सोनेरी महाल
सोनेरी महाल (Golden Palace) ही ऐतिहासिक वास्तू छत्रपती संभाजीनगर शहरात सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात आहे. पाठीमागे लहान पर्वतरांगा असलेली सोनेरी महालाची इमारत एखाद्या चित्राप्रमाणे भासते. भोवताली असलेली झाडे, कुरणे आणि शेत हे या इमारतीच्या सौंदर्यात अधिकच भर टाकतात. सोनेरी महालाच्या तळमजल्यावरील दरबार महालातील चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली असल्यामुळे या वास्तूला सोनेरी महाल हे नाव पडले.
इतिहास
औरंगजेबासोबत दख्खनमध्ये आलेल्या बुंदेलखंडातील सरदारने हा महाल बांधला. काही उपलब्ध पुराव्यांवरून असे कळते की शहाजहानने पहाडसिंग व झुंजारसिंग या दोन भावांना दख्खनला पाठवले होते. औरंगजेबाच्या काळात वेळोवेळी पराक्रम गाजवून पहाडसिंगने मुघल साम्राज्याला आपली निष्ठा दाखवून दिली. पुढील काळात त्याने औरंगाबाद येथील सोनेरी महालात वास्तव्य केले. या पुराव्याला अजून एक आधार असा की, सोनेरी महालाच्या बाहेर पहाडसिंगचा सावत्र भाऊ लाला हरदौल यांचे स्मृतिस्मारक आहे.
सोनेरी महाल हे स्मारक इ.स. १६५१ ते १६५३ च्या दरम्यान बांधले गेले असावे. ही इमारत बांधण्यासाठी त्यावेळी ५०,००० रुपये खर्च आला होता. १९३४ साली मूळ किंमतीचा अंदाज घेऊन हैदराबाद संस्थानाच्या तत्कालीन निजामाने हा महाल ओरछाच्या सवाई महेंद्र वीरसिंहदेव बहादुर यांच्याकडून २६,४०० रुपयांना विकत घेतला.
सोनेरी महालाची रचना
सोनेरी महालाचे प्रवेशद्वार (हाथीखाना) ही एक भारदस्त वास्तू असून तिला कमानीयुक्त सुरक्षा भिंत आहे. हाथीखान्याचे बांधकाम भव्य व आयताकृती असून त्यात असलेल्या निमुळत्या कमानी त्याच्या सौंदर्यात भर घालतात. याच हाथीखान्यातून मुख्य महालाकडे एक मार्ग जातो. या मार्गाच्या दोन्ही बाजूस बाग आहे. या रस्त्याच्या मधोमध असलेले लंबाकार जलाशय २००१-२००२ साली जतनकर्त्यांनी मुघल स्थापत्यशास्त्राचा वारसा जपण्याच्या हेतूने बांधले.
सोनेरी महालाची वास्तूही आयताकृती आणि दुमजली असून उंच चौथऱ्यावर आहे. खालच्या मजल्यावर एक स्तंभबद्ध दालन व चार अन्य खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर मध्यभागी एक दालन असून त्याच्या चार कोपऱ्यात चार खोल्या आहेत. खालच्या मजल्यावरून वरती जाण्यासाठी दक्षिणोत्तर भागात जिने आहेत. सर्वात वर गच्ची असून त्यावर टेहळणीचा मनोरा आहे. इमारतीस भव्य संतुलित नक्षीदार कमानी, कमानीतून उत्तम प्रकारची प्रकाश योजना व मध्यभागी मुख्य वास्तू अशी रचना केली आहे.
संपूर्ण वास्तूचे बांधकाम हे दगड, लाखोरी विटा व चुन्यातील आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे. ही वास्तू महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० यानुसार महाराष्ट्र शासनाचे राज्यसंरक्षित स्मारक आहे.
भिंतीवरील चित्रे
सोनेरी महाल येथील चित्रांमध्ये निसर्गाचे वास्तविक प्रतिबिंब साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुघल चित्रे ही पाने, फुले, झाडे यांनी युक्त असतात. मुघल चित्रांमध्ये वनस्पती वास्तुशास्त्राचा अभ्यास उत्कृष्टरीत्या केलेला दिसतो. वास्तूव्या पूर्वेकडे असलेले कोनाडे पारंपरिक फुलझाडे आणि फुलदाण्या यांनी सुशोभित केले आहेत. गुलाब व लिली या फुलांची चित्रे उत्कृष्टपणे रेखाटलेली आहेत. चित्रांमध्ये तपकीरी लाल, निळा, हिरवा, जांभळा, पांढरा व सोनेरी अशा भडक व चकाकणाऱ्या रंगाचा वापर केलेला दिसतो. सोनेरी रंगाच्या ठिकाणी खऱ्या सोन्याचे पाणी वापरल्यामुळे भिंतीना धातुसदृश चकाकी दिसते. एकदंरीत चित्रांमधील रेखीय दृष्टिकोनामुळे चित्रे सजीव असल्यासारखी भासतात. काळाच्या ओघात येथील चित्रे अंशतः नष्ट झाली आहेत.
प्रादेशिक वस्तुसंग्रहालय
वास्तूच्या पहिल्या मजल्यावर असलेले प्रादेशिक वस्तुसंग्रहालय १९७९ साली स्थापन करण्यात आले. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या सुमारे १,०५१ आहे. या वस्तुसंग्रहालयात पुरातन कलावस्तूंचा संग्रह विविध दालनांमध्ये प्रदर्शित केला आहे. यांत प्राचीन धातू व पाषाण मूर्ती, चित्रे, दागिने, मातीची भांडी, शस्त्रे यासारख्या वस्तूंचा समावेश असून पैठण व तेर उत्खननात प्राप्त भाजलेल्या मातीच्या कलावस्तू, लाकडी फळीवर व काचेवर रेखाटलेली चित्रे, मराठवाडयाच्या विविध भागातुन मिळालेली दगडी शिल्पे, काष्ठ-कोरीव काम, मृण्मय मूर्ती इ. विशेष उल्लेखनीय आहेत. हे संग्रहालय सोमवार सोडून आठवड्याच्या अन्य दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असते. संग्रहालयाचे व्यवस्थापन हे सहाय्यक अभिरक्षक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे केले जाते. तर वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे सहाय्यक संचालक (पुरातत्त्व) छ्त्रपती संभाजीनगर विभाग, महाराष्ट्र शासन, छ्त्रपती संभाजीनगर यांचे कार्यालय आहे.
लाला हरदौल समाधी
लाला हरदौल यांची समाधी सोनेरी महाल या स्मारकाच्या दर्शनीय बाह्य भागात सुमारे ५० मीटर अंतरावर आहे. हे बुंदेलखंड ओरछा नरेश वीरसिंहदेव यांचे पुत्र व पहाडसिंग यांचे भाऊ होते. लाला हरदौल बुंदेल खंडातील महान स्वतंत्रता सेनानी व कुशल योद्धा म्हणून परिचित आहेत. त्यांची समाधी चौरस आकाराची आहे. या समाधी परिसरात एक पायऱ्यांची विहीर आहे. बुंदेलखंडाच्या इतिहासात त्यांच्या पराक्रमामुळे वेगळे स्थान आहे. अन्यायाचा प्रखर विरोधक असलेल्या लाला हरदौल यांनी मुगल सत्तेविरूद्ध जोरदार मोहिम हाती घेऊन मुघल सत्तेस भयभीत करून सोडले होते. आजही त्यांच्या शौर्याच्या कथा बुंदेलखंडात व इतरत्र प्रसिद्ध आहेत. लाला हरदौल यांचे वाढते सामर्थ्य सहन न होऊन त्यांचे भाऊ झुंजारसिंह यांनी त्यांना विजयादशमीच्या दिवशी इ.स. १६३१ मध्ये विष प्रयोग करविला, त्यात त्यांचा मृत्यू झाला असा उल्लेख मिळतो. लाला हरदौल यांची स्मृती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही नामसमाधी हरदौल चबुतरा म्हणून ओळखला जातो. या चबुतऱ्यावर देवनागरी व उर्दू लिपीत एक लेख कोरलेला असून त्यात हरदौल असा उल्लेख आहे. लाला हरदौल यांच्या कर्तृत्वामुळे इतिहासात त्यांचे आगळे स्थान आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून ही नामसमाधी (चबुतरा) राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणात आहे.
चित्रदालन
- सोनेरी महाल
- सोनेरी महाल
- सोनेरी महाल
- हाथीखाना, सोनेरी महाल