघापासून वेगळ्या असलेल्या युरोपाच्या परिषदेचे मुख्यालय देखील स्त्रासबुर्गमध्येच स्थित आहे. त्याचबरोबर युरोपातील अनेक संस्थांची मुख्यालये व कार्यालये ह्या शहरात आहेत. येथील स्त्रासबुर्ग विद्यापीठ हे फ्रान्समधील सर्वांत मोठे विद्यापीठ आहे. २०१९ साली सुमारे २.८७ लाख लोकसंख्या असलेले स्त्रासबुर्ग हे पूर्व फ्रान्समधील सर्वात मोठे शहर आहे.
इ.स. पूर्व १२ साली स्थापना झालेले स्त्रासबुर्ग इ.स. ३६२ ते इ.स. १२६२ दरम्यान रोमन कॅथलिक चर्चच्या अधिपत्याखाली होते. १२६२ साली येथील नागरिकांनी चर्चची सत्ता उलथावून लावली व स्त्रासबुर्ग पवित्र रोमन साम्राज्यामधील एक स्वायत्त शहर बनले. इ.स. १६८१ साली चौदाव्या लुईने अल्सासवर विजय मिळवल्यानंतर स्त्रासबुर्ग फ्रान्सच्या अधिपत्याखाली आले. इ.स. १८७१ साली फ्रान्स-प्रशिया युद्धात प्रशियाने फ्रेंच साम्राज्याचा पराभव करून स्त्रासबुर्गला जर्मनीमध्ये जोडले. इ.स. १९१८ साली पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला व स्त्रासबुर्ग पुन्हा फ्रान्सच्या ताब्यात आले. परंतु १९४० साली दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने फ्रान्सवर विजय मिळवून पुन्हा स्त्रासबुर्गवर अधिपत्य प्रस्थापित केले. इ.स. १९४४ पासून स्त्रासबुर्ग फ्रान्समधील एक प्रमुख शहर आहे.
आजच्या घडीला आपल्या गॉथिक वास्तूशात्रासाठी स्त्रासबुर्ग युरोपातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. स्त्रासबुर्ग रेल्वे स्थानक स्त्रासबुर्गला पॅरिस, फ्रांकफुर्ट, श्टुटगार्ट, बासेल इत्यादी महत्त्वाच्या युरोपीय शहरांसोबत जोडते. येथील आर.सी. स्त्रासबुर्ग हा लीग १मध्ये खेळणारा एक प्रमुख फुटबॉल क्लब आहे.
आंतरराष्ट्रीय संस्था
स्त्रासबुर्ग येथे सुमारे २० आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालये कार्यरत आहेत. ब्रसेल्स व लक्झेंबर्गसोबत स्त्रासबुर्गला युरोपाची राजधानी समजले जाते.
- सेंट्रल कमिशन फॉर नॅव्हिगेशन ऑन ऱ्हाईन
- युरोपाची परिषद
- युरोपियन संसद
- युरोपियन लोकायुक्त
- युरोकॉर्प्स
- युरोपियन विज्ञान प्रतिष्ठान
- मानवी हक्क आंतरराष्ट्रीय संस्था
- साखारोव्ह पुरस्कार
बाह्य दुवे
विकिव्हॉयेज वरील स्त्रासबुर्ग पर्यटन गाईड (इंग्रजी)