Jump to content

सोलापूर जिल्हा

हा लेख सोलापूर जिल्ह्याविषयी आहे. सोलापूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


सोलापूर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
सोलापूर जिल्हा चे स्थान
सोलापूर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावपुणे विभाग
मुख्यालयसोलापूर
तालुके१. उत्तर सोलापूर,२. दक्षिण सोलापूर,३. अक्कलकोट,४. बार्शी, ५. मंगळवेढा, ६. पंढरपूर, ७. सांगोला, ८. माळशिरस, ९. मोहोळ, १०. माढा, ११. करमाळा
क्षेत्रफळ
 - एकूण १४,८९५ चौरस किमी (५,७५१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४३,१७,७५६ (२०११)
-लोकसंख्या घनता२९० प्रति चौरस किमी (७५० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३२.४%
-साक्षरता दर७७.७
प्रशासन
-जिल्हाधिकारीश्री.
-लोकसभा मतदारसंघसोलापूर, माढा, उस्मानाबाद (काही भाग)
-विधानसभा मतदारसंघ१. सोलापूर शहर उत्तर, २. सोलापूर शहर मध्य, ३. सोलापूर दक्षिण, ४. बार्शी, ५. मोहोळ, ६. माळशिरस, ७. माढा, ८. सांगोला, ९. पंढरपूर, १०. करमाळा, ११. अक्कलकोट
-खासदारजयसिद्धेश्वर महास्वामी़ - सोलापूर, रणजितसिंह नाईक निंबाळकर - माढा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ५४५.४ मिलीमीटर (२१.४७ इंच)
प्रमुख_शहरे सोलापूर , पंढरपूर , अक्कलकोट , बार्शी

मोहोळ , माळशिरस , अकलूज

संकेतस्थळ


सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागात आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध) व अक्कलकोटसारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर शहराने तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे. संतांची भूमी व ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे.[] सोलापूर शहर हा एकूण १६ गावानी मिळून बनलेला आहे म्हणून त्या जिल्ह्याला सोलापूर हे नाव पडलेले आहे. तसेेच अकलूज येथील किल्ला, अकलाई मंदिर आणि वाॅटर पार्क प्रसिद्ध आहे.

विशेष

जन्मासी येऊनी, पहा रे पंढरी !! असे पंढरपूरबाबत म्हणले जाते, ज्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविकच नव्हे, तर दक्षिणेकडील राज्यांतील भाविकही येत असतात असे पंढरपूर तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. यावरूनच सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व लक्षात येते. अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हणले जाते.[]

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावाच्या काळात आधुनिकतेचा स्पर्श काहीशा कमी वेगाने सोलापूरला होत असला, तरीही अगत्य, मनमोकळेपणा, थोडासा साधे-भोळेपणा, पारंपरिकता, बहुभाषिकत्व हे येथील मातीचे गुण आहेत. पर्यटन, फलोत्पादन, कृषिप्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज ही ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आली आहे . महाराष्ट्राच्या दृष्टीने ती एक अत्यंत महत्त्वाची अशीच बाब आहे

या जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे सांगोला, ज्या तालुक्याचे नाव गिनीज बुकात नोंद आहे असा हा तालुका. सांगोला तालुका दोन गोष्टीसाठी ओळखला जातो . एक म्हणजे डाळींबासाठी व दुसरे म्हणजे एका तालुक्यावर सर्वात जास्त वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे ओळखला जातो .

इतिहास

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या आहेत. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हणले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हणले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) स्वतंत्र झालेला असा हा पहिला भाग ! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हणले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापूरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन केसरी मध्ये आढळतात. शस्त्रात्रे अक्कलकोट येथील वस्तूसंग्रालय सोलापूरात जतन करण्यात आली आहे

सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंद्रबत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बाहमनि घराण्याच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे ही धारणा आहे.

पण नवीन अध्ययनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगे असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे संबोधन सोन्नलगी असे होते. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे संबोधले जातात. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.

मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासनांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे उच्च्यार कायम केले.

सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इ. स. १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इ. स. १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इ. स. १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इ. स. १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९६५ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इ. स. १९६० मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून विकसित झाला.

स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना तीन दिवसापासून म्हणजे शके १९३०ला मे ९, १०, ११ स्वातंत्र मिळाले. थोडक्यात इतिहास अशाप्रकारे कार्य करतो. मे १९३०ला महात्मा गांधी यांना अटक झाली. संपूर्ण भारतभर ब्रिटिश नियमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलन देखील सोलापूरात करण्यात आले. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांचा जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते श्री. रामकृष्ण जाजू यांनी १९३० मे मध्ये ९, १०, ११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली.

स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे जेष्ठ स्वातंत्रसैनिक श्री. अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केले. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्रसैनिक श्री मल्लप्पा धंनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाणे मध्ये दोन पोलिसांच्या हत्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने पण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर (शहराने) तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे. संताची भूमी व ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे.

भूगोल

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४,८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापूरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात सोलापूर जिल्ह्यातील खळवे गाव माळशिरस तालुक्यात आहे

पर्जन्याचा ) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ (इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगरधाराशिव पूर्वेला धाराशिव, दक्षिणेस सांगलीविजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारापुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमा नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी (१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हणले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा बोगदा आणि पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगात ज्वालामुखीचा केंद्र बिंधू आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.

तालुके

सोलापूर जिल्ह्याचे तालुके

राजकीय संरचना

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर, माढा माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

विधानसभा मतदारसंघ (११) : मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, अक्कलकोट, पंढरपूर , करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, बार्शी. नवीन वैराग तालुका प्रस्तावित आहे.

शेती

हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे तरी उजनी धरणामुळे येथील बागायत क्षेत्र १८ ते २०% आहे. यावर प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जाते. एकूण ७५ ते ८२ % शेती लहरी पावसावर अवलंबून आहे.

सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हणले जाते. रब्बी मोसमातल्या ज्वारीखालील क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर आहे. ज्वारी ह एक धान्यप्रकार आहे. हे एक तृणधान्य आहे. यास जोंधळा असेही म्हणतात. या वनस्पतीला इंग्रजीत Great millet असे म्हणतात. खरीप ज्वारीचे क्षेत्र सुमारे १५०० हेक्टर आहे. ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिद्ध आहे. १९९० मध्ये आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली. डाळिंब (सुमारे ३० हजार हेक्टर), बोर (सुमारे २० हजार हेक्टर) या पिकांसह आंबा (९ हजार हेक्टर), सीताफळ, आवळा, जांभूळ यांच्या फळबागा कमी पाऊस असूनही केवळ विशिष्ट हवामानामुळे जिल्ह्यात वाढत आहेत. तसे फळ-प्रक्रिया उद्योगाबद्दलही आकर्षण वाढते आहे. द्राक्षाचीही लागवड जिल्ह्यात अधिकाधिक होत आहे. मोहोळ, पंढरपूर इ. तालुक्यांत द्राक्षापासून बेदाणेही तयार केले जातात. सांगोलापंढरपूर तालुक्यांमध्ये बोर, डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

सोलापूर जिल्ह्यात मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले) कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. तसेच जिल्ह्यात रब्बी ज्वारी संशोधन केंद्र व डाळिंब संशोधन केंद्रही आहे. सोलापूर जिल्ह्यातील कृषितज्ज्ञ व कृषि-अधिकारी श्री.वि. ग. राऊळ यांनी प्रामुख्याने फळबाग क्षेत्रात केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात क्रांती घडवून आणली. डाळींब, बोर तसेच सूर्यफूल, करडई या पिकांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना संघटितही केले.

सांगोल्याची डाळींब युरोपीय देशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात असलेल्या हवामान बदलामुळे दरवर्षी चांगला दर मिळणाऱ्या डाळिंबाला सध्या कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यावर अली आहे. पण सांगोला तालुक्यातील एका तरुणाने मात्र या सगळ्यावर मात करत आपल्या बागेतील डाळिंब थेट युरोपीय देशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

सोलापूर जिल्ह्यामधील तालुका उत्तर सोलापूर मध्ये रानमसले साधारण ५००० लोक संख्या असणारे एक गाव आहे. या गावाचे वैशिष्ट असे आहे कि या गावात कांदा खूप पिकवला जातो. सोलापूर, मुंबई हैद्राबाद बंगलोर या ठिकाणी कांदा विकण्यासाठी जातो.बार्शी तालुक्यात नारी, नारीवाडी ही गावे द्राक्षे फळ पिकासाठी प्रसिद्ध आहेत.

उद्योग

सोलापूर औद्यागिकदृष्ट्याही विकसित होत आहे. जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध होता. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्स भारतभर प्रसिद्ध आहेत. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे. काही कंपन्या आपल्या मालाची १००% निर्यातही करतात. सोलापूर शहर व आसपासच्या भागात विडी उद्योग अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा उद्योग आहे. सुती कापड उद्योग व विडी उद्योग यांमध्ये प्रामुख्याने तेलुगू भाषिक विणकर समाजाचा मोठा वाटा आहे. रसायन निर्मिती उद्योग येथील वैशिष्ट्य आहे.

दूध डेअरी, कृषिप्रक्रिया उद्योग, गोमय उत्पादने व साखर कारखाने या उद्योगांच्या माध्यमातून लोकमंगल हा उद्योग जिल्ह्यात अनेकांचे रोजगाराचे साधन बनत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सूत गिरण्या आहेत. कॅम शॅफ्ट्स बनवणारा प्रिसिजन उद्योग जिल्ह्यातील प्रमुख उद्योग बनू पाहतो आहे. तसेच सोलापूर शहराजवळ किर्लोस्कर कंपनीचा शिवाजी वर्क्स लिमिटेड हा इंजिन ऑटो पार्ट्‌स बनवणारा कारखाना आहे. केम येथील हळदीपासून बनवले जाणारे कुंकू प्रसिद्ध असून पंढरपूर, सांगोलामंगळवेढा या तालुक्यांतील विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यात पूर्वी अनेक छोट्या-मोठ्या सूत गिरण्या होत्या. हळूहळू यंत्रमाग वाढत गेले. गिरणगाव ही सोलापूरची ओळख पुसट होत असली तरीही आजचे यंत्रमाग कुशल व कष्टाळू कामगार व मोजके हातमाग यांच्या माध्यमातून मनमोहक साड्या, जेकॉर्ड चादरी, टर्किश टॉवेल्स, पडदे व वॉल हँगिग्ज यांचे उत्पादन आजही सोलापूरात मोठ्या प्रमाणावर होते आहे.

दळणवळण

सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडीहोटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर - विजापूरमिरज - लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुबनेश्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. सोलापूर हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.

सोलापूर शहर रस्ते वाहतूकी सोबत महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर सांगली इचलकरंजी पुणे सातारा नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तसेच पुर्वेकडील जालना हिंगोली नांदेड इ महानगरांसोबत जोडले आहे. तसेच जवळील कर्नाटक राज्याशी ही सोलापूर शहर रस्ते वाहतूकी ने जोडले आहे.

सोलापूर जिल्ह्यातून पुणे-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ जातो. तसेच सोलापूर-विजापूर-मंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ ही जातो. सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ जातो. रत्‍नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.२०४ ही सोलापूर जिल्ह्यातून जातो. सिकंदराबाद सोलापूर महामार्ग प्रस्तावित आहे.

पर्यटन

धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरतो तो प्रामुख्याने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरपूरमुळेच. आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. हे पूर्ण महाराष्ट्राचेच प्रमुख धार्मिक उत्सव आहेत.

