सातारा
सातारा | |
जिल्हा | सातारा जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ३,२६,७८९ (शहर) (२०११) |
क्षेत्रफळ | १०,४८४ (जिल्हा) कि.मी² |
दूरध्वनी संकेतांक | ०२१६२ |
टपाल संकेतांक | ४१५-००१,४१५-००२ |
वाहन संकेतांक | MH-११ |
संकेतस्थळ | http://www.satara.nic.in |
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
प्रकार | big city | ||
स्थान | सातारा जिल्हा, मराठा साम्राज्य, भारत | ||
अधिकृत भाषा | |||
संस्थापक | |||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. [ संदर्भ हवा ] हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता.
सातारा हे सुंदर शहर आहे.
सांख्यिकी तपशील | |
---|---|
जिल्हा परिषद | सातारा |
तहसील (११) | १.सातारा २. कराड ३.वाई ४. महाबळेश्वर ५. फलटण ६.माण ७. खटाव ८. कोरेगांव ९. पाटण १०. जावळी ११. खंडाळा |
पंचायत समिती (११) | १.सातारा २. कराड ३.वाई ४. महाबळेश्वर ५. फलटण ६.माण ७. खटाव ८. कोरेगांव ९. पाटण १०. जावळी ११. खंडाळा |
तहसील ऑफिसेस (११) | १.सातारा २. कराड ३.वाई ४. महाबळेश्वर ५. फलटण ६.माण ७. खटाव ८. कोरेगांव ९. पाटण १०. जावळी ११. खंडाळा |
नगर पालिका (८) | १.सातारा २. कराड ३. वाई ४. महाबळेश्वर ५. पांचगणी ६. रहिमतपूर ७. फलटण ८. म्हसवड |
नगर पंचायत | 1) (मलकापूर) 2) पाटण 3)कोरेगांव 4) वडूज 5) लोणंद 6) खंडाळा |
टंचाई ग्रस्त तहसील | ४ (कोरेगांव ,खटाव, माण, फलटण ) |
सातारा जिल्ह्यातील नद्या
कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये प्रमुख मदत करणाऱ्या दोन उपनद्या आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते.
इतिहास
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते.
सातारा शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे.
सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी आणि रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.पावसाळ्यात सातारा शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. त्यामुळे मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचे प्रमाण जास्त दिसून येते.
शाहूनगर
● सातारा शहराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. ● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यताऱ्यावर) आपला राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्या वरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसा-तसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. ● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. ● शाहूनगरलाच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्न केले. ● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचा जीवनस्तर उंचावला. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. ● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.
१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो.
२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे.
३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे.
४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे.
५) चारभिंती हुतात्मा स्मारक: या ठिकाणाबद्दल दोन ऐतिहासिक गोष्टी दिसून येतात, पहिली म्हणजे १८३० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या 'चार भिंती'चे बांधकाम केले आणि नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतत्म्यांसाठी येथे कोनशीला बसवलेल्या दिसून येतात. या ठिकाणाला 'नजर बंगला' म्हणून पण ओळखले जाते. आधी या ठिकाणाचे बांधकाम विजया दशमी दिवशी छत्रपतींचे आगमन राजघराण्यातील स्त्रियांना दिसावे यासाठी केले गेले होते नंतर याचे रूपांतर स्मारकात करण्यात आले. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले. २००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो.
साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे.
छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती
पेठा
सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत
- गडकर आळी - साताऱ्यातील सर्वात जुन्या ठिकाणांचा उल्लेख करताना गडकर आळी हे नाव प्रथम घेतले जाते. सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) ही मराठ्यांची चौथी राजधानी समजली जाई. येथे इसवी सन १७५० ते १८०० च्या कालखंडात गडावर देखरेख करणारे गडकरी ज्या ठिकाणी राहत, त्या वस्तीस गडकर आळी या नावाने ओळखले जाते. येथे लोकांच्या दहा ते वीस घरांची जुनी वस्ती आहे. सध्या ह्या वस्तीचा समावेश शाहूपुरी ग्रामपंचायतीत केला जातो.
- रविवार पेठ- गुरुवार पेठेच्या पूर्वेस सातारा शहराच्या सीमेवर ही पेठ वसविली गेली. या पेठेत महाराजांनी लोणार व कुंभार समाजातील लोकांना घरे बांधण्यासाठी जागा दिल्या. या पेठेच्या पूर्वेला साताऱ्याहून माहुली, धामनेर, खिंडवाडी या गावाकडे जाणारे रस्ते होते. छत्रपती शाहू महाराजांनी या पेठेच्या माळावर लोकांना व घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडी रांजण पाण्याने भरून ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या भागास पोवईचा माळ (पाणपोईचा माळ) असे नाव पडले होते. त्यासच सध्या पोवई नाका म्हणतात..
- सोमवार पेठ- शनिवार पेठ व यादोगोपाळ पेठेच्या मध्ये ही पेठ वसविली गेली . वाड्यांच्या बांधकामासाठी तेथील ओढ्याच्या काठावरून दगड काढण्यात आले. तेथे तळे निर्माण झाले . ते सतत वाहत असे. त्यास पूर्वी हमामपुरा तळे असे नाव होते. त्यासच पुढे फुटके तळे हे नाव पडले. या तळ्यातील पाणी सोमवार पेठेतील लोकांना वापरणे सोईचे होते. त्यामुळे त्याचे आसपास सामान्य लोकांनी वस्ती केली. त्या भागास सोमवार पेठ असे नाव दिले गेले येथील पंचपाळी हौद प्रसिद्ध आहे.
- मंगळवार पेठ- ही पेठ सातारा शहराच्या पश्चिमेस माची पेठेशेजारी येते. याच पेठेत श्रीपतराव पंत प्रतिनिधिनीं एक खूप मोठे व खोल तळे बांधले त्यास मंगळवार तळे म्हणतात. इस १७००मध्ये सातारा किल्ल्यावरील मंगळाईचा बुरूज औरंगजेबाच्या बाजूने उडवून देणारे डफळे नावाचे सरदार होते. ते पुढे छत्रपती शाहू महाराजांचे मांडलिक झाले. त्यांनी या पेठेत आपला वाडा बांधला. तसेच छत्रपती शाहू महाराजांची राणी सगुणाबाई यांना मंगळवार तळ्याच्या उत्तरेस महाराजांनी वाडा बांधून दिला व तेथे मोठी बाग तयार करून दिली. त्या बागेस धनिणीची बाग असे नाव पडले कारण सगुणाबाईंना धनीण या नावाने संबोधले जात असे.
- बुधवार पेठ- शनिवार पेठेच्या उत्तरेस ही पेठ वसविली होती. या पेठेतून लिंब गावास जाण्याचा रस्ता होता. या पेठेत शाहू महाराजांनी प्राणी संग्रहालय व अनेक ठिकाणाहून निरनिराळ्या प्रकारची झाडे आणून बाग तयार केली होती. त्याची व्यवस्था पाहणाऱ्या मुसलमान जातीच्या माळी लोकांची वस्ती करण्यात आली होती. या बागेस बुधवार पेठ बाग असे नाव होते.
- गुरुवार पेठ- ही पेठ अगदी सुरुवातीसच माची पेठेच्या उत्तरेस डोंगर उतारावर शाहू महाराजांनी वसविली व कितीतरी लोकांना कौल लावून जागा दिल्या. या पेठेच्या सुरुवातीस तख्ताचा वाडा बांधला होता . त्याच्या आसपास त्यांनी अनेक सरदार व अधिकाऱ्यांना वाडे बांधून दिले. या पेठेस गुरुवार पेठ असे नाव दिले.
- शुक्रवार पेठ- ही पेठ मंगळवार पेठेच्या नजीक आहे . या पेठेत छत्रपतींचे कारभारी सेवक वगैरे लोक राहत असत. ही पेठ त्या वेळी सातारा शहराच्या उत्तर सिमेवर होती . या पेठेत फत्तेसिंह भोसले यांची जागा होती त्या प्रमाणे या पेठेच्या पाणी पुरवठा साठी खूप मोठी बांधीव विहीर बांधण्यात आली. त्या विहीरीस बाजीरावाची विहीर म्हणतात
- राजसपुरा पेठ - शाहू महाराजांना राणी सकवारबाईंपासून राजसबाई या नावाची मुलगी झाली होती . ती अल्पवयात निधन पावली. तिच्या स्मरणार्थ ही पेठ वसविली
- शनिवार पेठ- ही पेठ वसवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः सोमवार पेठ व रविवार पेठेच्या मध्ये अनेक सामान्य लोकांना कौल लावून जागा दिल्या व राजधानीच्या शहराची वस्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले . या पेठेस शनिवार पेठ असे नाव दिले गेले . डोंगर उतारावरून उत्तरेच्या बाजूने ही सर्वात मोठी पेठ वसविली गेली.
- माची पेठ- अजिंक्यतारा किल्ल्याच्या उत्तरेस पूर्व पश्चिम अशी माची भागात ही पेठ वसविली गेली आहे. या पेठेतच रंगमहाल व अदालतवाडा ही निवासस्थाने स्वतःसाठी बांधली.
- मल्हार पेठ
- मेट - छत्रपती शाहू महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून अजिंक्यताराच्या तटाची व रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची जबाबदारी महार जातीच्या लोकांवर होती. तत्कालीन सातारा किल्ल्याच्या तटाच्या डोंगर उतारावर रंगमहाल राजवाड्याच्या पूर्वेस त्यांची वस्ती केली. त्यास मेट असे नाव होते.
- चिमणपुरा पेठ - शाहू महाराजांचे सरदार चिमणाजी दामोदर या खानदेशातील जहागिरदाराने आपला वाडा मंगळवार पेठेच्या पश्चिमेस बांधून ही पेठ वसविली. चिमणाजी दामोदर हे छत्रपती शाहू महाराजांचे राजज्ञ म्हणजेच खाजगी चिटणीस व राजांच्या खाजगी उत्पन्नाचे हिशेबनीस होते. त्यांच्या नावावरून या पेठेस चिमणपुरा पेठ हे नाव दिले गेले
- व्यंकटपुरा पेठ - सन १७३० साली कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शाहू महाराज यांचे दरम्यान वारणेची लढाई झाली. त्या लढाईत इचलकरंजीचे व्यंकटराव घोरपडे यांचा पाडाव झाला. ते शाहू महाराजांचे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे जावई होते. यामुळे महाराजांनी चिमणपुरा पेठ व मंगळवार पेठेच्या शेजारी त्यांना वाडा बांधून सातारा येथे स्थायिक केले. त्या भागास व्यंकटपुरा पेठ हे नाव पडले.
- यादोगोपाळ पेठ- वारणेच्या तहानंतर महाराणी ताराबाई सातारा येथे राहण्यास आल्या. शाहू महाराजांनी त्यांची राहण्याची व्यवस्था अजिंक्यतारा किल्ल्यावरील वाड्यात केली व त्यांच्या मदतीला यादोगोपाळ खटावकर यास नेमून दिले. त्यांनी यादोगोपाळ पेठेची रचना केली व या पेठेत सचिवांचा वाडा व पीलखान्याची बांधणी करून दिली. त्यामुळे मंगळवार पेठ व सोमवार पेठेच्या या मधल्या भागास यादोगोपाळ पेठ असे नाव पडले.
- प्रतापगंज पेठ
- रामाचा गोट - मंगळवार पेठ व चिमणपुरा पेठेच्या मधोमध नागपूरच्या भोसले घराण्यातील रामाऊ भोसले या नावाच्या कर्तबगार स्त्रीने आपला वाडा बांधून सैन्य बाळगले होते. छ शाहू व नागपूरचे भोसले यांचे संबंध निकटचे होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना लढाईचे वेळी मोठे सहकार्य केले होते. त्यामुळे त्या भागास रामाऊचा गोट असे नाव दिले गेले. 'स्त्रीचा आदर करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या,' म्हणून स्त्रीवादी संघटना एकवीसाव्या शतकात एकवटल्या असल्या तरी सातारा येथील छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यातील एका भागास कर्तबगार स्त्रीचे नाव बहाल करून आदर्श निर्माण केला होता . 'रामाऊंचा गोट' असे नाव एका भागाला मिळाले आणि अपभ्रंशाने आज आपण 'रामाचा गोट' या नावाने या परिसरास ओळखतो
- केसरकर पेठ - रविवार पेठ व गुरुवार पेठेच्या मधील भागात शाहू महाराजांचे एकनिष्ठ सेवक जोत्याजी केसरकर यांच्या नावाने ही पेठ वसविली. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्या खाण्यापिण्याची व शिक्षणाची व्यवस्था जोत्याजी केसरकर यांच्याकडे होती. महाराजांनी सातारा येथे छत्रपती पद धारण केल्यानंतर त्यांनी ज्योत्याजी केसरकर यांना बिनीच्या हत्तीवर त्यांच्या जरीपटक्याचा भगवा ध्वज घेऊन बसण्याचा मान दिला होता.
- रघुनाथपुरा पेठ - सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून शाहू महाराजांनी बुधवार पेठ व करंजे येथे जाणाऱ्या मधल्या जागेत आंब्याची बाग तयार केली होती. त्या बागांची व्यवस्था पाहण्यासाठी माळी समाजाची वस्ती केली. त्या पेठेस थोरल्या बाजीरावांचा मुलगा रघुनाथ यांच्या नावावरून त्यास रघुनाथपुरा असे नाव प्राप्त झाले .
- बसप्पा पेठ - बसप्पा नावाचा लिंगायत इसम शाहू महाराजांच्या कोठीवरील अधिकारी होता. तो खूप प्रामाणिक व विश्वासू होता. त्याच्या स्वामिनिष्ठेवर खूष होऊन शाहू महाराजांनी त्याला खूप पैसे बक्षीस दिले. त्या पैशातून त्याने शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याच्या स्मरणार्थ शाहुमहाराजांनी ही पेठ वसविली व तिला बसप्पा पेठ नाव दिले.
