सोनमोहर
सोनमोहर हा एक पुष्पवृक्ष आहे.
मराठी नावे
हा वृक्ष मराठीत पिवळा गुलमोहर किंवा ताम्रशिंबी या नावांनीही ओळखला जातो.
हिंदी नाव
पीला गुलमोहर
इंग्रजी नावे
Copperpod, Yellow-flamboyant, Yellow flametree, Yellow poinciana, वगैरे
शास्त्रीय नावे
Peltophorum pterocarpum,Baryxylum inerme (Roxb.) Pierre, Caesalpinia arborea Miq., Caesalpinia ferruginea Decne, Caesalpinia gleniei Thwaites, Caesalpinia inermis Roxb, Inga pterocarpa DC., Inga pterocarpum DC., Peltophorum ferrugineum (Decne.) Benth., Peltophorum inerme (Roxb.) Naves, Peltophorum roxburghii (G.Don) Degener आणि Poinciana roxburghii G.Don.
आढळ स्थाने
हे झाड तसे मुळचे अंदमान, मलेशिया, श्रीलंका व ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातले असून भारतात स्थिरावले आहे. आग्नेय आशियातून ते प्रथम ते तामिळनाडू-आंध्रप्रदेशात आले, त्यामुळे त्याला तमिळ आणि तेलुगू भाषेतली नावे आहेत. महाराष्ट्रात हे झाड प्रथम खंडाळा येथे लावण्यात आले. त्यानंतर त्याच्या डेरेदार व देखण्या आकारामुळे आणि सावली आणि सुंदर फुलोऱ्यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये व रस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली. विषुववृत्तीय भूप्रदेशात याचे मूळ स्थान असल्यामुळे महाराष्ट्रात हे ठिकठिकाणी स्थिरावले. कोरड्या किवा आर्द्र वातावरणात आणि जवळ जवळ २००० फूट उंचीवरील प्रदेशातही हे दिसते. मेळघाटात ही झाडे असंख्य आहेत.
वर्णन
या वृक्षाचा शाखाविस्तार चौफेर असून ते ४०-७५ फूट उंचीपर्यंत वाढते. या झाडाच्या मुख्य खोडाची साल करडी आणि खवल्याखवल्याची असते. पानांचा गर्द हिरवा काळपट रंग फुलांच्या आणि शेंगांच्या रंगाला सुरेख उठाव देतो. सोनमोहराला कळ्या धरू लागल्या की त्यांचे तांबूस तपकिरी भुकटीत घोळवलेल्यासारखे मण्यांसारखे सुरेख दिसतात. मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्द क्रेप कागदासारख्या पाकळ्यांची फुले बाहेर पडू लागतात व हळूहळू सर्व झाड पिवळेधमक होऊ लागते. फुलांनी जडावले की झाडाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांची आणि पाकळ्यांची सजावट हॊते. हिरव्यागार हिरवळीला लागून लावलेले सोनमोहराचे वृक्ष म्हणजे तर त्या त्या बागांचे गर्वाचे स्थान ठरतात. काही अपवाद वगळता हे झाड वर्षभर हिरवेगार असते.
या झाडाची फळे म्हणजे शेंगा. हे फळ मातकट तांब्याच्या रंगाचे म्हणून या झाडाला इंग्रजीत कॉपर पाॅॅड म्हणतात. मराठीत त्याच भाषांतर ताम्रशिम्बी. एका ऋतूतील फळे वर्षअखेर वृक्ष निष्पर्ण झाला तरी झाडाला लटकत राहतात. या शेंगा वर-खाली टोकदार असून लंबगोल आकाराच्या असतात. शेंगा नुकत्याच तयार होऊ लागल्या की त्यांची तांबूस छटा फार मनमोहक दिसते. शेंगानी गच्च भरून गेलेले झाड पाहणे हे फुललेल्या झाडाइतकेच आनंददायी असते.
संदर्भ
वृक्षराजी मुंबईची (पुस्तक, लेखिका - मुग्धा कर्णिक)