Jump to content

सिद्दी जौहर

सिद्दी जौहर हा अदिलशहाचा सरदार होता. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर पन्हाळा किल्ल्यापर्यंत सर्व मुलुख जिंकुन घेतला. त्यावेळी त्यांना तोंड देण्यासाठी आदिलशहाने याची नेमणुक केली. त्याच्यासोबत अफजलखानाचा मुलगा फाजलखान हा सरदार दिला. सिद्दी जौहर चाळीस हजारांची फौज घेऊन पन्हाळ्याच्या पायथ्याशी आला. त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळा किल्यावर होते. सिद्दीने किल्याला वेढा घातला. सलग चार महिने उन्हापावसाची तमा न करता वेढा चालु होता. सिद्दीने सोबत आणलेल्या तोफांचा मारा किल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हता म्हणून त्याने राजापुरच्या इंग्रजांकडून लांब पल्याच्या तोफा मागवून त्यांचा मारा किल्यावर केला. शेवटी गडावरची शिबंदी संपत आली. राजांनी सिद्दी जौहरच्या हातावर तुरी देऊन गडावरून निसटुन जायचा बेत केला. त्याकरिता शिवा काशिद या शिवाजी राजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने महाराजांचा वेश परिधान करून सिद्दीच्या गोटात जाऊन त्याची दिशाभुल केली. तेवढ्या काळात महाराज पन्हाळ्यावरून सुखरूप निसटले. पावनखिंड येथे बाजीप्रभु देशपांडे यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन राजाची विशाळगडाकडे सुखरूप रवानगी केली. नंतर महाराजांनी आपल्या दुतामार्फत पन्हाळ्यावरील किल्लेदार त्र्यंबकपंत यांना निरोप पाठवून किल्ला सिद्दीच्या स्वाधीन केला. आदिलशाहास सिद्दी जौहर चा संशय येऊन त्याने सिद्दीला विषप्रयोग करून ठार मारले.