Jump to content

सुंठ

सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर घातल्यास रुग्णास थोडा आराम वाटू शकतो. सुंठीची कढी ही अतिसाराच्या विकारावर गुणकारी ठरते.

आले वाळवल्याने सुंठ तयार होते. त्यामुळे आल्यामध्ये असलेले सर्व गुण सुंठेमध्ये असतात. सुंठेत ‘उदरवातहारक' गुण असल्याने जुलाबाच्या (विरेचन) औषधामध्ये ती मिसळतात. पचन संस्थेसाठी सुंठ उपयुक्त आहे. वृद्धावस्थेत पचननिक्रिया साधारणत: मंदावते, पोटात वायू निर्माण होतो, कफप्रकोप होतो, हृदयात धडधड होते, हात-पाय दुखतात. अशा स्थितीत सुंठेचे चूर्ण दुधातून घेणे फायदेशीर असते. कफ आणि वायूच्या सर्व विकारांत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी असते. सुंठेमध्ये अनेक उत्तम गुणधर्म असल्यानेच तिला ‘महौषधी' असे नाव देण्यात आलं आहे. ती पाचक, चवीला तिखट, हलकी, स्निग्ध आणि उष्ण असते. कफ, वायू आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुंठेमुळे दूर होतो.

सुंठ तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. आमटीत-भाजीतही तिचा उपयोग केला जातो, मात्र गोड पदार्थ खास करून चण्याच्या डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थाच्या पाककृती करताना जास्त उपयोग होतो. कोणताही पदार्थ बाधू नये, नीट पचावा, गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून गोड पदार्थात सुंठीची पूड घातली जाते. सुंठीचा वापर ‘पुरणपोळी' आणि ’आमरसात' केला जातो. कारण या दोन्ही पदार्थांमुळे गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हा त्रास टाळण्यासाठी आमरसात आणि पुरणपोळीत सुंठ-तूप घालण्याचा प्रघात आहे. आता केवळ खाद्यपदार्थ शरीराला त्रासदायक होऊ नयेत, म्हणून सुंठीचा वापर केला जात नाही, तर पदार्थाचा दर्जा वाढावा, तो जास्त दिवस टिकावा म्हणूनही सुंठीचा उपयोग केला जातो.

रामबाण सुंठ

  • सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असे औषध आहे.
  • भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे, आमवाताचा नाश करणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते.
  • सुंठेच्या चूर्णात गूळ आणि थोडे तूप टाकून त्याचे तीन-चार तोळ्यांएवढे लहान लाडू बनवतात. ते लाडू रोज सकाळी खाल्ल्याने अपचन तसंच गॅसेसचा त्रास दूर होतो. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दीवरही हे लाडू गुणकारी आहेत. पावसात काम करणाऱ्या शेतकऱ्यासाठी किंवा सतत पाण्यात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुंठीचे लाडू अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर औषध आहे. यामुळे शरीरातली स्फूर्ती आणि शक्ती टिकून राहते.
  • जुन्या सर्दीवरही सुंठेचे पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावे लागते. या उपायात सुंठेचा तुकडा मात्र रोज बदलावा लागतो.
  • 'कावीळ' या आजारातही सुंठेचा उपयोग होतो, मात्र ती गुळाबरोबर खावी लागते.
  • ताकात सुंठेचे चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.
  • सुंठ आणि वावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्याने कृमी नष्ट होतात.
  • आम्लपित्तात सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखरेचे चूर्ण करून ते वरचेवर पितात.

सुंठ : किती महत्त्वाची?

सुंठीला ‘विश्वभेषज’ म्हणजे संपूर्ण जगाचे औषध असे म्हणले आहे. नुसत्या अनुपान भेदानेसुद्धा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगांवर सुंठ उपयोगी पडते. सुंठीचे प्रमुख उपयोग होतो तो पचन संख्येच्या सर्व विकारांवर होय.

पाव चमचा सुंठ पावडर आणि छोटय़ा सुपारीएवढा गुळाचा खडा व ते एकत्र करायला लागेल एवढे घरचे तूप, अशी गोळी करून ती नाश्ता आणि दोन्ही जेवणापूर्वी चावून खाऊन वर कोमट पाणी प्याल्यास भूक न लागणे, अ‍ॅसिडिटी, अपचन, मळमळ, पोट दुखणे, पोट जड होणे, गॅस, पोटात मुरडून संडासला होणे अशा सर्व तक्रारींवर उपयोग होतो. सुंठ घेतल्यावर पित्त होते, हा गैरसमज आहे. सुंठ फक्त चवीला तिखट आहे. ती पचल्यावर तिचे कार्य हे मधुर (गोड) गुणाने होते आणि मधुर रस हा पित्तशामक आहे. सुंठ, बडीशेप व खसखस समभाग पावडर करून तुपावर भाजून या सर्वाच्या एकत्र मिश्रणाएवढी साखर घालून अर्धा ते एक सपाट चमचा, दोन्ही जेवणाअगोदर कोमट पाण्याबरोबर घेतात.. पोटात मुरडून, कळ येऊन, थोडे थोडे पांढरे बुळबुटीत शौचास होणे, थोडय़ाशा निमित्ताने वारंवार पोट बिघडणे, बऱ्याचदा शौचाला गेल्यावर संडासाऐवजी नुसती पांढरी आंव पडणे या सर्वावर या मिश्रणाचा खूप उपयोग होतो. वारंवार ताप येत असेल तर त्याला तांब्याभर पाण्यात एक चमचा सुंठ घालून ते चांगले उकळवून तेच पाणी पिण्यास देतात. गर्भवतीलाही ताप आल्यास कोमट दुधातून सुंठ देतात. एक वाटी खडीसाखरेच्या पाकात एक चमचा भर सुंठ पावडर घालून एक कढ काढून थंड झाल्यावर तो ‘सुंठ पाक’ थोडा थोडा वारंवार चाखाल्यास वारंवार येणारा खोकला किंवा खोकल्याची ढास लगेच थांबते. सुंठ, ज्येष्ठमध व सीतोपला चूर्णही मधातून चाटवल्यास बरम्य़ाच दिवसांचे खोकले बरे होतात. यावरूनच सुंठीवाचून खोकला गेला ही म्हण तयार झाली.

सुंठपाक

सुंठपाक बनवण्यासाठी उत्तम प्रतीच्या सुंठेचे चूर्ण, तूप, गाईचे दूध आणि साखर लागते. आधी सांगितलेले सर्व जिन्नस एकत्र करून त्याचा पाक तयार करतात. सुंठ, मिरे, पिंपळी, दालचिनी, वेलदोडा आणि तमालपत्र या सर्व वस्तू प्रत्येकी चार तोळे घेऊन त्यांचे चूर्ण करून, ते पाकात टाकतात. तयार झालेला पाक काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरतात. या पाकाला ‘सौभाग्य सुंठपाक' किंवा ‘सुंठी रसायन' असे म्हणतात. रसायनगुणाने युक्त असा हा पाक खाल्ल्याने आमवात नाहीसा होतो, शरीराची कांती सुधारते. धातू, बळ आणि आयुष्य वाढते.


संदर्भ