Jump to content

सागरगड

सागरगड

नावसागरगड
उंची१३५७ फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणअलिबाग रायगड, महाराष्ट्र
जवळचे गावखंडाळे
डोंगररांगसह्याद्री
सध्याची अवस्था
स्थापना



मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदुर्ग. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.

इतिहास : सागरगड हा बहामनी सुलतानांच्या काळात बांधला गेला.इ.स १६६० शिवाजी महाराजांचे सरदार दोरोजी यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदुर्गचा) समावेश होता. आगऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी १६७० ते १६७२ या काळात सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला. १८ ऑक्टोबर १६७९ साली खांदेरीच्या युद्धातील इंग्रज कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेअर सह २५ इंग्रज कैद्यांना सागरगडावर बंदी म्हणून ठेवण्यात आले. संभाजी राजांना मुकर्रब खानाने अटक केल्यावर सागरगडाचा किल्लेदार मानकोजी सूर्यवंशी सागरगड सोडून प्रबळगडाच्या आश्रयास गेला.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिद्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिद्दीकडून किल्ला परत जिंकून घेतला.

छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने शाहूमहाराज व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात १६ किल्ले देण्यात आले. त्यांत सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व येसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगीजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्याच्याकडे आला. मानाजी आंग्रे याने येसाजी आंग्रे याचा सागरगडावरून कडेलोट केला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजीकडून जिंकून घेतला. पुढे येसाजी आंग्रेचा मुलगा जयसिंह आंग्रे याने मानाजी आंग्रेचाही सागरगडावरून कडेलोट केला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व आल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकाऱ्यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.

पोहोचण्याच्या वाटा

गडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई - अलिबाग रस्त्यावरील खंडाळे गावातून आहे. मुंबईहून अलिबागला जाताना कार्ला खिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलिकडे ४ किमी अंतरावर खंडाळे गाव लागते. या गावात (अलिबाग कडे जाताना डाव्या हाताला) जाणारा रस्ता एका डोंगराच्या पायथ्याशी जातो. या डोंगरामागे सागरगड लपलेला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी जाणारी सडक अर्धी कच्ची आहे, त्यामुळे पावसाळा सोडल्यास गाडी पायथ्यापर्यंत नेते येते, डोंगराच्या पायथ्याशी ओढा आहे. ओढा ओलांडल्यावर बांधीव पायऱ्यांची वाट डोंगरावर जाते. उभ्या चढणाची ही वाट अर्धा तास चढल्यावर आपल्याला २ वाटा लागतात. त्यातील उजव्या हाताच्या वाटेने आपण दोन मिनिटांत एका टेपावर येतो. तेथून समोरच दोन टप्प्यात पडणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते. परत मूळ वाटेवर आल्यावर अर्ध्या तासात आपण सिद्धेश्वर मंदिरात येतो.

सिद्धेश्वर मंदिराच्या अलिकडे असलेली वाट डोंगर पठारावरील सागरगड माची गावात अर्ध्या तासात नेते. याच वाटेने गावातून पुढे गेल्यावर व डोंगराला वळसा घातल्यावर सागरगडाची तटबंदी दिसू लागते. अजून अर्ध्या तासात आपण कोसळलेली तटबंदी चढून बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.

सागरगड माची गावातून सागरगडाकडे जाताना ठिकठिकाणी दगडावर बाणांच्या खुणा केल्या आहेत, त्या पाहूनच पुढे जाणे. विशेषतः पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याचा संभव असतो. याशिवाय गडावर पोयनाडहून वाघोलीमार्गे जाता येते. तसेच वडवली गावातून गडावर जाता येते.

गडावरील जेवणाची सोय

जेवणाची सोय गडावर नाही. सिद्धेश्वर मठात चहा मिळू शकतो; पिण्याचे पाणी बाराही महिने आणि मुबलक मिळते.