सुरत अधिवेशन १९०७
काँग्रेसचे १९०७ सालचे अधिवेशन सुरत येथे भरले. ते नागपूर येथे भरवावे असे काही कार्यकर्त्यांना वाटत होते. अध्यक्षपदासाठी नाव सुचविण्याच्या मुद्यावरून मतभेद झाले. मवाळ पंथीयांनी आपल्या बहुमताच्या जोरावर रासबिहारी घोष यांची अध्यक्षपदी निवड केली . अध्यक्ष भाषणासाठी उठताच टिळक व्यासपीठावर जाऊन त्यांचा पुढे उभे राहिले व भाषणाची परवानगी मागितली. अध्यक्षानी परवानगी नाकारली. टिळक तेथून हल्ण्यास तयार नव्हते. तेव्हा सभामंडपातील कार्यकर्त्यात बाचाबाचीला सुरुवात झाली. सभामंडपात चोहीकडे एकच गोंधळ माजला. लाठ्या-काठ्यांचा सरा॔स उपयोग करण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांच्या वरती खुर्च्या व जोड्यांचा वर्षाव करण्यात आला. तथापि नामदार गोखल्यांना लोकमान्य टिळकांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ मान्य नव्हता. त्यांनी आपल्या समविचारी कार्यकर्त्यांच्या सल्याने कार्यक्रम पत्रिका व भारताची संभाव्य घटना तयार केली होती. टिळकांनी हे सर्व आत्मघातकी असल्याचे सांगून खऱ्या क्रांतीकारकांना व देशभक्ताना राष्ट्रीय प्रवाहापासून दूर ठेवण्याचा हा हेतूतः प्रयत्न असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले व ही इंग्रजधार्जिणी नीती सोडून देण्याचे आवाहन केले. वर सांगितल्याप्रमाणे यावर बरीच खडाजंगी झाली. मवाळ गटाच्या लोकावर याचा काही परिणाम झाला नाही. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर १९०७ला मवाळानी अध्यक्षपदासाठी परत रासबिहारी घोष यांचेच नाव सुचविले. फारसा विरोध झाला नाही. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारताच टिळकांनी अध्यक्षाना बोलू देण्याची विनंती केली आणि त्याशिवाय आपण खाली बसणार नाही असे जाहीर केले. तेव्हा टिळक समर्थकांनी घोषणा देण्यास आरंभ केला आणि सभेच्या कार्यात मोठाच अडथळा निर्माण झाला.
कोणत्याही परिस्थितीत टिळक खाली बसण्यास तयार होईनात. प्रकरण मुध्यावरून गुद्ध्यावर आले. प्रेक्षकातून एक जोडा व्यासपीठाच्या दिशेने फेकला गेला. तो फिरोजशाह मेहता यांच्या डोक्यास लागला, दुखापत झाली आणि सभा तहकूब करण्यात आली. यानंतर तात्काळ उभय गटाच्या लोकांनी त्याच मंडपात आपापल्या वेगळ्या सभा सुरू केल्या. जहालानी मवाळावर व उलट अशी परस्पर भरपूर चिखलफेक केली. मवाळ कोणत्याही मुद्ध्यावर तडजोड करण्यास तयार नव्हते. त्यांनी लोकमान्य टिळकांवर अतिशय वाईट पद्धतीने टीका केली. टिळकांनी काँग्रेस जाळून टाकली. ते देशभक्त नसून देशद्रोही आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कृत्यांनी स्वतःला काळिमा फासला. परमेश्वरा आम्हाला अशा देशभक्तापासून वाचव अशी त्यांनी प्रार्थना केली. काँग्रेसचे अशा रीतीने विभाजन होऊन सुरत काँग्रेसचे सूप वाजले. मवाळाच्या टीकेने विचलित न होता टिळकांनी राष्ट्र उभारणीसाठी उभय गटांनी आपापल्या पद्धतीने कार्यरत राहण्याचे आवाहन केसरी मध्ये अग्रलेख लिहून केले.