Jump to content

साहित्याची निर्मितिप्रक्रिया

साहित्याची निर्मितिप्रक्रिया ही साहित्यशास्त्रातील एक संकल्पना आहे. लेखन करताना लेखकाची कोणती मानसिक प्रक्रिया घडून येते याचा अभ्यास यात होतो. कलेच्या निर्मितीतील एक महत्त्वाची चर्चा म्हणून निर्मितिप्रकियेचा विचार मानला जातो. प्राचीन व आधुनिक अशा व भारतीय आणि पाश्चात्त्य अशा दोन्ही काळात व खंडात निर्मितिप्रक्रीयेचा अभ्यास केला जातो. ही परकीय लेखकाला बीज स्फुरते तेथपासून कि लेखक लिहित असतो तेथपासून सुरू होते, या विषयी अभ्यासकांत मदभेद आहेत. त्यामुळे या प्रक्रियेचे स्वरूप गुंतागुंतीचे मानले जाते.साहित्याच्या-आकलना आस्वादासाठी मात्र निर्मितिप्रक्रियेचा अभ्यास उपकारक ठरत असतो.

निर्मितिप्रक्रियेतील घटक

साहित्य निर्मितीची प्रक्रिया उलगडणे सोपे काम नसले तरी त्या प्रक्रियेत कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो त्याचा अभ्यास भारतीय व पाश्चात्त्य साहित्य शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांनी साहित्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घटकांमध्ये प्रतिभा, स्फूर्ती, उत्पेक्षा, कल्पना, भावनात्मकता, व्युत्पन्नता , अभ्यास आणि नवनिर्मिती क्षमता या घटकांचा अंतर्भाव केला आहे.[]

प्रतिभा

ललित साहित्य निर्माण करणारी लेखकाजवळची शक्ति म्हणून प्रतिभेचा नेहमी उल्लेख होतो .एक नवीन अपूर्व विश्व निर्माण करण्याचे तिचे सामर्थ्य लक्षात येत असल्याने आणि त्याच वेळी तिच्या स्वरूपात नेमका अंदाज लागत नसल्यामुळे तिला दीर्घकाळापर्यंत परमेश्वरी देणगी मानण्यात आले. प्रतिभेलाच अलौकिक शक्ती मानले गेले याचे प्रमुख कारण म्हणजे तिचे विरलत्व होय. तिचे अस्तित्व हे सर्वांच्या ठिकाणी नसून फारच थोड्यांच्या ठिकाणी असते. कवीतेतून कवीचे वेगळेपण दाखवले जाते आणि ते ज्यामुळे प्राप्त होते त्या शक्तीला दैवी मानले जाते. प्रसिद्ध इटालियन मानसशास्त्रज्ञ लोंब्रोसा याने प्रतिभेला वेडाची बहीण मानले आहे. शेक्सपिअर यानेही कवी प्रेमिक आणि वेडे यांना एकाच पंक्तीत बसविले आहे. कलेबाबतची प्रतिभा ही सौंदर्याधारित असते. सत्याला सौंदर्य दृष्टीचा स्पर्श लाभलेला असतो. कलानिर्मितीसाठी आवश्यक असणारा अलिप्तपणा आणि व्यक्तीगत अनुभवातील विश्वात्मक आशयाचा शोध या गोष्टी ही प्रतिभेमुळे कवीला शक्य होतात. 

स्फूर्ती

स्फूर्ती ही एक अतिशय उत्कट अशी मानसिक अवस्था होय. ही निर्मितीच्या जाणिवेने संपूर्णपणे भारलेली कवी मनाची अवस्था होय. कलेच्या किंवा काव्याच्या निर्मितीच्या दृष्टीने ही अत्यंत आवश्यक आहे. कवीच्या मनात अनुभवांची झालेली पुनर्रचना त्यांना प्राप्त होत असलेला नवा संदर्भ सहज उद्रेकाने बाहेर पडावा लागतो. त्याला नेमके तोंड फुटण्याच्या दृष्टीने स्फूर्तीचीच आवश्यकता असते. उत्कट भावनांचा सहज उत्स्फुर्त उद्रेक अशी इंग्रज कवी वर्डसुवर्थ या कवीने काव्याची व्याख्या केली आहे. सांगावेसे वाटणे याहून ‘सांगितलेच पाहिजे किंवा सांगितल्याशिवाय राहवत नाही’ अशा मन स्थितीची अपेक्षा कवी बाबत अपेक्षित असते. ही स्फूर्तीचीच स्थिती होय. पण स्फूर्ती ही स्वतंत्र शक्ती नव्हे. क्षणार्धात कवीचे अंतरंग उजळून टाकण्याचे तिच्यात सामर्थ्य जरूर असते. पण ते क्षणार्धापुरतेच लहारीपणा हा तिचा खास विशेष आहे. अनेकदा या स्फूर्तीच्या क्षणी काव्यरचनाही होत नाही.  

उत्प्रेक्षा

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पनांचा स्वेर विहार होय. कोलरिज या इंग्रज कवी आणि समीक्षकांच्या मते, कल्पनाशी केलेली बरीच वैचारिक , चमत्कृती क्रीडा असते . गोविंदग्रजांच्या अरुण या कवीतेत आपणाला क्षणभर खिळविणाऱ्या उत्प्रेक्षण शवतीचा खेळ पाहावयास मिळतो . खटकेबाज शब्दरचना एखादी आकर्षक कल्पना किंवा या दोन्हीही युक्त अशी एखादी चमत्कृती रचना इतपतच मर्यादित असे उत्प्रेक्षण शक्तीचे कार्यक्षेत्र नसते. उत्प्रेक्षा ही क्षणिक टिकणारी असते.