महाभारतकाळात भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद राजाला वर दिला. त्यानुसार भक्त पुंडलिकरूपी मुचकुंद राजाला श्रीकृष्णाने विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहून दर्शन दिले अशी कथा सांगितली जाते. येथे विठ्ठल व रुक्मिणीची मंदिरे वेगवेगळी आहेत. विठ्ठल मंदिर हे शिल्पकलेचा उत्तम नमुनाही मानले जाते. मराठी माणसाची संस्कृती, अध्यात्म व जीवन समृद्ध करणारे काव्य संत-कवींनी रचले, ते विठ्ठलाप्रती असलेल्या भक्ति-प्रेमातूनच! महाराष्ट्रात यादव काळापासून जी सामाजिक व आध्यात्मिक क्रांती सुरू झाली. तिचे प्रमुख केंद्र चंद्रभागेचे वाळवंटच होते. पंढरपूर सोलापूर-कोल्हापूर मार्गावर असून सोलापूरपासून ६७ कि.मी. अंतरावर आहे.

सोलापूर शहरात कंबर तलाव या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात अनेक प्रकारची पशु-पक्षी, प्राणी हे पहावयास मिळतात. येथे सिंह, बिबट्या, मगर, माकडे, काळविट व हरणे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

जिल्ह्यात मंगळवेढा येथे श्री दामाजीपंतांचे मंदिर आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वराचे एकमेवाद्वितीय असे हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. बाराव्या शतकात यादव काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेल्याचा उल्लेख आढळतो. दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग कुडल येथे भीमा-सीना संगम झालेला आहे. या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे हे आज जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथे संगमावर अकराव्या शतकात बांधलेली (कोरलेली) हरिहरेश्वर व संगमेश्वर ही अजिंठा-वेरूळची लेणी वेरुळच्या शिल्पकलेशी साम्य असलेली महादेव मंदिरे आहेत. या ठिकाणी उत्खननात जगातील एकमेव असे दुर्मीळ शिवलिंग सापडलेले आहे. या ४ फुटी शिवलिंगावर शिवाची ३५९ मुखे व अन्य मूर्ती कोरल्या आहेत. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अनेक दरवाजे ओलांडून सूर्यकिरणे शिवलिंगावर पडतात.

भारतात विष्णूची मंदिरे अतिशय कमी ठिकाणी आहेत. या जिल्ह्यात ते बार्शी येथे आहे. या हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिरामुळे बार्शीला भगवंताची बार्शी म्हणतात. एकादशीला पंढरपूरात विठोबाचे दर्शन घेणारा वारकरी द्वादशीला बार्शीच्या भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या गावी परत जात नाही. जिल्ह्यातील सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर, भीमा नदीच्या तीरावर माचणूर येथे महादेवाचे पुरातन मंदिर आहे. अकलूज येथे नीरा नदीच्या काठी प्रेक्षणीय किल्ला असून करमाळा येथेही प्रसिद्ध भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर आहे. मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत सोलापूरात बांधला गेलेला भुईकोट किल्ला हे जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य. किल्लाबांधणी शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला १४ व्या शतकात बांधला गेल्याचे इतिहासकार सांगतात. १६८५-८६ या काळात औरंगजेब सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ही नाणी आजही कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला. ( इंग्रज आणि मराठे यांच्यातील शेवटची लढाई जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे १८१८ मध्ये झाली आणि मराठेशाहीचा अंत झाला.)

हत्तरसंग कुडल तालुका-दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर

भिमा आणि सीना या दोन नदींच्या संगमावर दोन प्राचीन मंदिरे आहेत.संगमेश्वर आणि हरिहरेश्वर आशी त्या मंदिरांची नावे आहेत.

