Jump to content

सात्यकी

कृष्णशिष्टाईच्या वेळेस सात्यकीला रोखणारा कृष्ण ( राजा रवीवर्मा यांचे अजरामर चित्र)

महाभारतील एक शूर व्यक्तिमत्त्व. सात्यकी हा यादव सैन्यातील एक प्रमुख सेनापती होता व कृष्णाचा परम भक्त व मित्र होता. कृष्णाच्या बरोबर त्याने अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला होता. महाभारताच्या युद्धाआगोदर कृष्ण जेव्हा शांती प्रस्ताव घेउन कौरवांकडे गेला होता, त्यावेळेस सात्यकी कृष्णाबरोबर होता. कृष्णाला बंदीवान बनवण्याची भाषा करणाऱ्या दुर्योधनाला कौरवांच्या सभेतच ठार मारण्यास सात्यकी सरसावला होता. परंतु भीमाच्या प्रतिज्ञेची आठवण करून कृष्णाने त्याला परावृत केले. महाभारतातील युद्धात यादव सैन्य जरी कौरवांच्या बाजूने लढले तरी सात्यकी कृष्णांच्याच बाजूने लढण्यास उत्सुक होता व पांडवाच्या बाजूने लढला. महाभारताच्या युद्धात सात्यकीच्या अनेक लढाईंची वर्णने आहेत. युद्धाच्या १२ व्या ते १४ व्या दिवसापर्यंत द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला बंदी बनवण्याचा विडा उचलला होता व अर्जुनाला दुसऱ्या लढाईत गुंतवले होते त्यावेळेस सात्यकीने द्रोणाचार्यांना युधिष्ठिरापासून दूर ठेवण्यास मोठी भूमिका बजावली होती. या दरम्यान भुवीश्रवस बरोबर झालेल्या युद्धात अर्जुनाने त्याला मदत केली होती.

कौरवांच्या ११ औक्षाहिणी सैन्याची वाताहत करण्यात सात्यकीने मोठी भूमिका बजावली होती. असे मानतात की ११ पैकी ६ औक्षाहिणी सैन्य फक्त भीम अर्जुन व सात्यकी कडून मारले गेले होते. हा आकडा खूप जास्त असला तरी महाभारताच्या लेखकांना सात्यकी महान सैनिक होता असे दर्शवायचे होते.

उरलेल्या पांडव सैन्याची अश्वत्थामाकृतवर्माने वाताहत लावल्यानंतर केवळ पांडव, कृष्ण व सात्यकी एवढेच जण जिवंत राहिले होते.

गांधारीने कृष्णाला सर्व यादव एकमेकांत भांडून नष्ट होतील असा शाप दिला होता. द्वारकेतील मुसळापासून बनलेली दारु पिल्यानंतर सात्यकीने कृतवर्माशी सैन्य झोपेत असताना अश्वथाम्याला हल्ला करण्यास मदत केल्याबद्दल भांडण सुरू केले होते त्याचे पुनर्वसन यादवीत झाले. यादव व द्वारका नष्ट झाली, अश्या प्रकारे सात्यकी गांधारीच्या शापाचा पहिला बळी ठरला.