Jump to content

सविता आंबेडकर

सविता आंबेडकर

सविता आंबेडकर, १९४८
टोपणनाव: माई, माईसाहेब, शारदा
जन्म: जानेवारी २७, इ.स. १९०९
मुंबई
मृत्यू: २९ मे, २००३ (वय ९४)
जे.जे. रुग्णालय, मुंबई
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: कृष्णराव कबीर
आई: जानकी
पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. सविता भीमराव आंबेडकर (जन्म : मुंबई, २७ जानेवारी १९०९; - मुंबई, २९ मे २००३) ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.

मराठवाडा नामांतर लढा, व रिडल्स आंदोलन यांमध्ये सविता आंबेडकरांचा सक्रिय सहभाग होता होता. अयोद्या प्रकरणातील जमीन ही बौद्धांची असल्याची याचिका त्यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केली होती. त्यांनी एससी, एसटी व बौद्धांसाठी आरक्षणाची मागणी केली होती. बाबासाहेबांच्या अनेक वस्तू त्यांनी सिम्बायसिय संस्थेला दान केल्या.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

सविता आंबेडकर यांचा जन्म २७ जानेवारी इ.स. १९०९ रोजी मुंबईत एका मराठी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब कबीरपंथी होते.[]. त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील डोर्ले गावातील होते. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली व तीन मुले होती. या एकूण आठ मुलांपैकी ६ भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला. त्यांच्या त्या काळातही पुरोगामी विचारांचा माईसाहेबांना मोठा अभिमान वाटे.

शारदा ह्या विद्यार्थिदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठीची एम.बी.बी.एस ही पदवी मिळवली. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यासनी आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती. या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणिभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधीशी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे एम.डी.च्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले. पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफाॅईड, डिहायड्रेशन, बॉईल्स असे आजार झाले व त्यांचे एम.डी. होणे राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले.

कारकीर्द व आंबेडकरांशी भेट

डॉ. आंबेडकर आणि सौ. डॉ. आंबेडकर

शारदा कबीर यांनी गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केले, नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तेथे इ.स. १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. त्यापूर्वी डॉ. राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती. डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाई आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली.

मुंबईच्या विलेपार्लेमध्ये राहणारे डॉ. एस. राव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच डॉ. शारदा कबीर यादेखील डॉ. राव यांच्या घरी येत जात असत. कारण त्यांच्या मुली आणि शारदा मैत्रिणी होत्या. त्यांच्याच घरी इ.स. १९४७ मध्ये शारदा कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली, त्यावेळी राव यांनी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली.

विवाह

बाबासाहेब व माईसाहेब

आंबेडकर जेव्हा जेव्हा मुंबईला येत तेव्हा ते डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जात. मालवणकरांनी आंबेडकरांना अनेक पथ्ये आणि औषधांबाबत अनेक सूचना दिल्या होत्या. आंबेडकरांना या गोष्टी जमण्यासारख्या नसल्याने डॉ. कबीर यांनी ‘एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना (सौ. आंबेडकरांना) सर्व समजावून सांगेन’, असा सल्ला दिला. डॉ. शारदा कबीर यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नव्हती. पुढे बाबासाहेब आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आले असताना डॉ. कबीर त्यांना पथ्यपाण्याबाबत सांगू लागल्या. अखेर त्यांना बाबासाहेब म्हणाले, ‘अहो पण माझ्या घरात बाईमाणूस नाही, मी अगदी एकटा आहे, हे सर्व कोणाला सांगू?’. त्यावेळी डॉ. शारदा यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले. त्यानंतर दोघांची पुन्हापुन्हा भेट होऊ लागली. डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉ. आंबेडकरांशी त्यांचे नाते घट्ट झाले होते. त्यावेळी ‘कोणी मला माझे बाबासाहेबांशी लग्न होईल, असे सांगितले असते, तर मी ते कधीही मान्य केले नसते’, असे डॉ. माईसाहेब स्पष्टपणे कबूल करतात. मात्र त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी अत्यंतिक आदर आणि सहानुभूती होती.

एकदा इ.स. १९४७ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेब डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर गेले असताना बाबासाहेबांनी शारदा यांना म्हणाले, ‘चला, मी तुम्हाला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे.’ त्यापूर्वीही अनेकदा आंबेडकर आणि शारदा कबीर एकत्र बसून बोलायचे. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या. या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल सविता यांना बरीच सखोल माहिती मिळाली होती. त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला होता. एक दिवस आंबेडकर डॉ. सविता यांना म्हणाले. “माझे सहकारी मला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करत आहेत. पण मला माझ्या आवडीची, योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे. तरीही माझ्या कोट्यवधी बांधवांसाठी मला जगायला हवे. त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवे. त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो.” अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यावर तेव्हा काय उत्तर द्यायचे हे न समजल्याने डॉ. कबीर गप्पच राहिल्या. त्यानंतर डॉ. आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि शारदाही त्यांच्या कामात गुंतल्या. त्या दिवसाबाबतही त्या विसरून गेल्या. पण एक दिवस अचानक शारदा यांना एक पार्सल मिळाले. पार्सलसोबतच्या पत्रात बाबासाहेबांनी डॉ. शारदा यांना मागणी घातली होती. पत्रात लिहिले होते, ‘अर्थात तू तयार असशील तरच. तरी तू विचार करून मला कळव. तुझ्या आणि माझ्या वयांतील फरक आणि माझी प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही’. पत्र वाचल्यानंतर मात्र डॉ. सविता यांना बाबासाहेबांच्या मनातील भावना समजल्या. त्या बाबासाहेबांच्या मोठेपणाने दिपून गेल्या. त्यांच्याबाबत आदर असला तरी त्यांची जीवनसाथी होण्याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. त्यामुळे या विषयावर त्यांच्या मनात बराच खल झाला. एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसा द्यायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होते. अखेर डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्याच दिवशी डॉ. सविता डॉ. मालवणकरांशी या विषयावर बोलण्यासाठी गेल्या. धैर्य एकवटून त्यांनी मालवणकरांना बाबासाहेबांनी लिहिलेले ते पत्र दाखवले. त्यावर क्षणभर विचार करत मालवणकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय तो निर्णय तुम्हीच घ्या. डॉ. मालवणकरांच्या सल्ल्यानंतर डॉ. सविता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या. त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांना विश्वासात घेऊन काय करावे असे विचारले. त्यांना मोठा भाऊ म्हणाला “म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार. अजिबात नकार देऊ नकोस. एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात. ही डॉक्टरीणबाई नकार देते आहे हे कळलं तर तुझी खैर नाही”, असे तो गमतीत बोलला. अखेर रात्रभर विचार करून डॉ. सविता यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला. त्यामागे दोन कारणे होती, एक तर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व सेवा करण्यासाठी त्या प्रवृत्त झाल्या आणि शिवाय त्यांच्या भावनांनीही होकार दिलेला होता. एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही. त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला. कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक काम करता येईल असे त्यांनी ठरवले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांच्या लग्नासाठी १५ एप्रिल १९४८ ही तारीख ठरली. दिल्लीला विवाह उरकणार होता. त्यानंतर मधल्या काळात बाबासाहेब आणि सविता यांच्यात बराच पत्रव्यव्हार झाला. त्यातून त्यांचे नाते अधिकच खुलत गेले. बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉ. मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केले होते. कारण तेव्हा देशात दंगली, तणावाचे वातावरण होते. यावेळी डॉ आंबेडकर दिल्लीच्या १ हार्डिंग्ज ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते. १५ एप्रिलला विमानतळावरून डॉ. शारदा कुटुंबीयांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या. बंगल्यावर जाताच बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली. सर्वांच्या ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या श्री. चित्रे यांच्या सूनबाई शारदा यांना आत घेऊन गेल्या. त्यांनी शारदा यांना साजशृंगार करण्यास मदत केली. रजिस्ट्रार ऑफ मेरेजेसचे अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित होते. मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आणि डॉ. शारदा यांच्या वतीने त्यांचा भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टर साहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली. १५ एप्रिल इ. स. १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होऊन त्या शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या.[] लग्नानंरच त्याचे नाव 'शारदा'चे 'सविता' झाले, परंतु बाबासाहेब आंबेडकर त्यांना 'शारू' (शारदा) असेच म्हणत असत.

धर्मांतर

महास्थवीर चंद्रमणी (डावीकडे) यांच्याकडून बौद्ध धम्म दीक्षा ग्रहन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोबत पत्नी माईसाहेब, वाली सिन्हा व रेवरामजी कवाडे. १४-१०-१९५६
नागपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हातात बुद्ध मुर्ती धरलेल्या डॉ. सविता आंबेडकर, १४ ऑक्टोबर १९५६

अशोक विजयादशमीला (सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता तो दिवस), १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला.[] म्यानमारचे भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रिशरणपंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. माईसाहेब या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

आरोपाचे खंडन

धर्मांतर सोहळ्यानंतर काही आठवड्यातच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब महापरिनिर्वाण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या काही अनुयायांनी सविताबाईंवर त्या ब्राह्मण असल्यामुळे, आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विषप्रयोगाने मारल्याचे आरोप केले. माई आंबेडकर त्यांच्या आत्मकथेत लिहितात, "संपूर्ण समाजात माझ्याविरुद्ध वातावरण तयार व्हावे म्हणून साहेबांच्या मृत्यूबद्दल जाणूनबुजून संशय निर्माण केला गेला. समाजात माझ्याविरोधात जाणीवपूर्वक विष पेरले गेले". माईंविरोधातलं वातावरण अत्यंत चिंताजनक आणि भीतिदायक होतं. त्यांना मारण्यासाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत तीन माणसं पाठवण्यात आली होती. पण या तिघांनाही उपरती झाली आणि माई वाचल्या.[] आंबेडकरांच्या खुनाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली. समितीने माईसाहेब आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले.[]

बाबासाहेबांच्या निधनानंतर संपत्तीवरूनही यशवंत आंबेडकर (बाबासाहेबांचे पुत्र) आणि माईसाहेब यांच्यामध्ये वाद झाला. प्रकरण कोर्टात गेले. कोर्टात यशवंत आंबेडकरांनी सांगितलं की, "माझ्या वडिलांचे दुसरे लग्न झालेच नाही आणि मी एकुलता एक मुलगानी एकमेव वारस आहे, तेव्हा त्यांची सारी इस्टेट मलाच मिळाली पाहिजे." हे ऐकून न्यायाधीश सी. बी. कपूर अस्वस्थ झाले आणि ते संतापून यशवंत आंबेडकरांना म्हणाले, "डॉ. आंबेडकरांचे विवाहबाह्य संबंध होते, असं तुम्ही मला सांगत आहात का? मी त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि मला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे". नंतर न्यायमूर्तीनी आपापसात समेट घडवून आणण्यावर भर दिला आणि संपत्तीचा वाद मिटवला.

बाबासाहेबांच्या निधनानंतर माईंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं, म्हणू तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला. 

बाबासाहेबांच्या काही सहकाऱ्यांनी आणि जवळच्या अनुयायांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. पण दलित पँथरच्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माईंना आदरानं वागवलं, सन्मान दिला. बाबासाहेबांच्या निधनानंतर डॉ. माईसोबत आंबेडकर दिल्लीत मेहरोलीच्या फार्म हाऊसमध्ये राहू लागल्या. दलित पँथरच्या काही लोकांच्या आणि रामदास आठवले, गंगाधर गाडे यांच्यासारख्या काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तरुण सदस्यांच्या आग्रहाने माईसाहेब दलित चळवळीच्या मुख्य प्रवाहात येत होत्या. मात्र वाढत्या वयामुळे व ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना ते फार काळ जमले नाही. "रिडल्स इन हिन्दुइम" पुस्तकाबद्दलच्या आंदोलनात तीने महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना सन्मान मिळाला व दलितांच्या मनात त्यांच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला. जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांच्यावर झालेले आरोप आणि झालेली बदनामी दूर झाली. 

बाबासाहेबांवरील चित्रपट

डॉ. सविता आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्याचा आधार घेऊन आणि माईंच्या सक्रिय मदतीच्या आधारे इ.स. २००० मध्ये जब्बार पटेल यांनी आंबेडकरांच्या आयुष्यावर एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचा इंग्रजी चित्रपट तयार केला आहे.

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘द बुद्ध ॲन्ड हिज् धम्म’ किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेबांनी त्यांना ८ वर्ष अधिक जगविण्याचे श्रेय डॉ. सविता आंबेडकरांना दिले होते. हे पुस्तक बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केले. “ती प्रस्तावना जर छापली असती तर दलित चळवळ डॉ. सविता आंबेडकरांच्या हातात गेली असती, असे दलित नेत्यांना वाटले, त्यामुळे ती प्रस्तावना पुस्तकातून गाळण्यात आली”, असे रावसाहेब कसबे यांचे म्हणणे, त्यांनी त्यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या पुस्तकात मांडले आहे.

लेखन

डॉ. माईसाहेब आंबेडकरांनी ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ हे आत्मचरित्र लिहिले, जे प्रत्येक भारतीय स्त्रीने आणि प्रत्येक बौद्ध व्यक्तींनी वाचावे असे आहे. पुस्तकात बाबासाहेबांप्रती माईसाहेबांचे निस्सीम प्रेम, त्यांचा असीम त्याग, डॉ. बाबासाहेबांना त्यांचे कार्य पूर्ण करता यावे यासाठी त्यांनी बाबासाहेबांच्या आरोग्याची घेतलेली काळजी, हिंदू कोड बिलाच्या मसुद्याकरिता बाबासाहेबांना आवश्यक नोट्स तयार करून देण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, पाली शब्दकोशाचे लेखन करण्यासाठी बाबासाहेबांना नोट्स लिहून देणे अशा अनेक बाबीं नमूद केल्या आहेत. बाबासाहेबांच्या जीवनात माईसाहेबांचे योगदान अनमोल आहे. निवडणुकीतील पराभवाने खचून गेलेल्या बाबासाहेबांना सावरण्यासाठी पत्‍नी म्हणून केलेली धडपड म्हणजे त्यांच्या निस्सीम प्रेमाचे उदाहरण आहे. एवढे सर्व करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आणि आरोपच आले. तरीही मृत्यूपर्यंत त्यांनी याबाबत कधी त्या काही बौद्ध जनतेविरुद्ध तक्रार केली नाही. कोणताही राग मनांत ठेवला नाही. माईसाहेब आंबेडकरांचे बाबासाहेबांच्या जीवनातील स्थान आणि योगदान अतुलनीय आहे.

निधन

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात २९ मे, इ.स. २००३ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. तत्कालीन पंतप्रधान, अटल बिहारी वाजपेयी दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ‘माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या. त्या स्वतःच एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.’[]

प्रेसिडेन्ट डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणाले, सुश्री आंबेडकर समर्पण आणि त्यागाच्या गुणांचे प्रतीक आहेत आणि दिवंगत बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने असताना पददलितांच्या उन्नतीसाठी काम करू शकल्या.

पंतप्रधान अटल बेहरी वाजपेयी म्हणाले की, त्यांच्या मृत्यूमुळे एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरणे कठीण होईल. "आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बाबासाहेबांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला सविताजी प्रेरणा देणारे प्रमुख स्रोत होते.

जर्मनीतील बर्लिन येथील एका संदेशात ते म्हणाले, ती स्वतःच्या अधिकारात एक महान सामाजिक कार्यकर्त्या होती आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीच्या कार्यासाठी समर्पित राहिली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, सुश्री आंबेडकर यांच्या निधनाबद्दल जाणून मला दुःख झाले आहे. ती पुढे म्हणाली, "माईची उपस्थिती आणि मार्गदर्शन, जसे तिला प्रेमाने म्हणले जात होते, सर्वांना खूप चुकवले जाईल." अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्राचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री सत्यनारायण जातिया म्हणाले: ...

माईंच्या नावे योजना

महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याची डॉ. सविता आंबेडकर यांच्या नावाची योजना आखली आहे. या योजनेनुसार अशा दांपत्याला १५ हजार रुपये रोख आणि अपत्यांच्या नावाने बँकेत १ लाख रुपये ठेवले जातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. पती सवर्ण आणि पत्‍नी मागासवर्गीय (अनुसूचित जाती-जमाती किंवा इतर मागासवर्गीय) असेल तर हल्ली न मिळणाऱ्या या प्रकारच्या सवलतीदेखील देण्याचा विचार आहे.

सविता आंबेडकरांवरील पुस्तके

  • डॉ. आंबेडकरांच्या सहवासात - डॉ. सविता आंबेडकर, पहिली आवृत्ती १९९०, चवथी आवृत्ती २०२०, तथागत प्रकाशन व विनिमय पब्लिकेशन 
  • माईसाहेब आंबेडकर - खरं काय खोटं काय ? राजेश कोळंबकर २००३
  • उत्तरार्ध - डॉ. काशिनाथ जांभूळकर, श्रीमंगेश प्रकाशन, नागपूर २००८
  • माईसाहेब (शरू) आंबेडकर - विजय गवारे, सुधीर प्रकाशन वर्धा २०१०
  • माईसाहेबांचे अग्निदिव्य — प्रा. पी.व्ही. सुखदेवे, कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद २०१२
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर : परिनिर्वाण ते धर्मांतर - प्रा. पी.व्ही. सुखदेवे, कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद २०१२
  • महामानवाचे निर्वाण झाले कि घडवले? - विजय गवारे, सुधीर प्रकाशन, वर्धा २०१३
  • डॉ. आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष - विजय सुरवाडे, तथागत प्रकाशन, कल्याण २०१३
  • धम्ममेत्ता : डॉ. माईसाहेब आंबेडकर जन्मशताब्दी विशेषांक, प्रा. पी. व्ही. सुखदेवे, कौशल्य प्रकाशन औरंगाबाद २०१६
  • डॉ. आंबेडकर के संपर्क में - सविता आंबेडकर, सम्यक प्रकाशन दिल्ली, २०१४
  • Great self-sacrific of Maisaheb Ambedkar - Prof. P. V. Sukhdeve, Samyak Prakashan, Delhi 2014
  • डॉ. माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात - वैशाली भालेराव, विनिमय पब्लिकेशन्स, मुंबई
  • बाबासाहेबांची सावली : डॉ. सविता आंबेडकर (माईसाहेब) — लेखिका : प्रा. कीर्तिलता रामभाऊ पेटकर, २०१६
  • महामानवाची संजीवनी - विजय गवारे, विनिमय पब्लिकेशन्स, मुंबई
  • डॉ. माईसाहेब आंबेडकर चरित्र व कार्य - डॉ. धम्मपाल माशाळकर, कौशल्य प्रकाशन औरंगाबाद, २०१८
  • डॉ. बाबासाहेबांच्या उत्तरायुष्यातील जीवनदायिनी - विजय गवारे, सुधीर प्रकाशन, वर्धा, २०१८
  • द ग्लोरी ऑफ सन डॉ. माईसाहेब आंबेडकर - वाल्मिका एलिंजे- अहिरे, २०१९

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Mohandas Namishray मोहनदास नैमिश्यराय (2018-06-21). "डॉ. सविता भीमराव आंबेडकर, जिनके लिए आंबेडकर से महत्वपूर्ण कुछ भी न था". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2022-04-23 रोजी पाहिले.
  2. ^ डॉ. आंबेडकरांच्या सहवासात, लेखिका - डॉ. सविता भीमराव आंबेडकर, विनिमय प्रकाशन, दिव्य मराठी
  3. ^ "डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म". marathibhaskar. 2011-10-06. 2018-03-14 रोजी पाहिले.
  4. ^ "माईसाहेब आंबेडकर यांचं बाबासाहेबांच्या निधनानंतर सुरू झालं 'कसोटीपर्व'". BBC News मराठी. 2021-01-30. 2022-04-23 रोजी पाहिले.
  5. ^ "उपोद्घाताची कथा." 3 डिसें, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "President, PM condole Savita Ambedkar's death". 30 मे, 2003 – www.thehindu.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे