Jump to content

सौंदर्यसाधना

सौंदर्यसाधना म्हणजे प्रभावी, आकर्षक व सुस्वरूप व्यक्तिमत्त्वाचे संवर्धन करणारी एक कला साधना. स्त्री-पुरुष आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी व आकर्षक होण्यासाठी ज्या प्रक्रिया करतात व उपाय योजतात, त्याला सौंदर्यसाधना म्हणतात. त्यात शरीरसौष्टव टिकविण्याबरोबरच सौंदर्य-प्रसाधनांना विशेष महत्त्व असते कारण सौंदर्य-प्रसाधनांच्या सौंदर्यासाठी वापरण्याच्या क्रिया किंवा प्रक्रियाद्वारे सौंदर्यसाधना केली जाते. स्त्री व पुरुष यांच्या उत्पत्तीबरोबरच एकमेकांना आकर्षित करण्यासाठी सौंदर्यसाधना ही संकल्पना निसर्गतःच अस्तित्वात आली असावी.

सौंदर्य साधनेला प्राचीन इतिहास असून तत्संबंधीचे दाखले व उल्लेख भारत व भारतेतर प्रदेशांत इ.स.पू. पाचव्या सहस्रकांपासून मिळतात. ईजिप्शियन संस्कृतीतील (इ.स.पू.५०००–६४०) नेफरतीती, हॅटशेपसट व क्लीओपात्रा या राज्यांनी आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व टिकविण्यासाठी सौंदर्यसाधना केल्याचे दाखले मिळतात. यांपैकी क्लीओपात्रा ( इ.स.पू.६९?– इ.स.पू.३०) हिच्या सौंदर्यसाधनेविषयीच्या अनेक दंतकथा-वंदता आढळतात. तिच्यावर विल्यम शेक्सस्पियरने नाटकही लिहिले आहे. ग्रीक संस्कृतीत (इ.स.पू. २४००–५५०) हेटीअरा या गणिकासदृश वारांगनांची संस्था ग्रीसमधील उच्चभ्रू समाजाच्या मनोरंजन व ऐहिकसुख यांसाठी कार्यरत होती. त्या फुलांनी सजविलेले कपडे परिधान करून तसेच तत्कालीन सौंदर्यसाधने वापरून सौंदर्यसाधना करीत असत.