- खण आळी - हा भाग बाजारपेठेचा आहे. येथे कापड दुकाने असून खण मिळत असल्याने त्याला हे नाव प्रचलित झाले.जिथे सातार्री पेढे खूप प्रसिद्ध आहेत.
- ढोर गल्ली - चर्मकार समाजासह कातडी कमावण्याचा उदयोग या पेठेत वसला. आज ही पेठ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून काळानुरूप नवीन व्यवसाय नवीन पिढी करत आहे.
उपनगरे
सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत
- शाहूनगर' - अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी गोडोली गावाच्या लगत वसलेल्या वसतीला शाहूनगर म्हणले जाते.
- करंजे' - सातारा शहराच्या स्थापनेपूर्वी हे गाव अस्तित्वात आहे.
- संगम माहुली - सातारा शहरापासून ५.१ कि मी अंतरावर कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम झाला आहे. या पवित्र ठिकाणी छ. शाहू महाराजांच्या हुकुमावरून १७१९मध्ये संगमाच्या पश्चिमेस वेण्णा नदीच्या दक्षिण तीरावर ४० ब्राह्मणांची वसाहत करण्यात आली. या वसाहतीस मौजे खेड पैकी अर्धा चावर जमीन इनाम दिली. पाटखळ गावी ५ बिघे जमीन इनाम दिली. या वसाहतीस संगम माहुली नाव दिले.
- कृष्णानगर
- प्रतापसिंह नगर- साताऱ्याच्या हजेरी मालावर काही झोपड्या होत्या. बस स्थानकाशेजारी हा भाग असून फारच ओंगळवाणे चित्र होते. साताऱ्याचे नगराध्यक्ष प्रतापसिंह राजे भोसले यांनी पुढाकार घेऊन या कुटुंबांचे पुनर्वसन केले. त्या वसाहतीला लोक प्रतापसिंहनगर म्हणू लागले.
'वेण्णानगर
संगमनगर-
- कोयनानगर - हे एक उपनगर आहे.
- शाहूपुरी -सध्या ह्या उपनगरास ग्रामपंचायतीचा दर्जा असून, हे सर्वात मोठे उपनगर समजले जाते.
गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले.(बुधवार नाका ते अाय्.टि.आय् रस्ता तसेच पेढ्याच्या भैरोबा ते महानुभावपंथ मठ या या संपूर्ण परिसरामध्ये पहिली वसाहत ही श्री गुरुप्रसाद कॉलनी या संस्थेची आहे. सदर भागात मोठे असे दत्ताचे मंदिर असून त्यामुळे या भागात दत्तनगर असे म्हणले जाते , त्यानंतर सन १९७२ मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम सुरू झाले. १९७५ मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली. पुढे पुढे यास भागास शाहूपुरी असे काही लोकांनी संबोधन्यास सुरुवात केली. २००० साली या भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले.
- सदरबझार - साताऱ्यातील काही महत्त्वाची ठिकाणे उदा. सैनिक स्कूल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, इ. सदरबझारमध्ये आहेत.
- करंजे
- कर्मवीरनगर
- विलासपूर- सातारा शहरातील ह्या उपनगरास सध्या ग्रामपंचायतीचा दर्जा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा याच भागातून जातो.
- कोडोली- कोडोली गावामध्ये सातारा शहरातील औद्योगिक वसाहत आहे. तसेच कोडोली ग्रामपंचायतही एक मोठे उपनगर आहे.
- तामजाईनगर
- खंडोबामाळ कॉलनी - सातारा शहरापासून ३ किमी. अंतरावर संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्य॓ एका ओसाड माळावर ही कॉलनी वसलेली आहे. कोणतीही पाण्याची सुविधा नसताना येथील लोकांनी पाण्यासाठी खूप हाल सोसले आहेत. या वसाहतीत ?????
शैक्षणिक
सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आहे. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात. यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात. सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे तसेच कराड तालक्यातील मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आहे.
बाह्यदुवे
- हा जिल्हा पर्यटनासाठी अतिशय उपयुक्त असून या जिल्ह्यात अनेक वेगवेगळी पर्यटन स्थळे आहेत.साताऱ्याहून सज्जनगड, कासचे पठार, ठोसेघरचा धबधबा इ. पर्यटनस्थळे अगदी जवळ आहेत. धार्मिक बाबतीत सुद्धा हा जिल्हा अग्रेसर आहे दक्षिण काशी म्हणून श्री शेत्र माऊली या शहराला ओळखले जाते ते सातारा शहरांमध्ये स्थित आहे. चैतन्यमय आणि प्राचीन मंदिर आदिशक्ती मरियम्मा मातेचे मंदिर सातारा जिल्ह्यामधील आर्वी या गावांमध्ये आहे.
खाद्यपदार्थ
सातारी कंदी पेढा साठी प्रसिद्ध आहे.