सोराबजी नसेरवान पोचखानवाला
सर सोराबजी नसेरवान पोचखानवाला हे एक पारसी समाजातील सद् गृहस्थ होते.
बालपण
सर सोराबजी नसेरवान पोचखानवाला ह्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८८१ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नसेरवानजी आणि आईचे नाव गुलबाई होते. ते मुंबईतील मध्यमवर्गीय पारशी कुटुंबापैकी होते.वडील मुंबईत एक उपाहारगृह चालवत होते. सोराबजी सहा वर्षे वयाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांच्या वडिलांचे बचतीचे पैसे असलेली बँक दिवाळखोरीत गेली.चार वर्षांनी त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले.सोराबजी ह्यांना व्हायोलिन वाजवता येत होते.सोराबजीनी व्हायोलिन वाजविण्याच्या शिकवण्या घेतल्या आणि कुटुंबाला आर्थिक मदत केली. मुंबई विद्यापीठाच्या मँट्रिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बीए करण्यासाठी संत झेविअर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. साल १८९९ मध्ये त्यांना मासिक वीस रुपये पगाराची बँकेत लिपिक पदाची नोकरी मिळाली.[१]
तरुणपण
बँकेत असताना त्यांनी बँकींगची सगळी प्रक्रिया आणि आर्थिक रचना शिकून घेतली. भारतीयांना बँकेत व्यवस्थापक किंवा तत्सम उच्च पद ब्रिटिश लोक देत नसल्याने त्यांनी बँकेची नोकरी सोडली. इसवी सन १९०६ मध्ये काही पारसी लोकांनी बँक ऑफ इंडिया स्थापन केली. त्यामध्ये त्यांना मासिक दीडशे रुपये पगाराची नोकरी मिळाली. नंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स, लंडन ची परीक्षा उत्तीर्ण केली.परीक्षा उत्तीर्ण करणारे ते पहिलेच भारतीय होते.परंतु येथेही त्यांना उच्च पदाची नोकरी मिळाली नाही म्हणून ती नोकरीसुद्धा सोडून दिली. पुढे सोराबजीनी ओळखीचा वापर करीत वीस लाखांचे भांडवल जमा करून भारतीय लोकांनी भारतीय लोकांसाठी चालवलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया नावाची पहिली स्वदेशी व्यावसायिक बँक स्थापन केली. सोराबजी व्यवस्थापक झाले आणि सर फिरोजशहा मेहता बँकेचे अध्यक्ष झाले.सोराबजी साल १९१० मध्ये सकरबाई सोबत विवाहबद्ध झाले. [२]
समाजकार्य
१९१९ साली त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक पद स्वीकारले आणि युनियन बँकेला संकटातून बाहेर काढले.सन १९३० मध्ये स्थापन केलेल्या भारतातील इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स चे ते संस्थापकीय सदस्य होते.सन १९३४ मध्ये त्यांनी सिलोन च्या रॉयल बँकींग कमीशन चे काम केले.ब्रिटिशांनी त्यांच्या बँकींग क्षेत्रातील कार्याबद्दल एक मार्च १९३५ रोजी सोराबजी ह्यांना नाईटहूड हा किताब दिला.त्यांच्या समाज कार्यामुळे मुंबईतील एका रस्त्याला सर पोचखानवाला रोड नाव दिले आहे.हा रस्ता महाराष्टातील मुंबई येथे वरळी भागात आहे.वरळी समुद्र किनारा भागातील डॉ. आर. जी. थडानी मार्गापासून महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्य कार्यालयाकडे जाणारा रस्ता हा सर सोराबजी नसेरवान पोचखानवाला मार्ग म्हणून ओळखला जातो.सर सोराबजी पोचखानवाला ह्यांचे ४ जुलै १९३७ साली देहावसान झाले.[३]