सुभाष वसेकर
माहिती
प्राचार्य सुभाष वसेकर हे नांदेड येथील अभिनव चित्रशाळा संस्थेच्या कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य होते. त्यांचे वडील त्र्यंबक वसेकर हे मराठवाड्यातील चित्रकला शिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. आपल्या वडिलांचे कार्य त्यांनी नेटाने पुढे चालू ठेवले. प्राचार्य सुभाष वसेकर यांचा जन्म २३ मार्च १९४९ रोजी वसा (तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) येथे झाला. नांदेडच्या चित्रकला महाविद्यालयातून जी.डी.आर्ट झाल्यानंतर मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी ए. एम. पूर्ण केले. तसेच एम. ए. (राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन) च्या परीक्षेत ते मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम आले होते[१]. बालसाहित्यिक म्हणून त्यांनी विशेष नावलौकिक मिळवला. त्यांच्या 'पऱ्यांची शाळा' या पहिल्याच पुस्तकास १९७६ सालचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला[२]. या पुस्तकास ज्येष्ठ लेखक नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना लाभली होती. याच पुस्तकातील 'पाहुणे' ही कविता बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात (१९७९) समाविष्ट झाली होती [३]. या बालगीताचे युट्युबवर[४] ॲनिमेशन करण्यात आले असून ते आतापर्यंत १० कोटीपेक्षा जास्त वेळा बघितले गेले आहे. उस्फुर्त कल्पना, सहज अवतरणारे यमक आणि अनुप्रास, क्षणार्धात मनाचा ताबा घेणारी लय आणि ताल आणि बालसुलभ मजेशीर शब्दरचना ही वसेकरांच्या बालकवितांची वैशिष्ट्ये .बोध आणि उपदेशांचे ओझे झुगारून मुलांना निखळ आनंद देण्याकडे त्यांचा कल होता.[५] अंबाजोगाई येथे १९९७ मध्ये भरलेल्या पाचव्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले[६]. वसेकर हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि कठोर प्रशासक होते. त्यांची विचारसरणी वस्तुनिष्ठ आणि बुद्धिवादी होती. ३० सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा इच्छेनुसार मृत्यूपश्चात त्यांचे देहदान करण्यात आले.
प्रकाशित पुस्तके
- 'पऱ्यांची शाळा' ,बालकविता, पल्लवी प्रकाशन, १९७४
- 'मोगऱ्यांची फुले', बालकविता, पल्लवी प्रकाशन, १९८८
- 'समुद्रातील राज्यात राजू', बालकथा, साकेत प्रकाशन, १९९७
- 'परीचे अश्रू', बालकथा, साकेत प्रकाशन, १९९७
- 'गाण्यांचे गाव', बालकविता, साकेत प्रकाशन, २००६
- 'शंख शिंपले', बालकविता, मनोविकास प्रकाशन, २०१३
मिळालेले पुरस्कार आणि मानसन्मान
- 'पऱ्यांची शाळा' या पुस्तकासाठी पहिल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रथम पुरस्कार (१९७५ )
- 'पऱ्यांची शाळा' या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार ( १९७५ -७६)
- संतुकराव भोकरे बालसाहित्य पुरस्कार, अंबाजोगाई (१९९८)
- कविवर्य ग.ह. पाटील बालसाहित्य पुरस्कार, परिवर्तन संस्था, औरंगाबाद (१९९९)
- इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात पाहुणे ही कविता समाविष्ट (१९७९)
- 'सुट्टी संपली' हे मासिक गीत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित (१९८०)
- अंबाजोगाई येथे भरलेल्या पाचव्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९९७)
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात 'पऱ्यांची शाळा' ही बालकविता समाविष्ट (२००२ )
- 'शतकातील कविता' या स्नेहल प्रकाशनातर्फे संपादित पुस्तकात 'पऱ्यांची शाळा' या कवितेचा विसाव्या शतकातील निवडक शंभर बालकवितांत समावेश ( २००७)
- किशोर, कुमार, बालवाडी, साधना, मुलांचा श्याम, मराठवाडा आदी प्रतिष्ठित नियतकालिकांत बालसाहित्य प्रकाशित
- 'पऱ्यांची शाळा' या पुस्तकास ज्येष्ठ साहित्यिक नरहर कुरुंदकर यांची मूलगामी प्रस्तावना लाभली. ग.त्र्यं.माडखोलकर, अनंत काणेकर, वा.ल.कुलकर्णी, वा.रा.कांत , भा.रा.भागवत, आनंद यादव, सरिता पदकी या महान साहित्यिकांनी प्रशंसा केली
- धर्मयुग (मुंबई) आणि बालभारती (दिल्ली) या श्रेष्ठ नियतकालिकांत बालकवितांची हिंदी रूपांतरे प्रसिद्ध
- मराठवाडा कला प्रदर्शनात पारितोषिके प्राप्त
- मराठवाडा,हंस,नवयुग,नवनीत या नियतकालिकांत रेखाटने प्रकाशित
संदर्भ :
- ^ दैनिक गोदातीर समाचार, नांदेड, ४ फेब्रुवारी १९८१
- ^ दैनिक महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, १० जून १९७७
- ^ "बालभारती संकेतस्थळ". 2022-12-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-11 रोजी पाहिले.
- ^ "'घरापुढे थांबला टांगा' बालगीत".
- ^ सुभाष वसेकर - 'शंख शिंपले' ( मनोविकास प्रकाशन, २०१३ ) या पुस्तकास दिलेल्या एल. के.कुलकर्णी यांच्या प्रस्तावनेतून
- ^ दैनिक मराठवाडा, औरंगाबाद, ३ मार्च १९९७