Jump to content

सोलापूर जिल्ह्यातील मध्ययुगीन गढया

सोलापूर जिल्हा हा मध्ययुगात मराठ्यांच्या प्रशासनात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पहिला पेशवा होण्याचा मान हा सोलापूर जिल्ह्यालाच जातो. शामराज नीळकंठ हे करमाळा तालुक्यातील हिवरे येथील होते. मराठी काळातील या सर्व स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांना पारंपरिक हक्क आणि अधिकारी मानपान वतने, खास अधिकार आणि रोख पगारही दिला जात असे. या सर्व अधिकाऱ्यांना कारभार करण्यासाठी त्या त्या विभागातील अधिकार दिल्याचे दिसते. भाळवणीचे नाईक निंबाळकर, दहिगावचे नाईक निंबाळकर, गुरसाळे येथील कवडे घराणे, करमाळ्याचे राव रंभा निंबाळकर घराणे, अक्कलकोटचे राजे भोसले घराणे या घराण्यातील कर्त्या पुरुषांनी इतिहासात मोलाची कामगिरी केली. अशी अनेक घराणी सोलापूर जिल्ह्यातील मराठ्यांच्या प्रशासनात कार्यरत होती. अशा प्रशासनात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांच्या सरदारांच्या वास्तू आजही सोलापूर जिल्ह्यात इतिहासाची साक्ष देतात. या अधिकाऱ्यांच्या गढया, वाडे, त्यांच्या सनदा कागदपत्रे हत्यारे अस्तित्वात आहेत.

गढी

  गढी ही खास राहण्यासाठी बांधलेली वास्तू होय. लहान आकाराचा मातीचा भुईकोट किल्ला किंवा संरक्षक कोट असलेले राहण्याजोगे घर. अशा सोप्या शब्दात गढीची व्याख्या करता येते. ही गढी सर्व सोयीयुक्त असे. गढीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व व त्यांच्याकडे असलेली संपत्ती यानुसार गढीचा आकार व ताकद ठरत असे. त्यांच्या भौगोलिक रचनेनुसार त्यांची मजबुती अवलंबून असे. मराठ्यांनी आपल्या राजवटीत अनेक गढया बांधल्या. सतराव्या शतकात छत्रपती राजारामांच्या काळापासून जहागिरीची पद्धत पुन्हा निर्माण  झाली. त्यामुळे अनेक सरदार उदयास आले. त्यांनी दिलेल्या जागेत त्यांनी आपल्या सोयीनुसार गढया बांधल्या होत्या.
   गढी हा प्रकार जवळजवळ किल्ल्यासारखा असतो. परंतु गढी ही प्रामुख्याने सरदारांचे निवासस्थान असते. त्यामध्ये नागरी सुविधा निर्माण केलेल्या दिसून येतात. गढीच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूला किल्ल्याप्रमाणेच उंच दगडी भिंत, काही वेळा विटांची तटबंदी, खंदक व भक्कम दरवाजे बांधलेले असतात. गढीचा मुख्य उद्देश जरी निवासस्थानासाठी असला तरी प्रत्यक्षात गढीचा भव्य देखावा एखाद्या किल्ल्याप्रमाणे वाटतो. गढीचा आकार व तिची शक्ती ही तिच्या धन्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. गढीची अनेक वैशिष्टय़े आहेत गढीचा आराखडा, गढीची तटबंदी, गढीचे बुरूज, गढीचे प्रवेशद्वार, जंगी धान्याची कोठारे, टेहळणीची जागा, पाणी पुरवठ्याच्या सोयी, तळमजला, स्वयंपाकगृह आणि वैशिष्टय़पूर्ण नक्षीकामाने गढीची रचना केलेली असते.


हेही पाहा