Jump to content

स्टॅन्ले हेन्री प्रेटर

स्टॅन्ले हेन्री प्रेटर (मार्च १२, इ.स. १८९० - ऑक्टोबर १२, इ.स. १९६०) हे अँग्लो इंडियन समाजाचे ब्रिटिश निसर्गवादी होते. ते मुंबईच्या बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय या दोन संस्थांचे अभिरक्षक, अर्थात क्युरेटर, होते. या दोन्ही संस्थांवर ते सुमारे २५ वर्षे कार्यरत होते. प्रेटर यांनी सस्तनी प्राण्यांवर लिहिलेले द बुक ऑफ इंडियन एनिमल्स (१९४८) हे पुस्तक विशेष गाजले.

प्रेटर यांचा जन्म दक्षिण भारतातील निलगिरीचा. त्यांचे वडील विल्यम प्रेटर कॉफीचे उत्पादक होते. लहानपणापासून स्टॅन्ले हेन्री प्रेटर यांना निसर्गाची आवड होती.

प्रेटर यांचे शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी शाळेत झाले आणि सह्याद्री डोंगर रांगांमध्ये त्यांनी निसर्ग विषयाचा अभ्यास केला. इ.स. १९०७ मध्ये प्रेटर यांनी बी.एन.एच.एस. सदस्यत्व स्वीकारले. १९११- ते १९२३ या काळात संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात त्यांनी भाग घेतला आणि निसर्ग विषयाच्या त्यांच्या ज्ञानात भर पडली.

इ.स. १९२३ मध्ये प्रेटर बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय या दोन्ही संस्थांचे अभिरक्षक पद स्वीकारले आणि पुढील २५ वर्षे ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी त्याच काळात इंग्लंड आणि अमेरिकेत जाऊन प्राण्यांवर शास्त्रोक्त अभ्यास केला. त्यापुढील काळात बी.एन.एच.एस. द्वारे प्रकाशन होणाऱ्या जर्नल ऑफ बी.एन.एच.एस.चे मुख्य संपादक पद त्यांनी सांभाळले. या नियतकालिकेत त्यांनी लिहिलेल्या लेखांचे जगभर कौतुक झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळाने प्रेटर यांनी भारत सोडून इंग्लंड मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९६० साली दीर्घ आजारपणानंतर स्टॅन्ले हेन्री प्रेटर यांचे तेथेच निधन झाले.