Jump to content

साधी घार

साधी घार अथवा काळी घार (इंग्लिश:कॉमन काईट, अथवा परिहा काईट) (शास्त्रीय नाव:Milvus migrans) ही भारतात शहरी भागात सर्वत्र आढळते.

घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी असून घारीचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स असे आहे. घार हा पक्षी हिमालयापासून ते श्रीलंके पर्यंत सर्वत्र आढळतो. भारताव्यतिरिक्त नेपाळ पाकिस्तान आणि बांगलादेशात सुद्धा हा पक्षी आढळतो.

घार ही आकाराने साधारणपणे ५० – ६० सेंमी लांब असते. रंग तपकिरी असून तिचे डोके चपटे व मृत भक्षाचे मांस खाण्यास योग्य अशी टोकदार आणि काळी चोच असते. चोचीच्या बुडाकडील भागाचा रंग पिवळसर असतो. तिचे डोळे आणि पाण्यावरील पिसे तपकिरी असतात. पायाचा रंग सुद्धा पिवळा असून, नखे तीक्ष्ण व काळी असतात. घारीचे पंख लांब आणि टोकदार असून शेपूट लांबट दुभागलेली असते. या दुभागलेल्या शेपटीमुळे आकाशात उडणारी घार पक्षी इतर पक्ष्यांपासून वेगळी ओळखता येते. घार ही एकटी किंवा ४-५ घरींच्या थव्यात भटकत असते.

घार हा पक्षी धीट असून कावळ्याप्रमाणे मानवी वस्तीतील घाण नाहीशी करण्याच्या कामी तिची मदत होते. उघड्यावर फिरणारे बेडूक, साप, पाल, सरडा किंवा उंदीर यांची सुद्धा ती क्षणांत शिकार करते. घार ही कमी उंचीवर तसेच जास्त उंचीवर सुद्धा उडण्यात पटाईत असून उष्ण हवेच्या झोतावर ती पंख न पसरवता आकाशात उडत राहाते.

घारीत नर व मादी दिसण्यात सारखेच असून मादी आकाराने आणि वजनाने नरापेक्षा थोडी मोठी असते. घरींचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत असून, उंच झाडावर काटक्यांचे घरटे बांधले जाते. घरट्यासाठी काड्या, गवत, वायर, दोरा, कापूस, चिंध्या अशा वस्तूंचा वापर केल्या जातो. घारीचे अंडे मातकट-पांढऱ्या रंगाचे असून त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असतात. दोन, तीन किंवा चार या प्रमाणात अंडी घातले जातात. अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर-मादी दोघेही करतात. आकाशात उंच उडत असतानाही तिचे लक्ष पिलांकडे असते. स्थानिक घारींप्रमाणे स्थलांतरित घारीही आढळतात; त्यांच्या पंखाखाली पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात.