सिचिल्या
सिचिल्या Sicilia | |||
इटलीचा स्वायत्त प्रदेश | |||
| |||
सिचिल्याचे इटली देशामधील स्थान | |||
देश | इटली | ||
राजधानी | पालेर्मो | ||
क्षेत्रफळ | २५,७११ चौ. किमी (९,९२७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५०,४३,४८० | ||
घनता | १९५.९ /चौ. किमी (५०७ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | IT-82 | ||
संकेतस्थळ | http://www.regione.sicilia.it/ |
सिचिल्या (देवनागरी लेखनभेद : सिसिली; इटालियन: Sicilia; सिसिलियन: Sicilia) हे भूमध्य समुद्रामधील सर्वात मोठे बेट व इटली देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हे बेट इटालियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य दिशेस स्थित असून मेसिनाची सामुद्रधुनी सिचिल्याला इटलीपासून अलग करते. सिचिल्याच्या पूर्व भागातील एटना हा युरोपातील व जगातील सर्वात मोठ्या जागृत ज्वालामुखींपैकी येथील सर्वात ठळक खूण मानली जाते.
इ.स. पूर्व ८००० सालापासून वस्तीच्या खुणा आढललेल्या सिचिल्यावर इ.स. पूर्व ७५० पासून पुढील ६०० वर्षे ग्रीकांचे अधिपत्य होते. त्यापुढील अनेक शतके रोमन प्रजासत्ताक व नंतर रोमन साम्राज्याची येथे सत्ता होती. रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर सिचिल्यावर व्हँडल्स, बायझेंटाईन, खिलाफत, नॉर्मन इत्यादी अनेक साम्राज्यांनी सत्ता गाजवली. इ.स. ११३० साली सिसिलीच्या राजतंत्राची स्थापना झाली. इ.स. १८१६ पर्यंत अस्तित्वात असलेले सिसिलीचे राजतंत्र आरागोनचे साम्राज्य, स्पेन, पवित्र रोमन साम्राज्य ह्या महासत्तांचे मांडलिक राज्य होते. इ.स. १८१६ साली नेपल्सच्या राजतंत्रासोबत सिसिलीने दोन सिसिलींच्या राजतंत्राची निर्मिती केली. १८६१ साली इटलीच्या एकत्रीकरणानंतर सिसिली इटलीचा भाग बनला. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या संविधान बदलामध्ये सिचिल्याला स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला.
सिचिल्याला युरोपाच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. येथील कला, संगीत, वास्तूशास्त्र, भाषा इत्यादींमुळे सिचिल्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. माफिया ह्या गुंड टोळीचा उगम देखील येथेच झाला. सध्या सिचिल्यामध्ये युनेस्कोची पाच जागतिक वारसा स्थाने आहेत.
२०१२ साली ५० लाख लोकसंख्या असलेल्या सिचिल्याची पालेर्मो ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कातानिया, मेसिना, सिराकुझा, गेला ही येथील इतर प्रमुख शहर आहेत.