Jump to content

सुयोग नाट्यसंस्था

सुयोग नावाची नाट्यसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी एक जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. नाटक निर्मिती करताना ही संस्था अनेकदा कर्जबाजारी होते. पण सुधीर भट हे निर्माते आपल्या नटांचे अनेक लाड पुरवतात, रंगमंच कामगारांनाही बरे पैसे मिळतील असे बघतात, पदराला खार लावून तीस-चाळीस नट-नट्यांचा ताफा घेऊन अमेरिका वारी करतात, आणि या वारीत सर्वांना स्वखर्चाने अमेरिका दर्शन घडवतात. रंगमंच कामगारांचे विमे उतरवतात आणि एखादा गरजू समोर आला की खिशात हात घालून त्याला असतील तेवढे पैसे देतात. दिवसाचे किमान दहा तास नाटकांचे दौरे आखणे, तारखा आणणे-फिरवणे, नव्या नाटकांची पूर्वतयारी करणे अशा कामात सुधीर भट स्वतःला बुडवून घेत असतात.

चोवीस वर्षांत ७१ नाटके, १५ हजार प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणाऱ्या पाच नाटकांची निर्मिती, असा या संस्थेचा झपाटा आहे. सुधीर भटांनी नाट्य व्यवसायाला सुरुवात केली तेव्हाही धंद्यात मंदी होती आणि आज २०१२सालीही मंदीच आहे. मात्र, 'सुयोग'चा प्रवास असा एकाच एका परिस्थितीत आणि सरळ रेषेत झालेला नाही. संस्थेने अनेकदा वर उसळी घेतली आणि तितक्याच जोरात आपटीही खाल्ली. सुरुवातीचे 'मोरूची मावशी' हे नाटक प्रचंड चालले. पण पुढची बरीच नाटके ओळीने आपटली. पुन्हा 'ती फुलराणी', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'हसत खेळत' ही नाटके चालली, 'गांधी विरुद्ध गांधी' यासारख्या महत्त्वाच्या नाटकाने धंद्यात मात्र खोट दिली. पुन्हा 'एका लग्नाची गोष्ट', 'चार दिवस प्रेमाचे', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकांनी उसळी घेतली..प्रवास असा शेअर मार्केटच्या सेन्सेक्ससारखा वरखाली होत राहिला. अगदी सुरुवातीपासूनच तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारा वादग्रस्त निर्माता म्हणून भट चर्चेत राहिले. त्यांनी धंद्याची वाट लावली, अशी त्यांच्यावर टीका झाली. पण एवढ्या वर्षांत सर्व प्रकारची टीका झेलत सुधीर भटांनी व्यवसायात स्वतःचे एक वळण निर्माण केले.

खूप गाजावाजा करून नाटक काढायचे त्याची निर्मितीमूल्ये उच्च ठेवायची, नाटकाचे दणादण प्रयोग लावून ते जनतेच्या मनावर ठसवायचे, एकाचवेळी अनेक नाटकांचे बेत आखायचे, नाटककारांचे महोत्सव भरवायचे, अमेरिकेत आठ-दहा शहरांत स्वतःच्या बळावर नाट्यप्रयोग करायचे, मध्येच नाचगाण्याच्या भव्य कार्यक्रमांची सिद्धता करायची, वगैरे. या सगळ्यांत फायदा झाला तर पैसे वाटायचे किंवा नव्या योजनांमध्ये गुंतवायचे आणि आपटी खाल्ली तर नशिबाला बोल लावायचे, पण नवीन निर्मिती करायचीच, अशी सुधीर भटांची आणि 'सुयोग' संस्थेची कार्यशैली आहे. १९९५ साली त्यांची तीन नाटके उत्तम चालली पण पुढच्याच वर्षी त्यांनी अत्रे नाट्य महोत्सवात अत्रेंची नाटके करून १८ लाखांचे कर्ज करून घेतले. त्या एका वर्षात त्यांना ५५ लाख रुपये कर्ज झाले. आजही अनेकदा भटांच्या खिशात शंभर रुपयाची नोट नसते, पण त्यांच्या मनात नवे नाटक काढायची जिद्द मात्र असते. हल्ली सुयोग नाट्यसुमननिर्मित नाटकेही सादर करते.

सुयोगचे कलाकार

' सुयोग'च्या परिवारात दीर्घकाळ वावरलेल्या कलावंतांची यादी :- अरुण नलावडे, अशोक पत्की, अशोक सराफ, कविता लाड, दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, भक्ती बर्वे, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, राजा गोसावी, रिमा लागू, वंदना गुप्ते, विजय चव्हाण, विक्रम गोखले, शशिकांत निकते, सुरेखा पुणेकर, स्वाती चिटणीस, वगैरे.

सुयोगने रंगमंचावर आणलेली नाटके

  • अप्पा आणि बाप्पा
  • उडुनी जा पाखरा
  • एकदा पहावं करून
  • एका लग्नाची गोष्ट
  • करायला गेलो एक
  • कलम ३०२
  • कशी मी राहू अशी
  • कश्यात काय लफड्यात पाय
  • किरवंत
  • गांधी विरुद्ध गांधी
  • चार दिवस प्रेमाचे
  • जावई माझा भला
  • झालं एकदाचं
  • तरुण तुर्क म्हातारे अर्क
  • ती फुलराणी
  • दिनूच्या सासूबाई राधाबाई
  • निष्पाप
  • प्रीतिसंगम
  • प्रेमा तुझा रंग कसा
  • बे लालना राजा (गुजरा्थी)
  • ब्रह्मचारी
  • भ्रमाचा भोपळा
  • मोरूची मावशी
  • लग्नाची बेडी
  • वा गुरू !
  • व्यक्ती आणि वल्ली
  • श्री तशी सौ
  • श्रीमंत
  • संध्याछाया
  • सुंदर मी होणार
  • हवास मज तू
  • हसत खेळत
  • हीच तर प्रेमाची गंमत आहे

हेही पाहा