हरिहरेश्वर मंदिर पुर्णपणे मातीत गाडले गेले होते, सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्रा.गजानन भिडे यांनी हरिहरेश्वर मंदिराची उत्खनन करून ते उजेडात आणले. ही दोन्ही मंदिरे अद्वितीय शिल्पकला आणि वास्तूकलेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

नान्नज येथीक माळढोक अभयारण्य

जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य व धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर तलाव) पक्षी अभयारण्य - ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. सोलापूर शहरातील कंबर तलावात (संभाजी तलाव) दुर्मीळ पक्षी येत असल्याचे येथील पक्षीतज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी यांनी अभ्यासले, तसेच त्यांनी नान्नज येथे माळढोकही शोधून काढला. कंबर तलाव हा सोलापूरचे एक फुफ्फुस आहे. येथे ६५ प्रकारचे पाणपक्षी असून, हिवाळ्यात येथे १४ जातींची रानबदके परदेशातून येतात. मध्य आशिया, सैबेरिया, चीन, युरोप येथून ही रानबदके येतात. ढोक, ढिबरा, कव्हेर जातीचे मासेही या तलावात मुबलकपणे आढळतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ कै. सलीम अली यांचे हे आवडते ठिकाण होते. याच तळ्याच्या परिसरात १४ उपवनांसह स्मृतिवनही तयार करण्यात आले आहे. आम्रवन, चंपक वन, अशोक वन, गणेश वन इत्यादी उपवने सामाजिक वनीकरण खात्यामार्फत विकसित करण्यात आली आहेत. हे स्मृतिवन देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

१९७९-८० मध्ये नान्नज (उत्तर सोलापूर तालुका) येथे माळढोक पक्षी अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. तीन फुटी उंची व २० ते २५ कि. वजनाचे माळढोक आज जगात फक्त सुमारे ५०० संख्येनेच उरलेले आहेत. त्यातील सुमारे २५ माळढोक नान्नज येथे आढळतात. जिल्ह्यातील माढा, मोहोळ व करमाळा हे तीन तालुके या अभयारण्यांतर्गत येतात. रेवणसिध्येश्वर मंदिर वनविहार प्रसिद्ध आहे.

सामाजिक / विविध

सोलापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे, तसेच आंध्र प्रदेश हे राज्यही सोलापूर जिल्ह्याला जवळ आहे. साहजिकच धनगर भाषिक लोकांची संख्या येथे लक्षणीय आहे. तसेच मराठी भाषकांची संख्याही या जिल्ह्यात जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषांचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते. येथील मराठी बोली विशिष्ट हेलकाव्यांसह (हेल काढून) बोलली जाते. मराठी बोली भाषेच्या उच्चारशैलीवर प्रामुख्याने धनगर भाषेचा प्रभाव जाणवतो. येथील लोक परस्परांशी मराठी, कन्नड, तेलुगू व हिंदी अशा सर्व भाषांत सहजतेने बोलताना आढळतात. येथे लिंगायत, मराठा व धनगर जातीचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात. बंजारा (गोरमाटी) तांड्यामध्ये राहतात.

येथील धनगर व मराठा लोक गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात राहत आहेत. ते येथील मातीशी समरस होऊन गेले आहेत. त्यांची केवळ बोली मराठीत. बहुतांश लोक कन्नड / तेलुगू लिहू शकत नाहीत. बहुभाषिक लोक सोलापूर जिल्ह्यात राहत असूनही येथे कोणत्याही कारणांवरून मराठी, कन्नड, तेलुगू लोकांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसत नाही. परंपरा मानणाऱ्या लोकांमुळे व शहरीकरण फारसे वेगाने न झाल्यामुळे जिल्ह्याचा तोंडावळा पारंपरिक व ग्रामीण आहे.

सोलापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीसिद्धरामेश्वर यांच्या समाधी मंदिराबरोबरच सोलापूरची या मंदिराशी जोडलेली गड्ड्याची यात्रा सोलापूर जिल्ह्यात व कर्नाटकातील काही भागांत प्रसिद्ध आहे. या यात्रेस काठीची यात्रा किंवा योगदंडाची यात्रा असेही म्हणले जाते. सिद्धरामेश्वराच्या योगदंडाचा विवाह सोहळा (किंवा अक्षता सोहळा) सोलापूरात मकर संक्रांतीच्या काळात तीन दिवस (भोगी, संक्रांत, किंक्रांत) साजरा केला जातो. १८ व्या शतकात संत शुभराय यांनी संपूर्ण वाळूच्या विठ्ठल मूर्तीची स्थापना करून सोलापूर भागात विविध धार्मिक उत्सवांना सुरुवात केली. आषाढी व कार्तिकी एकादशीची रथयात्रा ही गेल्या २०० वर्षांपासून सोलापूरचे सांस्कृतिक वैभव बनलेली आहे. जिल्ह्यातील ज्वारीच्या भरघोस उत्पादनामुळे ज्वारीची गरम भाकरी येथे प्रसिद्ध आहे. तसेच येथील शेंगदाणा चटणी, इडली, डोसा, उत्तप्पा हे दाक्षिणात्य पदार्थ, तसेच डिसेंबर-जानेवारी महिन्यांतल्या हुरडा पार्ट्या प्रसिद्ध आहेत. चटणी-भाकरी व हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी अन्य जिल्ह्यांतूनही लोक येथे येतात. सोलापूर येथे आत्तापर्यंत अ.भा. मराठी नाट्य संमेलन व साहित्य संमेलन संपन्न झालेले आहे. उर्दू साहित्य संमेलन, धनगर साहित्य संमेलन, सावरकर साहित्य संमेलन अशी अनेक साहित्य संमेलने सोलापूरमध्ये झाली आहेत, होणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूरात पाच शाखा आहेत म सा प सोलापूर शाखेचे डॉक्टर सुहास पुजारी म सा प जुळेेेे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, म सा प उत्तर शाखेचे अध्यक्ष ह भ प सुधाकर महाराज इंगळे, म सा प दक्षिण सोलापूर शाखेचे अध्यक्ष रेणुका महागावकर मसाप पश्चिम शाखेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे

खाद्यपदार्थ

करकंब मधील बाजार आमटी खूप प्रसिद्ध आहे. खूप दूरवरून लोक ही आमटी खाण्यासाठी करकंबला येतात.सोलापूरातील शेंगा चटणी प्रसिद्ध आहे. लंबोटी येथील शेंगा चटणी प्रसिद्ध आहे. ती घेण्यासाठी लांबून लोक येतात.

शिक्षण

आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गाविजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात. लातूर, सांगली येथूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.

विशेष व्यक्ती

पूर्वीच्या काळी थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्वर सोलापूरात होऊन गेले. सिद्धारामेश्वर यांनी सोलापूरला अडुसष्ट (६८) शिवलिंगांची स्थापना करून तेथील धार्मिक माहात्म्य वाढवले. आपल्या शिष्यांसह एका सुंदर तळ्याची निर्मिती केली. याच तळ्याच्या मध्यभागी शिवमंदिर आहे व येथेच सिद्धरामेश्वर यांची शिवयोग समाधी आहे. तळ्याच्या मध्यभागी हे शिवमंदिर असल्याने देशातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.

तेलुगू भाषिक असलेले संत शुभराय महाराज हे देखील सुमारे ३५ वर्षे सोलापूरात होते. तेलुगूसह मराठी, उर्दू, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. शुभराय यांनी अस्खलित मराठीत भक्तिपर पदे रचली आहेत. ही पदे आजही महाराष्ट्रात व कर्नाटकात गायली जातात. विनोबा भावेंच्या रोजच्या प्रार्थनेत शुभरायांचे पद होते. शुभराय हे थोर ईश्वरभक्त होते, कवी होते तसेच ते संगीत साधक होते व उच्चप्रतीचे चित्रकारही होते. त्यांनी रामायण व महाभारतावर आधारलेली सुमारे ५०० चित्रे काढली आहेत. जमाखर्चाच्या कागदाच्या मागच्या बाजूवर काढलेली जलरंगातील ही चित्रे आश्चर्यकारक आहेत. २०० वर्षांनंतरही या चित्रांतील रंग ताजे वाटतात. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ही चित्रे चित्रचिरंतन या पुस्तकातून प्रसिद्ध केली आहेत. या चित्रांची प्रदर्शनेही भरवली जातात.

कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी म्हणत भक्तीचा मळा फुलवणारे संत सावता माळी सोलापूर जिल्ह्यातलेच, संत चोखामेळा, कान्होपात्रा इथलेच आणि दुष्काळात बादशहाची धान्याची कोठारे लोकांना खुली करणारे संत दामाजीपंत याच जिल्ह्यातल्या मंगळवेढ्याचे. श्री स्वामी समर्थ या जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २१ वर्षे राहत होते. अक्कलकोट येथेच त्यांची समाधी आहे. आज अक्कलकोट हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थस्थान बनलेले आहे. लावणीकार शाहीर राम जोशीही याच जिल्ह्यातले. राम जोशी लावण्याही रचत तसेच कीर्तनेही करत. शुभराय महाराजांनी रामजोशी यांना उपदेश केल्यानंतर राम जोशी यांनी डफ फोडून टाकला व लावणी सोडली अशी कथा सोलापूरात प्रसिद्ध आहे. साहित्यसम्राट न. चि. केळकर यांचा जन्म जिल्ह्यातील मोडनिंब या गावी झाला, तर नवकवितेचे प्रवर्तक बा.सी. मर्ढेकर जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. युद्धकाळात रुग्ण सैनिकांची सेवा करून भारताचे नाव जगभर उज्ज्वल करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जन्मगाव सोलापूर असून, येथे त्यांचे स्मारकही आहे. तसेच पंचागकर्ते दातेही सोलपूरचेच.

साहित्यिकांचा विचार करता अठराव्या शतकातील शुभराय व राम जोशी यांचेनंतर विसाव्या शतकातील कवी कुंजविहारी (हरिहर गुरुनाथ सलगरकर) यांची नोंद निश्चितच घ्यावी लागेल. स्वातंत्रसंग्रामात त्यांच्या देशभक्तीपर कवितांनी जनतेला प्रेरणा दिली. तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।। अशा प्रखर कवितांसह सुंदर भावगीते लिहिणारे कवी संजीव (कृ.गं. दीक्षित) हेही सोलापूरचेच. प्रसिद्ध शाहीर अमर शेख; गीतकार रा.ना. पवार; ज्येष्ठ कादंबरीकार, कवी व समीक्षक त्र्यं.वि. सरदेशमुख; महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले; संगीत तज्ज्ञ व कवी श्रीराम पुजारी; संत साहित्याचे अभ्यासक श्री. दा.का. थावर; ग्रामीण जीवन व लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ.द.ता. भोसले; सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक पंढरपूरचे श्री. वा.ना. उत्पात; समीक्षक डॉ. गो.मा. पवार अशा अनेक दिग्गजांनी आपल्या अभ्यासाच्या व कलेच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्याच्या लौकिकात भर घातली आहे.प्रख्यात चित्रकार एम.एफ. हुसेन व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातलेच. फॅन्ड्री व सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातीलच आहेत. अक्करमाशी या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक प्रा. निशिकांत ठकार, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हेही याच जिल्ह्यातले.जेष्ट नाट्य व चित्रपट अभिनेत्री हेही याच जिल्ह्यातले आहेत.

सर्वात विशेष म्हणजे प्रख्यात लेखक संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले हेही मुळचे सोलापूरचेच. त्यांचे 'मुसाफिर, नादव़ेध, किमयागार, अर्थात झपुर्झा' ही पुस्तके मराठी साहित्य विश्वात लोकप्रिय आहेत.

डॉ. विशाल शिंदे हे अमेरिकेत कॅलिफोनिया येथे संशोधक म्हणुन कार्यरत आहेत.अमेरिकेत संशोधन संस्थेत ते संचालक पदावर कार्यरत आहेत.

प्रा. मिलिंद जोशी हे बार्शीचे आहेत सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेवर कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत  महाराष्ट्रात ते वक्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत.कवी मारुती कटकधोंड यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातल्या विविध दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या कुंपण वेदनांचे या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सातत्याने वर्तमापत्रातून ते लेखन करतात .

दिवंगत क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापूरात झाली. पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. २००८ साली कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली. कु. अनघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पद्माकर कुलकर्णी मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लामजना गावच्या सध्या त्यांचे वास्तव्य सोलापूरात आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संस्था त्यांनी वाढवल्या. साहित्य नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे काम आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती याठिकाणी कार्यकारी सदस्य म्हणून अनेक वर्ष समितीवर काम केले आहे, सध्या ते महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर ते अध्यक्ष असून बालकुमार साहित्य मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी काही काळ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ वर हे काम केले आहे तर सध्या ते सोलापूर आकाशवाणी वर वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत आहेत. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या प्र- कुलगुरू पदी असलेले डॉ. नेहरू सिद्राम उमराणी हे विद्यापीठाचे आठवे प्र-कुलगुरू आहेत. डॉ.एन.एस उमराणी हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालूक्यातील "भंडारकवठे" या गावचे आहेत.

दिवंगत प्राध्यापक गजानन लक्ष्मण भिडे हे मुळचे जामखेड जिल्हा -अहमदनगर येयील रहिवासी होते, त्यांचे उच्च शिक्षण पुणे येथे झाले. शिक्षणानंतर ते वाई येथे विश्वकोष मंडळात लेखक म्हणुन कार्य केले, या दरम्यान सोलापूरातील दयानंद महाविद्यालयात प्राचीन भारतीय इतिहास विभागात प्राध्यापक पदावर रुजु झाले . इतिहास विषयाचा व्यासंग व लेखन कार्य यामुळे त्याचे अनेक विद्यार्थी इतिहासात प्राध्यापक झाले. इतिहास विषयाची पाठ्यपुस्तके, सदर्भ ग्रंथ, स्पर्धापरिक्षा पुस्तके असे विविधांगी लेखन केले. इतिहासातील प्राचीन कालखंड हा जरी आवडीचा असला, तरी मध्ययुगीन व आधुनिक कालखंडावर त्यांचे प्रभुत्व होते. हत्तसंग कुडल येथील हरिहरेश्वर मंदिर उत्खन्न हा त्यांचा जीवनातील परमोच्य आंनदाचा कालावधी होता. या मंदिराचे पर्यटन महत्त्व वाढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांचे समाज सुधारणेचा इतिहास हे पुस्तक स्पर्धापरिक्षा(MPSC व UPSC) बसणारी मुले वापरतात व ते प्रसिद्ध पुस्तक आहे

डॉ. राजेश शर्मा हे दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असुन सध्या बारामती येथे विद्याविकास प्रतिष्ठान यांच्या जैवतंत्रज्ञान विभागात विभाग प्रमुख आहेत.यांचे जैवरसायनशास्त्र या विषयात संशोधन असुन त्यांना पेंटट मिळाले आहेत .

पुरातत्त्वीय उत्खनन स्थळे

मुढवी (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) (तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर )मुढवी हे ठिकाण मांण नदीच्या काठावर वसलेले आहे .या ठिकाणी सन 2003 मध्ये पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले या ठिकाणी सातवाहन काळातील अवशेष मिळाले.

सिद्धापूर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) (तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर) सिद्धापूर हे ठिकाण भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी सण 2004 मध्ये पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले.

वाकाव( पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ )(तालुका माढा जिल्हा सोलापूर )हे ठिकाण सीना नदीच्या काठावर वसलेले आहे.

कारकल (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ )(तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर )हे ठिकाण भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे.

नरखेड (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ )(तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर )हे ठिकाण भोगावती नदीच्या काठावर वसलेले आहे .

संदर्भ

  1. ^ "GEOGRAPHICAL INFORMATION" (PDF).
  2. ^ http://www.maharashtratourism.net/cities/solapur.html maharashtra tourism

बाह्य दुवे

सोलापूर जिल्ह्यातील तालुके
उत्तर सोलापूर तालुका | दक्षिण सोलापूर तालुका | अक्कलकोट तालुका | बार्शी तालुका | माढा तालुका | करमाळा तालुका | मोहोळ तालुका | पंढरपूर तालुका | माळशिरस तालुका | सांगोला तालुका | मंगळवेढा तालुका