Jump to content

सिटी चर्च (पुणे)

इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च ऊर्फ सिटी चर्च हे पुण्यातील एक जुने आणि पहिले चर्च आहे. पूर्व पुण्यातील लक्ष्मी रोडवरील क्वार्टर गेटजवळील ऑर्नेलाज हायस्कूलच्या प्रांगणात हे चर्च आहे.

अटकेपार झेंडे लावणाऱ्या पेशव्यांच्या फौजेत दॉम मनुएल दि'नोव्हो नावाचा एक पोर्तुगीज अधिकारी होता. सैन्यात इतरही ख्रिश्चन सैनिक होते. दि'नोव्होने या सैनिकांची गरज सवाई माधवराव पेशव्यांच्या कानावर घातली. पेशव्यांनी तत्काळ मान्यता देऊन नाना फडणविसांना सांगून पुण्याच्या पूर्व भागातली चार एकर जमीन कॅथॉलिक चर्चसाठी दिली. त्या जागेवर ८ डिसेंबर १७९२ रोजी इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च एका शेडमध्ये सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकाम होऊन ब्रिटिशांच्या काळात १८५२ साली चर्चची दगडी इमारत बांधली गेली.

या चर्चकडून ऑर्नेलाज हायस्कूल ही मुलांची शाळा व मुलीसाठी सेन्ट क्लेअर्स हायस्कूल आणि माऊंट कार्मेल हायस्कूल अशा एकूण तीन शाळा चालवण्यात येतात. त्याशिवाय, हे चर्च अनाथ मुले आणि निराधार महिलांसाठी ईश प्रेम निकेतन नावाची संस्थाही चालवते.

८ डिसेंबर २०१७ रोजी चर्चच्या २२५व्या वर्षपूर्तीनिमित्त मोठा समारंभ झाला. त्यावेळी पेशव्यांचे वारस विनायकराव पेशवे आणि महेंद्र पेशवे यांचा चर्चतर्फे कृतज्ञता सत्कार करण्यात आला.