सेसिल ऱ्होड्स
सेसिल ऱ्होड्स | |
केप वसाहतीचा सातवा पंतप्रधान | |
कार्यकाळ १७ जुलै १८९० – १२ जानेवारी १८९६ | |
राणी | व्हिक्टोरिया |
---|---|
मागील | जॉन गॉर्डन स्प्रिग |
पुढील | जॉन गॉर्डन स्प्रिग |
जन्म | ५ जुलै १८५३ हर्टफर्डशायर, युनायटेड किंग्डम |
मृत्यू | २६ मार्च, १९०२ (वय ४८) केप टाउन, केप वसाहत (आजचा दक्षिण आफ्रिका) |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
पत्नी | अविवाहित |
व्यवसाय | उद्योगपती |
सेसिल जॉन ऱ्होड्स (इंग्लिश: Cecil John Rhodes; ५ जुलै १८५३ - २६ मार्च १९०२) हा एक ब्रिटिश उद्योगपती व दक्षिण आफ्रिकेमधील एक राजकारणी होता. साम्राज्यवाद व वसाहतवादावर गाढ विश्वास असलेला ऱ्होड्स दक्षिण आफ्रिका प्रदेशामधील ब्रिटिश साम्राज्याच्या सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक होता. ऱ्होडेशिया (आजचा झिम्बाब्वे) ह्या प्रदेशाला ऱ्होड्सचेच नाव दिले गेले आहे.
इंग्लंडच्या हर्टफर्डशायरमध्ये जन्मलेला ऱ्होड्स लहानपणी दम्यामुळे सतत आजारी असे. त्याच्या पालकांनी त्याला हवापालटासाठी दक्षिण आफ्रिकेत पाठवायचे ठरवले. ऱ्होड्स १ सप्टेंबर १८७० रोजी डर्बनला पोचला. एका वर्षानंतर ऱ्होड्सने त्याच्या भावासोबत किंबर्ले येथील हिऱ्यांच्या खाणींजवळ स्थानांतर केले. पुढील १७ वर्षांमध्ये ऱ्होड्सने हिरे विक्रीचा प्रचंड मोठा उद्योग उभारला. त्याने स्थापन केलेल्या डी बीर्स ह्या कंपनीचे एकेकाळी जगातील ९० टक्के हिऱ्यांवर नियंत्रण होते. १८७३ साली ऱ्होड्सने शिक्षण पूर्ण करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला.
१८८० साली ऱ्होड्स राजकारणामध्ये शिरला व केप संसदेचा सदस्य बनला. १८९० ते १८९६ दरम्यान तो केप वसाहतीच्या पंतप्रधानपदावर होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये ऱ्होड्सने ब्रिटिश साम्राज्याचा आफ्रिकेमधील भूभाग वाढवण्यात पुढाकार घेतला. खराब प्रकृतीमुळे ऱ्होड्स केवळ वयाच्या ४८व्या वर्षी मरण पावला. त्याचे थडगे झिम्बाब्वेच्या बुलावायो शहराजवळील मातोबो उद्यान येथे आहे.