सावकार
सावकार हे बहुधा व्यक्तिगत कर्जे देणाऱ्या लोकांना मिळालेले नाव आहे. सावकाराची काटेकोर अशी व्याख्या नाही. सर्वसाधारणपणे जो इतरांना व्याजाने कर्जाऊ रकमा देण्याचा व्यवसाय करतो व अशा व्यवहारातून नियमितपणे काही उत्पन्न मिळवितो, तो सावकार होय. सावकारांकडून अनेक राजेमहाराजे कर्ज काढीत. बारामतीचे बाबूजी नाईक बारामतीकर, दुर्लभ पितांबरदास महाजन, आदमणे, घोरपडे, सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे, बलवंत रामचंद्र सावरकर, बिवलकर हे पेशव्यांचे सावकार होते.[ संदर्भ हवा ]
स्वरूप
ग्रामीण भागातील धंदेवाईक सावकार लहान रकमेची कर्जे रोख रकमेच्या स्वरूपात देतात. अशी कर्जे केवळ तोंडी वचनावर किंवा हिशेबपुस्तकातील केवळ नोंदीच्या आधारावर आणि बहुधा कोणत्याही करारपत्राशिवाय किंवा साक्षीदाराशिवाय दिली जातात. काही वेळा सावकार भविष्यकाळात हाती येणारे पीक गहाण ठेवून घेऊन म्हणजेच बाजारातील किंमतीपेक्षा अल्प अशा ठरावीक किंमतीला शेतकऱ्यांकडून घेण्याचे त्याच्याकडून कबूल करून घेतात. धंदेवाईक सावकार चालू शेतकी कामासाठी कर्जे देतात. कर्जदार कर्ज कोणत्या कारणासाठी घेतो आणि कर्जाची रक्कम तो कशा रीतीने खर्च करतो याबाबत धंदेवाईक सावकार चौकशी करीत नाहीत. कर्जदाराने कर्जावरील व्याज न भरल्यास सावकार काही काळाने व्याजाची रक्कम मुद्दलात मिळवितात. अशा चक्रवाढ व्याजदरामुळे कर्जदाराच्या मुद्दलात जलद वाढ होत जाते.
सावकार कर्जदारांना गरजेच्या वेळी कर्जे देतात. दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी मुदत वाढवून देण्याची सवलत देतात तसेच तारणाच्या बाबतीतही उदार धोरण अवलंबितात. कर्जावरील व्याज वेळेवर भरले न गेल्यास किंवा कर्जफेड ठरलेल्या वेळी केली न गेल्यास कर्जदारावर खटला दाखल करण्याचेही टाळतात. अशा काही बाबी असल्या तरीही सावकारांकडून कर्ज देण्याचे व्यवहार होताना बऱ्याच वेळा अनिष्ट व घातक व्यवहारपद्धतींचा अवलंब केला जातो. यापैकी काही महत्त्वाच्या व घातक व्यवहारपद्धती अशा -
- व्याजाच्या रकमेची आगाऊ मागणी करणे.
- कर्ज दिल्यानंतर कर्जदाराकडून अनेक प्रकारच्या सेवा विनामूल्य व सक्तीने घेणे.
- प्रत्यक्षात दिलेल्या कर्जापेक्षा अधिक रकमेचे कर्ज दिले अशी नंतर नोंद करण्याच्या हेतूने कर्जदाराकडून कोऱ्या कागदावर अंगठा-निशाणी घेणे.
- कर्जदाराने दिलेल्या व्याजाची किंवा त्याने दिलेल्या कर्जफेडीच्या हप्त्याची रीतसर पावती न देणे.
सावकारांच्या अनिष्ट व्यवहारपद्धतींवर निर्बंध घालून अशा पद्धतींना पायबंद घालण्यासाठी भारतातील बहुतेक घटक राज्यांनी सावकारांच्या नोंदणीसंबंधी व त्यांना सावकारी परवाना आवश्यक करण्यासंबंधी निरनिराळे कायदे केलेले आहेत. योग्य परवाना मिळाल्याशिवाय सावकारी व्यवसाय करणे अशा कायद्यान्वये बेकायदेशीर व शिक्षापात्र ठरविलेले आहे. सावकार परवानाधारक नसतील तर थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्याकडून भरले जाणारे खटले नामंजूर केले जातात.
भारताच्या बहुतेक घटक राज्यातील सावकारीसंबंधीच्या कायद्यांनी अनेक बाबींना प्रतिबंध केलेला आहे. प्रतिबंधित केलेल्या काही महत्त्वाच्या बाबी अशा -
- चक्रवाढ व्याज आकारणे.
- कर्जासाठी करावा लागणारा खर्च भरून काढण्यासाठी कायद्याने मान्य केलेले नाहीत असे आकार(रकमा) लावणे .
- कर्जदारांना धाकदपटशा दाखविणे.
संदर्भ
औरंगाबाद जिल्ह्यातील