Jump to content

सुरेंद्र शिवदास बारलिंगे

डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे (२० जुलै, इ.स. १९१९ - १९ डिसेंबर, इ.स. १९९७) हे स्वांतत्र्य सैनिक आणि महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भारतात आणि विदेशात ते तत्त्ववेत्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे तत्त्वचिंतन मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तीन भाषेत आहे. तत्त्वज्ञानाबरोबरच त्यांनी मराठीत तत्त्वज्ञानेतर लेखन केले आहे.

सुरेंद्र बारलिंगे यांचे वडील शिवदास कृष्ण बारलिंगे हे उत्कृष्ट वकील होते. ते संस्कृत, गणित, तत्त्वज्ञान, कायदा व खगोलशास्त्र यांचे विद्वान होते. प्रथम लो. टिळक आणि नंतर म. गांधी यांचे ते अनुयायी होते..[] वामन आणि सुरेंद्र हे त्यांचे दोन मुलगे होते. वामन शिवदास बारलिंगे हे सुरेंद्र यांच्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठे होते..[]

व्यक्तिगत जीवन

शिक्षण

  1. मॅट्रिक्युलेशन १९३४
  2. बी. ए. तत्त्वज्ञान १९४० [ दुजोरा हवा]
  3. एम. ए. तत्त्वज्ञान १९४२
  4. पीएचडी १९५७
  5. डॉक्टरेटोत्तर संशोधन छात्रवृत्ती १९५८-५९ (ऑक्सफर्ड विद्यापीठ)

पीएच्‌डीचा प्रबंध

डॉ. बारलिंगे यांनी नागपूर विद्यापीठातून The Concept of Change या विषयावर पीएच.डी. पदवी १९५७ साली प्राप्त केली. डॉ. रास बिहारी दास हे त्यांचे मार्गदर्शक होते. प्रोफेसर डोरोथी इमेट आणि प्रोफेसर टी. एम. पी. महादेवन हे त्यांचे परीक्षक होते. इमेट यांनी बारलिंगे यांचे उत्तम प्रबंध लिहिल्याबद्दल अभिनंदन केले आणि अधिक संशोधनासाठी बारलिंगे यांची शिफारस प्रोफेसर गिल्बर्ट राईल यांच्याकडे केली. त्यामुळे बारलिंगे यांना डॉक्टरेटोत्तर संशोधन छात्रवृत्ती मिळाली. त्यांनी राईल यांच्याकडे अधिक संशोधन केले.[]

कारकीर्द

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

डॉ. बारलिंगे भारताच्या इ.स. १९३२ व १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातले एक स्वातंत्र्य सैनिक होते. हैद्राबादच्या मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता (१९४७-४८). अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सचिव होते (१९४०). बारलिंगे हे Central Provinces and Berar Students’ Federationचे मुख्य सचिव होते (१९४०-४१). अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे व राष्ट्रीय युवक संघाचे ते एक संस्थापक आणि सहसचिव होते. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता.

शैक्षणिक

हैदराबाद मुक्ती संग्राम संपल्यावर त्यांनी स्वतःला मराठवाड्यातील आणि तेलंगणातील शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. नांदेडच्या पीपल्स कॉलेजची जडण घडण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्या कॉलेजचे ते संस्थापक प्राचार्य होते. तसेच ते आंध्र प्रदेशातील सिद्दीपेठच्या कला व विज्ञान महाविद्यालयाचे, करीमनगरच्या एस.एस.आर. कॉलेजचे आणि हैदराबादमधील नूतन विद्या समितीच्या न्यू सायन्स कॉलेजचेही प्राचार्य होते. या सर्वच काळातील त्यांच्या आठवणी आणि संवेदनशील मनाने टिपलेले जीवनाच्या विविध अंगांचे अनुभव त्यांनी आपल्या ’ओंजळभर पाणी ’ या आत्मचरित्रात सांगितले आहेत.

ते पुणे विद्यापीठात, दिल्ली विश्वविद्यालयात, आणि त्यावेळी युगोस्लाव्हियात असणाऱ्या व सध्या क्रोएशियाची राजधानी असलेल्या झाग्रेब शहरातील विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.त्यांचा नावलौकिक केवळ देशातच नाही तर ते युरोपादी पाश्चात्त्य राष्ट्रांत 'भारतीय तत्त्वज्ञानावरील एक अधिकारी व्यक्ती' म्हणून सुपरिचित होते. बारलिंगे यांना तत्त्वज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर एक तत्त्वचिंतक म्हणून लौकिक मिळाला. त्यानिमित्ताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व युगोस्लाव्हिया या देशांमध्ये त्यांचे वास्तव्य झाले. त्यांनी आपला पीएच.डी.नंतरचा अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठात केला. अंमळनेरच्या भारतीय तत्त्वज्ञान संस्थेचे ते फेलो होते.

तीन त्रैमासिके

पुणे विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञान विभाग सुरू केला. Indian Philosophical Quarterly (IPQ) हे १९७३साली , परामर्श (मराठी) हे १९७९ आणि परामर्श (हिंदी) हे त्रैमासिक १९८० साली, अशी तीन त्रैमासिके त्यांनी सुरू केली.

राज्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद

डॉ. सुरेंद्र बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे इ.स. १९८० ते १९८९ दरम्यान अध्यक्ष होते.[]

सुरेंद्र बारलिंगे यांची ग्रंथसंपदा

तत्त्वज्ञान विषयक (मराठी)

  • तर्करेखा (भाग १, २ -सहलेखक : मो.प्र. मराठे), कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, अनुक्रमे मे १९७२, ऑगस्ट १९७२
  • भारतीय तर्कशास्त्राची रूपरेखा (सहलेखिका डॉ क्रांतिप्रभा पांडे), परामर्श प्रकाशन, पुणे १९८५
  • साहित्य आणि संस्कृती
  • सौंदर्याचे व्याकरण, अभिनव प्रकाशन, मुंबई १९५७

तत्त्वज्ञान विषयक (इंग्लिश भाषेत)

  1. Beliefs, Reasons and Reflections, Indian Philosophical Quarterly Publication (here after IPQ),Poona University, Pune,1983
  2. Confessions and Commitments, Indian Council of Philosophical Research, Published by Professor Bhuvan Chandel, Member Secretary for Indian Council of Philosophical Research, Rajendra Bhavan (Fourth Floor), 210 Deen Dayal Upadhyaya Marg, New Delhi 110 002
  3. Confessions and Commitment, Indian Council for Philosophical Research, Delhi, 1994
  4. A Critical Survey of Western Philosophy: From Bacon to Kant (Co-Author Padma Kulkarni), The Mac-Milan Company of India Ltd., First ed. 1980.
  5. A Modern Indian Aesthetic theory –The Development from Bharata to Jagannatha, D.K. Printworld (P), Ltd, New Delhi, First ed. 2007
  6. A Modern Introduction to Indian Logic, second edition, National Publishing House, New Delhi, 1975
  7. Poverty, Power, Progress, Panchsheel Publisher, Delhi, 19th March 1988,
  8. Reunderstanding Indian Philosophy – Some Glimpses, D.K.Printworld(P), Ltd, New Delhi, First ed. 1998

तत्त्वज्ञान विषयक (हिंदी)

  1. कला और सौंदर्य (सहयोग - डॉ. क्रांतिप्रभा पांडे, व सु. ए. भेलके), विभूती प्रकाशन, दिल्ली, १९८८
  2. तर्करेखा, राजस्थान हिंदी ग्रंथ अकादमी, जयपूर १९७२
  3. भारतीय तर्कशास्त्र की रूपरेखा,राजस्थान हिंदी ग्रंथ अकादमी, जयपूर १९७६
  4. सौंदर्यतत्त्व और काव्य सिद्धान्त (अनुवाद डॉ. मनोहर काळे), नेशनल पब्लिशिंग हाउस, दिल्ली, १९६३

तत्त्वज्ञानात्मक आणि ललित

मराठी

  • आकाशाच्या सावल्या
  • इन्किलाब
  • ओंजळभर पाणी (आत्मकथन)
  • खरा हा एकची धर्म
  • गोष्टींचे गाठोडे (कथासंग्रह)
  • पुन्हा भेटू या (व्यक्तिचित्रे)
  • माझा देश (कथासंग्रह)
  • माझे घर (कथासंग्रह)
  • मी पण माझे (कादंबरी)

हिंदी

  1. डॉ. नंदकिशोर देवराज : दर्शन और साहित्य, (संपादित) (सहसंपादक डॉ. सु. ए. भेलके), विभूती प्रकाशन, दिल्ली १९९८.
  2. मेरा मैं-पन (उपन्यास), कनिष्क प्रकाशन, दिल्ली १९८५.


परामर्शचा विशेषांक

’परामर्श’ या मराठी नियतकालिकाने सुरेंद्र बारलिंगे यांच्या देहावसानानंतर 'डॉ. बारलिंगे यांचे विचारविश्व' या विषयावर एक विशेषांक प्रसिद्ध केला. "बारलिंगे यांचे तत्त्वज्ञानात्मक आणि ललित लेखन, त्यांची विविध विषयावरील भाष्ये या साऱ्यांतून साकार होणारे त्याचे विचारविश्व हा विशेषांकाचा विषय होता. या विचारविश्वाचा परिचय व्हावा, त्यांच्या विचारांचे परीक्षण व्हावे, त्यांच्या विचारांतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा, तसेच या प्रश्नांना देता येऊ शकतील अशा पर्यायी उत्तरांचा निर्देश व्हावा व त्यांच्या विचारकर्तृत्वाच्या सीमारेषाही लक्षात याव्यात ही आणि या सीमारेषांपलीकडे जाण्याच्या वाटाही दिसाव्यात अशी व्यापक उद्दिष्टे या विशेषांकामागे आहेत", असे संपादक डॉ. प्रदीप गोखले नमूद करतात.[]

इंग्लिश संकेतस्थळ

Surendra Sheodas Barlingay

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b सुरेंद्र शिवदास बारलिंगे, माझा आंतरिक विकास, संक्षेप व अनुवाद -अर्चना देगावकर, पान ०८, डॉ. बारलिंगे यांचे विचारविश्व, परामर्श, खंड २०, अंक ३-४, नोव्हेंबर १९९८, फेब्रुवारी १९९९
  2. ^ सुरेंद्र शिवदास बारलिंगे, माझा आंतरिक विकास, संक्षेप व अनुवाद -अर्चना देगावकर, पाने ११, १२, १६, डॉ. बारलिंगे यांचे विचारविश्व, परामर्श, खंड २०, अंक ३-४, नोव्हेंबर १९९८, फेब्रुवारी १९९९
  3. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-30 रोजी पाहिले.
  4. ^ डॉ. प्रदीप गोखले, संपादकीय टिपण, डॉ. बारलिंगे यांचे विचारविश्व, परामर्श, खंड २०, अंक ३-४, नोव्हेंबर १९९८, फेब्रुवारी १९९९.