सह्याद्री
सह्याद्री सह्याद्री | |
पश्चिम घाट | |
देश | भारत |
राज्य | गुजरात , महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक, तामिळनाडू , केरळ |
सर्वोच्च_शिखर | अनाई मुदी शिखर(२६९५ मी.),केरळ |
लांबी | १६०० कि.मी.(महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी-६६० कि.मी.) |
रूंदी | १०० कि.मी. |
क्षेत्रफळ | ६०,००० वर्ग कि.मी. |
प्रकार | बसाल्ट खडक |
सह्याद्री डोंगररांग ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे. |
सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रतटाच्या शेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व [[महाराष्ट्र२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन (६५० कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१]
या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी )महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे. ही खिंड तामिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची उंची सर्वात कमी आहे (३०० मी).
पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैववैविध्य असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. जगात सरीसृपांच्या १८७ पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातील अर्धे केवळ सह्याद्रीवर सापडतात; बेडकांच्या शंभर जातींपैकी ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाऊबंधू आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० येथेच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती केवळ सह्याद्री व श्रीलंकावासी आहेत, आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० अर्वाचीन जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. इथे ५००० पेक्षा अधिक फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]
भौगोलिक रचना
पश्चिम घाट ही डोंगररांग दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४].
गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५]
बसाल्ट खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे. चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक दक्षिणेकडील रांगांमध्ये आढळतात.[६]
शिखरे
उत्तरेला सातपुडा रांगेपासूनसुरू झालेल्या सह्याद्री रांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत. निलगिरी रांग, बिलिगिरिरंगन रांग, सेल्व्हराजन रांग आणि तिरुमला रांग इत्यादी काही छोट्या रांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात. कलसुबाइ हे उच शिखर आहेेे..
काही छोट्या रांगा उदा० कार्डमम रांग व निलगिरी रांग, या तमिळनाडू राज्याच्या वायव्य क्षेत्रात आहेत. निलगिरी रांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या रांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई रांगे मध्ये अनाई मुदी (२त,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी शिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मधोमध गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई रांगांच्या मधे आहे.
पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्र देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.
पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाऊस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्यात स्वरूपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या येथेच उगम पावतात.
नद्या व धबधबे
पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. अन्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इत्यादी नद्या आहेत.
अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण.
पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा , डब्बे धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत.
हवामान
पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मीटरच्यावर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५]
पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मिलिमीटर तर देशावर १००० मिलिमीटर. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या घाट प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५]
जैविक क्षेत्रे
पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीचीजंगले व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात.
केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात.
जैविक सुरक्षा
पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली.
१९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत.
भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडूमधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.[९] केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. भारतात दोन ठिकाणी जैविक वधेता आढळते पहिली पूर्व घाट आणि दुसरा पश्चिम घाट.[१०]
नुकतेच कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्याचे एकत्रीकरण करून नवीन अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
जागतिक वारसा
२००६ साली भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.[११]. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.
- अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणतुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य [१२], पेप्पारा[१३] तसेच शेंदुर्णी[१४] व त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र [१५], थेन्मला, कोन्नी[१६], पुनलुर, तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ[१७] यांचा समावेश आहे.
- पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी, कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
- अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी रांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अभयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
- निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
- तळकावेरी उपक्षेत्र - यामध्ये ब्रह्मगिरी अभयारण्य (१८१.२९ वर्ग कि.मी.), राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी), पुष्पगिरी अभयारण्य (९२.६५ वर्ग कि.मी.), कर्नाटकातील तळकावेरी अभयारण्य (१०५.०१ वर्ग कि.मी.) व केरळमधील आरळम संरक्षित वनक्षेत्र यांचा समावेश आहे.
- कुद्रेमुख उपक्षेत्र - यामध्ये कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान (६००.३२ वर्ग कि.मी.), सोमेश्वर अभयारण्य व आजूबाजूची सोमेश्वरची संरक्षित जंगले तसेच कर्नाटकातील अगुंबे व बलहल्ली येथील जंगले यांचा समावेश आहे.
- सह्याद्री उपक्षेत्र - यामध्ये आंशी राष्ट्रीय उद्यान (३४० वर्ग कि.मी.), चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७ वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य व राधानगरी अभयारण्य यांचा समावेश आहे. याचा भूभाग सांगली व सातारा जिल्ह्यात समाविष्ट होतो.
प्राणिजगत
पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. ही रांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीच्या जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.[१८].
सुंदरबननंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.[१९] कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.
भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.
- सरपटणारे प्राणी:अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. तसेच अनेक विषारी व बिनविषारी पकारचे सरपटणारे प्राणी आढळतात.
पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा अहवाल
गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री, आणि तामिळनाडू - केरळातील निलगिरी व मलयगिरी यांनी बनलेला पश्चिम घाट “राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन” असा रम्य प्रदेश आहे. ह्या डोंगर रांगा म्हणजे दक्षिण भारताचे उदकभांडार आहे. येथून गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी व वैगई यांसारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी, शरावती, नेत्रावती, भरतपुळा, पेरियार अशा अनेक पश्चिमवाहिनी नद्या उगम पावतात. शिवाय ही श्रेणी जैवविविधतेचे एक आगळे भांडार आहे. जोडीलाच इथे विपुल खनिज संपत्ती आहे. हा प्रदेश सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध आहे. साहजिकच, साऱ्या देशाप्रमाणेच इथेही वेगेवेगळे विकास प्रकल्प अधिकाधिक जोमाने राबवले जात आहेत. ह्या प्रदेशाची जीवसंपत्ती व संवेदनाशीलता लक्षात घेऊन भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली चार शासकीय अधिकारी व दहा विशेषज्ञ ह्यांचा पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट गठित केला. ह्या गटापुढे खालील उद्दिष्टे ठेवण्यात आली -
- पश्चिम घाटाच्या परिसराच्या सद्यःस्थितीचे परीक्षण करणे
- पश्चिम घाटातील कोणकोणत्या टापूंना संवेदनशील परिसरक्षेत्रे (Ecologically Sensitive Areas) म्हणून घोषित करणे आवश्यक आहे हे ठरवून अशा टापूंना १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार संवेदनशील परिसरक्षेत्रे म्हणून घोषित करण्याची शिफारस करणे.
- सर्व संबंधित राज्यांतील जनता व शासनांशी सर्वंकष विचार विनिमय करून पश्चिम घाट प्रदेशाचे संरक्षण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याबाबत शिफारसी देणे.
- भारत शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जाहीर केलेल्या पश्चिम घाट प्रदेशातील विवक्षित संवेदनशील परिसरक्षेत्रांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे.
- १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत पश्चिम घाट प्रदेशाच्या परिसराचे सयुक्तिक व्यवस्थापन करण्यासाठी व सर्व संबंधित राज्यांच्या सहकार्याने शाश्वत विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी एक जाणकार लोकांचे पश्चिम घाट परिसर प्राधिकरण स्थापन करण्यासाठी काय पावले उचलावी ह्याबद्दल शिफारस करणे.
- पश्चिम घाटाच्या संदर्भातील इतर काहीही सयुक्तिक पर्यावरणीय अथवा जीवपरिसर संबंधित विषयांबाबत, तसेच कर्नाटकातील गुंड्या व केरळातील अतिरप्पिल्ली जलविद्युत् प्रकल्पांचे, गोव्यातील खाणींचे, तसेच संपूर्ण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे परीक्षण करून सल्ला पुरवणे.[२०]
तज्ज्ञ गटाची कार्यप्रणाली
संपूर्ण पश्चिम घाट प्रदेशासाठी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखणे व तेथील व्यवस्थापन कसे असावे हे सुचवणे ही तज्ज्ञ गटावर सोपवण्यात आलेली मुख्य जबाबदारी होती. अर्थातच तज्ज्ञ गटाच्या कामाच्या संदर्भात १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार १९८९पासून प्रचलित झालेली संवेदनशील परिसरक्षेत्रे ही संकल्पना महत्त्वाची आहे. संवेदनशील परिसरक्षेत्रांचे निकष सुचवण्यासाठी नेमलेल्या प्रणव सेन समितीने परिसर संबंधित माहितीचा एक देशव्यापी संग्रह तातडीने बनवावा अशी शिफारस २००० सालीच केली होती, परंतु २०१०पर्यंत ह्या शिफारसीकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले होते. तेव्हा तज्ज्ञ गटाने पश्चिम घाट प्रदेशासाठी असा माहिती संग्रह बनवणे, आणि मग संवेदनशील परिसरक्षेत्रांच्या स्थल-कालानुरूप व्यवस्थापनाची रूपरेषा आखणे ही कामे हातात घेतली. ह्यासाठी काही मूलभूत संशोधन करण्याची आवश्यकता होती; ते करून शास्त्रीय निष्कर्ष प्रकाशित केले.
सर्व उद्दिष्टे साधण्यासाठी गटाने अनेक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, ठिकठिकाणी खुली चर्चासत्रे आयोजित केली. खाण मालक व व्यवस्थापक, उद्योगपति, शिक्षक, बागायतदार, शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार अशा विविध व्यावसायिकांचा, आणि सर्व संबंधित विषयांतील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री, गोव्याचे आजी व माजी मुख्य मंत्री, केरळ राज्यातील कृषि व वन मंत्री, कर्नाटकातील मंत्री दर्जाचे आयुक्त, सर्व राज्यांतील आमदार व खासदार, जिल्हा परिषदा, तालुक पंचायती व ग्राम पंचायती सदस्य ह्यांच्याशी चर्चा केली. सर्व राज्यांच्या तसेच केन्द्रीय शासनातील वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव व अभिप्राय समजावून घेतले. हे सर्व अत्यंत पारदर्शकतेने केले व वेळोवेळी सर्व इतिवृत्ते अधिकृत संकेतस्थलांवर उपलब्ध करून दिली.
१९८९ साली पहिले संवेदनशील परिसरक्षेत्र जाहीर केले गेले. त्या वेळी ही क्षेत्रे कशी आखावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जावे ह्या संबंधी काहीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नव्हती. २००० साली प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसरक्षेत्रे ठरवावीत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात समृद्ध जैवविविधता, भरपूर पर्जन्यमान, उभे डोंगर उतार व नद्यांचे उगम अशांवर आधारित विविध निकष सुचवले. तथापि प्रणव सेन समितीने अशा संवेदनशील क्षेत्रांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबाबत काहीही मांडणी केली नाही. संवेदनशील परिसरक्षेत्र ही संकल्पना राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित प्रदेशाहून खूप वेगळी आहे. साधारणतः राष्ट्रीय उद्यानासारख्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अपेक्षित नसतो. पण संवेदनशील परिसर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असू शकतो. उदाहरणार्थ, संपूर्ण डहाणू तालुका हा संवेदनशील परिसरक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, आणि चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत. तेव्हा संवेदनशील परिसर क्षेत्रांत पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जिथे जिथे जे जे सयुक्तिक असतील तिथे तिथे ते ते निर्बंध लागू करता येतात, तसेच पर्यावरण पोषक उपक्रमांना खास प्रोत्साहनही देण्यात येऊ शकते. आजतागायत अशी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखताना व तेथील व्यवस्थापनाची मांडणी करताना, स्थानिक जनतेला सहभागी करण्यात आलेले नाही. परंतु पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा ही संकल्पना लोकाभिमुख पद्धतीने - पायाकडून कळसाकडे जात - राबवण्याचा प्रस्ताव आहे. एकूणच संपूर्ण पश्चिम घाट परिसरात पर्यावरण पोषक विकासाची रचना करताना स्थानिक समाजांनी मोलाची भूमिका बजावावी अशी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची कळीची शिफारस आहे.[२१]
पहा :
- महाराष्ट्रातील किल्ले
- महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव
- महाराष्ट्रातील घाटरस्ते
सह्याद्रीविषयक पुस्तके
- आडवाटेवरचा महाराष्ट्र (प्र.के. घाणेकर)
- इतिहास दुर्गांचा (निनाद बेडेकर)
- इये महाराष्ट्र देशी (प्र.के. घाणेकर)
- ओळख किल्ल्यांची - भाग १ (प्र.के. घाणेकर)
- किल्ले (गो.नी. दांडेकर)
- किल्ले पाहू या (प्र.के. घाणेकर)
- कोकणचा मानबिंदू – सिंधुदुर्ग (प्र.के. घाणेकर)
- गड आणि कोट (प्र.के. घाणेकर)
- गड किल्ले गाती जयगाथा (निनाद बेडेकर)
- गडदर्शन (प्र.के. घाणेकर)
- गडसंच (बाबासाहेब पुरंदरे)
- गडांचा राजा - राजगड (प्र.के. घाणेकर)
- जंजिरा (प्र.के. घाणेकर)
- जलदुर्गांच्या सहवासात (प्र.के. घाणेकर)
- डोंगरयात्रा (आनंद पाळंदे)
- दुर्गकथा (निनाद बेडेकर)
- दुर्गदर्शन (गो.नी. दांडेकर)
- दुर्गभ्रमणगाथा (गो.नी. दांडेकर)
- दुर्गवैभव (निनाद बेडेकर)
- दुर्गांच्या देशात (प्र.के. घाणेकर)
- भटकंती, रायगड जिल्ह्याची (प्र.के. घाणेकर)
- महाराष्ट्रातील दुर्ग (निनाद बेडेकर)
- महाराष्ट्रातील लेणी (प्रा. सु.ह. जोशी)
- मैत्री सागरदुर्गांची (प्र.के. घाणेकर)
- लेणी महाराष्ट्राची (डॉ. दाऊद दळवी)
- लेणी महाराष्ट्राची (प्र.के. घाणेकर)
- शिवतीर्थाच्या आख्यायिका (प्र.के. घाणेकर)
- सह्याद्रि-माहात्म्य (रवळोबास)
- सह्याद्री (स.आ. जोगळेकर)
- सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती (ओंकार वर्तले)
- सांगाती सह्याद्रीचा (यंग झिंगारो क्लब)
- सोबत दुर्गांची (प्र.के. घाणेकर)
- सिंहपुच्छ वानर
- भद्रा अभयारण्यातील वाघ
- भारतीय हॉर्नबिल पक्षी
- निलगिरी लाकूड-तोड्या पक्षी
- बंदीपूर राष्ट्रीय उद्यानातील गौर (रानगवा)
- केरळमधील सांबर
- पश्चिम घाटातील चित्ता
- कर्नाटक मधील काळा चित्ता
संदर्भ
- ^ कर्नाटक जंगल खाते (जंगल-सांख्यिकी) [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ "एशिया पॅसिफिक माउंटन नेटवर्क". 2008-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-09 रोजी पाहिले.
- ^ मायर्स, एन., आर. ए. मिट्टरमेयर, सी.जी. मिट्टरमेयर, जी.ए.बी. दा फाँन्सेका, व जे. केंट. (२०००) बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स फॉर कॉन्झर्वेशन प्रायॉरिटीज. नेचर मासिक ४०३:८५३–८५८ मायर्स, एन.
- ^ डेक्कन हेराल्ड ची बातमी[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ a b c "पश्चिमघाटातील जैवविविधता". वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. 2008-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter
|name=
ignored (सहाय्य); External link in|कृती=
(सहाय्य) - ^ "खाणक्षेत्र". भूगोल व खाणकाम विभाग, गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू. 2007-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter
|name=
ignored (सहाय्य); External link in|कृती=
(सहाय्य) - ^ "नद्या व राज्यांप्रमाणे भारतातील धरणे".
- ^ मायकेल ब्राईट, जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्ये, बॅरन्स एज्युकेशनल सीरीज २००५.
- ^ निलगिरी सुरक्षित जैविक क्षेत्र. [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ एलॅमॉन सुरेश(२००६) "केरळमधील ठेवा", यूट्यूब व्हिडियो,केरळमधील ठेवा
- ^ युनेस्को, एमएबी, (२००७) जागतिक वारसा स्थान, तात्पुरती यादी, पश्चिम घाट
- ^ "नेय्यार अभयारण्य". 2007-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-22 रोजी पाहिले.
- ^ "पेप्पारा अभयारण्य". 2007-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-22 रोजी पाहिले.
- ^ "शेंदुर्णी अभयारण्य". 2007-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-22 रोजी पाहिले.
- ^ आचेनकोईल, केरळ
- ^ कोन्नी, केरळ
- ^ अगस्त्यवनम, केरळ
- ^ कर्नाटक जंगल खाते [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ "कर्नाटकमधील वन्य प्राण्यांची संख्या". 2011-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-01-22 रोजी पाहिले.
- ^ https://en.wikipedia.org/wiki/Gadgil_Committee
- ^ http://www.moef.nic.in/downloads/public-information/wg-23052012.pdf
बाह्य दुवे
- सह्याद्री रांगेची चित्रे Archived 2009-04-23 at the Wayback Machine.
- पश्चिम घाटातील खारी Archived 2009-08-15 at the Wayback Machine.
- सह्याद्री मधील किल्ले, देवळे व गुहा
- पश्चिम घाटाची चित्रे Archived 2019-08-16 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील Western Ghats पर्यटन गाईड (इंग्रजी)
- पश्चिम घाटातील नद्या
- सह्याद्री रांगेची चित्रे Archived 2007-11-17 at the Wayback Machine.
- सह्याद्री मधील किल्ले
- सह्याद्री मधील किल्ले, पक्षी प्राणी, फुले व इतर चित्रे Archived 2007-10-09 at the Wayback Machine.