Jump to content

सोहराब मोदी

सोहराब मोदी
जन्म इ.स. १८९७
मृत्यू इ.स. १९८४
राष्ट्रीयत्व भारतीय

सोहराब मेहेरवानजी मोदी (१८९७ - १९८४) हे भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. यांचा जन्म २ नोव्हेंबर, १८९७ रोजी मुंबई येथे एका सामान्य पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबईतील भरडा हायस्कूल येथे झाले. त्यानंतर ग्वाल्हेर येथे पोर्टेबल पॅथे सेटवर त्यांनी मूकपट प्रदर्शनाचा व्यवसाय केला. नंतर मोदींनी नासिकजवळ देवळाली येथे छावणीतील ब्रिटिश सैनिकांना फिरता सिनेमा दाखवण्याचा उपक्रम केला. त्याचवेळी दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटनिर्मितीचा त्यांना जवळून परिचय झाला.

रंगभूमीवरील काम

१९२४ मध्ये आर्य सुबोध नाटक मंडळीत नट म्हणून त्यांनी प्रवेश केला. इंग्रजी व उर्दू अशा दोन्ही नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यांची हॅम्लेटची भूमिका उल्लेखनीय आहे. ११ वर्षे रंगभूमीवर काम केल्यानंतर १९३५ साली पुण्यात आपल्या भावाबरोबर स्टेज फिल्म कंपनी स्थापन केली. खून का खून (हॅम्लेट) हा त्यांचा त्यांची प्रमुख भूमिका व दिग्दर्शन असलेला पहिला बोलपट होता.

त्यानंतर त्यांनी मुंबईत स्थायिक होऊन मिनर्व्हा मुव्हीटोनची स्थापना केली (१९३६). या कंपनीचे पहिले तीन चित्रपट पडले पण जेलर (१९३८) हा चित्रपट यशस्वी ठरला. त्यानंतर मोदींनी पुकार (१९३९), सिकंदर (१९४१) व पृथ्वीवल्लभ (१९४३) हे तीन भव्य ऐतिहासिक चित्रपट निर्माण केले. याचे नंतर गुजरातीतही भाषांतरण केले होते. या तीनही चित्रपटांत त्यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.

शीशमहल व भरोसा हे त्यांचे इतर उल्लेखनीय चित्रपट. मोदींचा झाँसी की रानी (१९५३) हा चित्रपट पहिला भारतीय रंगीत चित्रपट होय. हा चित्रपट फ्लेम अँड टायगर या नावाने तो इंग्लिशमध्ये प्रदर्शित केला गेला होता. मिर्झा गालिब (१९५४) या त्यांच्या चित्रपटाला सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतरचा त्यांचा कुंदन (१९५५) हा चित्रपट ला मिझराब या फ्रेंच कादंबरीवर आधारित होता.

मीनाकुमारीकी अमर कहानी (१९७६) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता तर रझिया सुलताना (१९८३) या चित्रपटातील वझिरे- आझमची केलेली भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका होती. आपल्या मिनर्व्हा मुव्हीटोन संस्थेतर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले असून २५ चित्रपटांचे दिग्दर्शन व २६ चित्रपटातून स्वतः भूमिका केल्या होत्या. त्यांच्या नवरत्न नाटक कंपनीने गुजराती भाषेतील धरतीनो छेडो घर व उर्दू भाषेतील सुबह का भूला ही नाटके सादर केली. उंच व भरदार शरिरयष्टी, भेदक डोळे, करारी मुद्रा, गंभीर धारदार आवाज, शब्दांची प्रभावी फेक करण्याची कुशलता या गुणांनी त्यांच्या भूमिका परिणामकारक होत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मेहताब ही त्यांची पत्नी होय. १९७९ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेबद्दल दादासाहेब फाळके पारितोषिक बहाल करण्यात आले.

मृत्यू

मुंबई येथेच २८ जानेवारी १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.