सूर्यफूल
सूर्यफूल ((हिंदी, गुजराती: सूरजमुखी; इंग्रजी. सनफ्लॉवर; लॅटिन: हेलिअँथस ॲन्यूस; कुल-कंपॉझिटी; शास्त्रीय नावः Helianthus annuus) ही अमेरिका खंडात मूळ असलेली एक बारमाही वनस्पती आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले. दुसरे असे की, ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. इतर गोड्या तेलांपेक्षा हे किमतीने स्वस्त असते.
ही औषधी वनस्पती मूळची पश्चिम अमेरिकेतील असून आता जगात सर्वत्र पसरली आहे. सूर्यफूल रानटी अवस्थेत आढळत नाही. ते मूळचे मेक्सिकोतील हेलिअँथस लेंटिक्युलॅरिस या वन्य जातीपासून उत्पन्न झाले असावे असे मानतात. फार पूर्वीपासून शोभेकरिता सूर्यफूल लागवडीत आहे आणि त्याचे वर्षायू व बहुवषार्यू असे दोन्ही प्रकार बागेत आढळतात. हेलिअँथस ॲन्यूस, हेलिअँथस अर्गोफिलस व हेलिअँथस डेबिलिस या जाती अनुक्रमे पेरू, टेक्सास आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी शोभेकरिता लावलेल्या आढळतात. तसेच संकर पद्घतीने सूर्यफुलाचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत.
गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया व इजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. याच्यापासून मुरघास किंवा ओला चारा तयार करतात.
सूर्यफूल (हेलिअँथस ॲन्यूस)
वनस्पतिवर्णन : सूर्यफूल या वर्षायू वनस्पतीची पेरणी पावसाळ्याच्या आरंभी करतात. फुलोरे पावसाळ्याच्या शेवटी व थंडीत येतात. ही १–३ मी. उंच वाढते; खोड बळकट, जाड व खरबरीत असते. पाने खाली समोरासमोर आणि वर एकाआड एक, लांब देठाची, केसाळ, मोठी, १०–१२ सेंमी. लांब, हृदयाकृती, करवती व लांब टोकाची असतात. जुलै–सप्टेंबरमध्ये शेंड्याकडे (क्वचित खाली फांद्याच्या टोकास) पिवळे शोभिवंत तबकासारखे (स्तबक) फुलोरे येतात. त्यांचा व्यास १०–१५ सेंमी. (क्वचित २०–३५ सेंमी.) असून किरणपुष्पे पिवळी, वंध्य व जिव्हाकृती आणि बिंबपुष्पे गर्द पिवळी द्विलिंगी व नलिकाकृती असतात. छदे हिरवी व अनेक; फळे व बीजे शंक्वाकृती; फळ संकृत्स्न; बी चपटे व काळे. हेलिअँथस रिजिडस या लहान सूर्यफुलाचे फुलोरे गर्द सोनेरी रंगाचे व लहान असून बिंबाचा भाग पिंगट असतो.
सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ४५–५०% असल्यामुळे थोड्या क्षेत्रात व कमी वेळात या पिकापासून अधिक तेल मिळू शकते. हे तेल आहाराच्या दृष्टीने फारच चांगले आहे. हे पीक कमी मुदतीचे (७०–८० दिवसांचे) आहे. या पिकाची लागवड सुधारित तंत्राने केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो. जिरायती पिकापासून हेक्टरी ८–१२ क्विंटल आणि बागायती पिकापासून हेक्टरी १५–२० क्विंटल उत्पादन मिळते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळ-जवळ ७०% क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.
हवामान : सूर्यफुलाचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये घेता येते. कारण हवेतील तापमान व सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही.
जमीन : या पिकाची लागवड हलकी, मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. जमीन शक्यतो उत्तम निचऱ्याची असावी.
पूर्व-मशागत : या पिकाचे मूळ ६० सेंमी. पर्यंत खोलवर जात असल्यामुळे २०–३० सेंमी. खोलीवर पहिली नांगरट करतात आणि दुसरी नांगरट उथळ करतात. त्यानंतर २-३ कुळवाच्या पाळ्या देतात.
बियाणे : चांगल्या जातीचे सुधारित प्रतिहेक्टरी १०–१२ किग्रॅ. बियाणे वापरतात. सूर्यफुलाचे बी पक्व झाल्यावर ४५–५० दिवस सुप्तावस्थेत असते, म्हणून पेरणीसाठी शक्यतो मागील हंगामाचे बी वापरतात.
जाती व पेरणी : मॉडर्न, एसएस–५६ व बुटक्या या जाती ७५–८० दिवसांत तयार होतात. या बियाण्यांची पेरणी ४५ X २० सेंमी. अंतरावर करतात. ई. सी. ६८४१४, सूर्या, बीएसएच–१ व आशादायक वाण केआरएस या जातींची बियाणे ६० X २० सेंमी. अंतराने पेरतात. या जाती सुमारे १०० दिवसांत काढणीस तयार होतात. मिश्रपीक म्हणून सूर्यफूल घेताना भुईमुगाच्या पिकाबरोबर ६ : २ या प्रमाणात, तसेच तूर व सूर्यफूल २ : १ या प्रमाणात पेरतात. पेरणीपूर्वी बियाणे १२ तास पाण्यात भिजवून, नंतर सावलीत सुकवून पेरणी केल्यास उगवण जोरदार व एकसारखी होते. पेरणीपूर्वी १ किग्रॅ. बियाण्यास २ ग्रॅ. थायरम किंवा ब्रॉसिकाल चोळतात.
सूर्यफूल हे ॲस्टरेसी कुळातील वनस्पती आहे. शास्त्रीय नाव हेलीऍन्थस ॲनस आहे.हिच्या ७० प्रजाती आहेत.
यातील अनेक प्रजातींच्या बियांतून खाद्यतेल काढले जाते.
सूर्यफूल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेलबिया पीक असून भारतात एकूण तेलबियांच्या क्षेत्रापैकी २८ % क्षेत्र सूर्यफुलासाठी व एकूण खाद्यतेलांपैकी १० % उत्पादन सूर्यफुलाच्या तेलाचे आहे. महाराष्ट्रात विविध तेलबिया पिकांची लागवडीसह मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व इतर काही जिल्ह्यांत प्रामुख्याने सूर्यफुलाची लागवड केली जाते. राज्याच्या एकूण सूर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सूर्यफूल हे गळिताचे त्यामानाने नवीन पीक असून महाराष्ट्र राज्यात सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली होते. बियांचे उत्पन्न १.४३ लाख टन होते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४९४ किलो आहे.
हवामान
सूर्यफूल हे पीक सर्व प्रकारच्या हवामानांत येऊ शकते. हे पीक महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला असतो.कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सूर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो. पीक काढणीस जास्त कालावधी लागतो. याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. २० डी. ते २२ डिग्री सें.ग्रे. तापमान सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक असते.
जमीन
सूर्यफुलाच्या वाढीसाठी वाळूमिश्रित जमीन अधिक चांगली असली तरी सूर्यफुलाच्या मुळाच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. निचरा होणाऱ्या जमिनीत अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होऊन पिकाची वाढ जोरात होते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असल्यास सूर्यफूलाची रोपे चांगली येतात.
बीजप्रक्रिया
पेरणीकरिता चांगले, टपोरे बी हवे असते. बारीक बिया बाजूला काढल्या जातात. १ किलो बियाणे २५ ते ३० मिलिलिटर जर्मिनेटर आणि १ लि. पाण्याच्या द्रावणात ५ ते ६ तास भिजवून सावलीत वाळवले जाते. त्यामुळे उगवण लवकर, एकसारखी आणि चांगली होते.
पूर्वमशागत
सूर्यफुलाच्या मुळ्या जमिनीत ६० सेंमी खोलवर जात असल्यामुळे १५ ते २० सेमी खोलवर नांगरट करावी लागते. कुळवाच्या २ - ३ पाळ्या देऊन ढेकळे फोडून शेत सपाट करून घ्यावे लागते.जमिनीचा पोत व सुपिकता सुधारण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत प्रतिएकरी ४ - ५ गाड्या आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० किलो जमिनीत पसरल्यानंतर पाळ्या देऊन शेत सपाट करून घेतात.[१]
Gallery
- Helianthus decapetalus
"Plenus" - Sunflower leaf structure
- prairie sunflower
(H. petiolaris) - giant sunflower
(H. giganteus) - Helianthus
"Strawberry Blonde" - willowleaf sunflower
(H. salicifolius) - sunflower bud
- Jerusalem artichoke
(H. tuberosus) - leaves of sunflower plant
- rear view of sunflower head
- Helianthus annuus
- Helianthus laetiflorus