कल्पनाशक्ती

कल्पनाशक्ती ही एक संपूर्ण निसर्गनिर्मिती साधणारी शक्ती होय. कल्पनेत चैतन्याचा किंवा मानवी अंत करणाचा आविष्कार असतो. बालकवींच्या कवीतेत कल्पना शक्तीने साधलेल्या एका अपार विश्वाचे दर्शन घडते . त्यात प्रतिभा आणि आशय यांचे कवीच्या व्यक्तिमत्त्वात मुरून एक जीव झालेले रसायन जाणवते . कल्पना शक्ती म्हणजे नवनिर्मिती साधणारी सर्जनशक्ती होय . ती प्रतिभेचे एक महत्त्वाचे आधारभूत अंग आहे. तिच्या कार्यात धारनाशक्ती आणि स्मरणशक्ती यांनाही महत्त्वाचे स्थान असते . मानवी मनावर नेहमी नानाधी संस्कार होत असतात . ते तसे विस्मुतीतही जात असतात . पण त्यांचा संचय त्यांची धारणा कळत नकळत मानवी मनात होत असते स्मरण शक्तीच्या जोरावर त्यातील अर्थपूर्ण संस्काराची माणूस पुनंनिर्मिती करीत असतो . साहित्यातील त्या जुन्या संस्काराना नवे रूप, नवा संदर्भ लाभत असतो हे कार्य धारण आणि स्मरण या दोन शक्तीच्या साहाय्याने कल्पना शक्ति करते हाच कवीव्यापार होय.

भावनात्मकता

ललित साहित्याच्या निर्मितीत विचारांपेक्षा भावनेवर जास्त भर असतो. कल्पनाशक्तीच्या आधारावर भावानानूभावास गोचर रूप देणे हेच भावनात्मकतेचे साध्य असते.कवी व शास्त्रज्ञ यांच्या ठिकाणी निर्मितीक्षम प्रतिभा एकच असली तरी तिचे कार्य व हेतु वेगळे असतात शास्त्रज्ञाची प्रतिभा विश्लेषणात्मक असते. तर कवीच्या प्रतिभेचा सर्वस्वी भर संश्लेषणावर असतो. या संश्लेषणप्रकियेला भावनेचा स्पर्श असतो.त्यामुळे त्या रचना रसात्मक होतात.अशी रसात्मकता शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधात येऊ शकत नाही . भावनात्मकतेचा एक प्रकार म्हणजे सहानुभाव होय. कवीच्या अंत करणात एका विशाल सहानुभूतीचे अस्तित्व असते. साहित्यात लेखन ,कवीच्या व्यक्तीगत अनुभूती विश्वात्माक व्हाव्या लागतात . त्या कल्पनाशक्ती आणि व्यापक सहानुभाव यांच्या मिळफानेच होऊ शकतात , यांच्या जोरावर मानवी मन आणि व्यवहार यात कवी खोलवर प्रवेश करू शकतो.

व्युत्पन्नता

व्युत्पन्नता पांडित्य अथवा व्यासंग असेही संबोधले जाते . साहित्याच्या निर्मितीमधील हा एक महत्त्वाचा घटक समजला जातो. एखादे नवीन साहित्य निर्माण होण्यापूर्वी लेखकाच्या अथवा कवीच्या मनात व्युत्पत्तीने जन्म घ्यावा लागतो. या उत्पत्तीच्या माध्यमातून लेखक कवी साहित्याला मूर्त रूप देतो. 

अभ्यास

साहित्य निर्मितीमध्ये लेखकाचा अभ्यास या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, साहित्याची नवनिर्मिती करण्यासाठी लेखकाला अथवा कवीला प्रारंभी अभ्यास करावा लागतो. अभ्यासामुळे लेखन सरावाने व सफाईदार पणे होणे ,चांगले-वाईट समजणे अशा गोष्टी होऊ शकतात .या साऱ्या गोष्टीचा लेखक अथवा कवीच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीवर अनुकूल परिणामही होऊ शकतात.

नवनिर्मिती क्षमता

अमूर्ताला साकार करण्याच्या प्रक्रियेला नवनिर्मिती असे म्हणतात. नवनिर्मितीत अनुभवांच्या सूक्ष्म तपशीलातून इष्ट तो भाग निवडून त्याची मांडणी, मिश्रम, एकत्रीकरण, समन्वय, संगती करण्याचा भाग येतो. वेगवेगळ्या अनुभवातील संगती अथवा विसंगती लक्षात घेऊन त्याची नुसती पुनर्रचना करणे म्हणजे नवनिर्मिती नव्हे. नवनिर्मिती हे प्रतिभेचे वैशिष्ट्ये आहे. कवी वास्तवाचे कधीच यथातथ्य चित्रण करीत नसतो. तो वस्तुनिबंधन न करता प्रतिभासनिबंधन करीत असतो. अभिनवगुप्ताने म्हटल्याप्रमाणे तो  अ – पूर्व म्हणजे नूतन वस्तूचीच निर्मिती साधत असतो.

अशाप्रकारे साहित्यात्याच्या निर्मितिप्रक्रियेचे स्वरूप असते.

संदर्भ ग्रंथ :

१. साहित्यविचार, अ. वा. कुलकर्णी, प्रतिमा प्रकाशन पुणे

२. साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या, वसंत पाटणकर, पद्मगंधा प्रकाशन पुणे

३. साहित्याची निर्मितिप्रक्रिया, आनंद यादव, मेहता प्रकाशन, पुणे

डॉ. देवानंद सोनटक्के यांनी बी. ए. ३, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर २२ जुलै, २०१७ रोजी दिलेले व्याख्यान

  1. ^ साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या, वसंत पाटणकर, पद्मगंधा प्रकाशन पुणे