सरकी
कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. कपाशीचे जिनिंग करायच्या धंद्यातील सरकी हे दुय्यम उत्पादन होय. कपाशीच्या एका झाडापासून ०·४५ किगॅ. कापूस मिळाला तर ०·९० किगॅ. सरकी मिळते. जिनिंग कारखान्यातून मिळणारी सरकी पांढुरकी किंवा करडी दिसते. कारण तिच्या पृष्ठभागावर थोडा कापूस शिल्ल्क राहतोच. या कापसाला लिंटर म्हणतात. ‘लिंटर’ काढल्यावर सरकी जवळजवळ काळी दिसते. ती टोकदार, अंडाकार, भिन्न आकारमानाची असून तिच्या लांबीचे प्रमाण ७ ते १०·५ मिमी. असू शकते.
सरकीचे मुख्य घटक लिंटर, फोल, प्रथिन व तेल हे होत. ह्या घटकांचे सापेक्ष प्रमाण पिकाच्या जाती व वाणांप्रमाणे खूपच भिन्न असते. सरकीतील गराचे व फोलाचे सापेक्ष प्रमाण ३७ ते ५४% आणि ३२·३ ते ५२·७% असते. भारतात उपलब्ध होणाऱ्या सरकीचे सामान्यत: दोन प्रकारे वर्गीकरण करतात. एक ‘देशी’ व दुसरा ‘अमेरिकी’ प्रकार होय.
इतर तेलबियांप्रमाणे सरकीतही फॉस्फरससुक्त संयुगे, स्टेरॉल, क्षार आणि अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे आहेत. याशिवाय सरकीत अल्प प्रमाणात पण विशिष्ट गुणधर्मांचे घटक म्हणजे ‘गॉसिपॉल’ नावाचे संयुग आणि कच्च्या सरकी तेलाला गडद रंग देणारी रंगद्रव्ये असतात. गॉसिपॉलचे प्रमाण सुमारे १ टक्का असते.
शतकानुशतके कापसाचा वस्त्रासाठी उपयोग होत असला, तरी सरकीचा मोठ्या प्रमाणावर व्यापारी उपयोग करण्यासंबंधी अलीकडेच विकास झाला आहे. १७९४ मध्ये अमेरिकेत विटने यांनी कापसाच्या जिन यंत्राचा शोध लावल्यावर कापसाचे उत्पादन वाढले. त्यावेळी अमेरिकेत सरकीचा प्रमुख उपयोग (५-१०%) बियाण्यासाठी होत असे व उरलेली सरकी कारखान्याबाहेर ढीग करून ठेवीत किंवा नदीच्या पात्रात टाकून देत; परंतु त्यामुळे आरोग्याला धोका उत्पन्न झाला. त्यामुळे सरकीवर प्रक्रिया करण्याच्या यंत्रसामगीत सुधारणा करण्याचे पद्घतशीर व अखंडपणे प्रयत्न झाले. सरकीच्या उद्योगाच्या विकासाचा इतिहास म्हणजे ह्या उद्योगाचा जवळजवळ समग्र इतिहास होय.
प्राचीन काळी हिंदू व चिनी लोक सरकीचे तेल दिव्यात जाळीत असत व त्याचे औषधी उपयोग करीत. त्यांची तेल काढण्याची पद्घती अविकसित होती. भारतामध्ये ग्रामीण भागात सरकीचे फोल व लिंटर न काढता घाणीने तेल काढीत. हे तेल हलक्या प्रतीचे असते. सरकीचा मुख्य उपयोग म्हणजे दुभत्या जनावरांचे खाद्य म्हणून पूर्वापारपासून चालत आला आहे. सरकी, कोंडा, कडधान्ये व चुणी यांचे मिश्रण तसेच किंवा पाण्यात शिजवून देण्याची पद्घत आहे. सरकीमुळे दुधातील मलईचे प्रमाण वाढते असा अनुभव आहे. १९३० पर्यंत सरकीचा उपयोग खत म्हणूनही मोठ्या प्रमाणावर करीत.
सरकीचे तेल
पाश्चात्त्य पद्घतीने सरकीचे तेल काढण्याचे प्रयत्न भारतात १९३० च्या सुमारास सुरू झाले. तेल व पेंडेला मागणी कमी असल्यामुळे १९६५ पर्यंत सरकी गाळपात फारच हळूहळू प्रगती होत गेली. सतत सरकारी व खाजगी प्रयत्नाने सरकी तेल व पेंड यांचे महत्त्व माहीत झाले. तसेच खाद्य तेलाचा तुटवडा व पशुखाद्याची वाढती मागणी यामुळे सरकी गाळप धंदा खूपच वाढत गेला.
सरकीचे तेल काढण्याची पुढील प्रक्रिया करतात. सरकी साफ करणे, लिंटर काढून टाकणे, फोलापासून गर वेगळा करणे, गराचा चुरा करणे किंवा गर शिजविणे आणि द्रवीय दाबयंत्रांनी तेल काढणे. विद्रावक निष्कर्षण आणि एक्सपेलर-तथा-विद्रावक निष्कर्षण यांचा उपयोग करून तेल काढण्याच्या प्रक्रियाही वापरतात. वीस टक्के तेल असलेल्या सरकीतून एक्सपेलरने १६% तेल निघते. विद्रावक निष्कर्षणाने हे प्रमाण १९·५% पर्यंत जाते. अशुद्घ तेल तांबडे ते गर्द लाल किंवा काळ्या रंगाचे असते व त्याला विशिष्ट वास येतो.
अशुद्घ तेल पंपाने टाकीत पाठवितात व त्यातील गाळ खाली बसू देतात. निवळ तेल ताबडतोब काढून घेऊन गाळून स्वच्छ टाक्यांत भरतात. खाद्य तेलाच्या उत्पादनासाठी अशुद्घ तेलातील मुक्त वसाम्लांचे ४५° से. तापमानाला सौम्य कॉस्टिक सोड्याने उदासिनीकरण करतात. या प्रक्रियेत मुक्त अम्लापासून ‘ सोपस्टॉक ’ तयार होतो. त्यापासून स्वच्छ निवळ तेल वेगळे करून त्याचे विरंजक माती व सकियित कार्बन यांनी विरंजन करतात. ते गाळून त्याचे न्यूनीकृत दाबाखाली सु. १८०° से. तापमानाला बाष्पीय ऊर्ध्वपातन करून सुगंध पदार्थ काढून टाकतात. शुद्घ तेलाचा रंग फिकट पिवळा असून ते जवळ-जवळ वासरहित असते. त्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे असतात : वि. गु. ०·९१६८-०·९१८१ (२५° से.ला ), सॅपोनीकरण मूल्य १९१-१९८, आयोडीन मूल्य १०३-१०५, टायटर ३२-३८ असॅपोनीकारक द्रव्य ०·७-१·५%, तृप्त अम्ले २१-२५% व अतृप्त अम्ले ६९-७४%. शुद्घ तेलात ग्लिसराइडांशिवाय फॉस्फोलिपिने, फायटोस्टेरॉले व रंगद्रव्ये अल्प प्रमाणात असतात. सरकीचे तेल अर्धशुष्कक वर्गातील तेल आहे.
अम्लता, रंग व शुद्घीकरणातील तूट यांवरून कच्च्या तेलाची प्रतवारी करतात. शुद्घ तेलाचे भारतीय अॅगमार्क विनिर्देश पुढीलप्रमाणे आहेत : वि. गु. ०·९१०-०·९२०, प्रणमनांक १·४६४५-१·४६६०, सॅपोनीकरण मूल्य १९०-१९३, आयोडीन मूल्य १०५-११२, अम्ल मूल्य ०·५, असॅपोनीकारक द्रव्य जास्तीतजास्त १·५%. भारतात तेलाचा उपयोग मुख्यत: वनस्पती तूप बनविण्यासाठी होतो [→वनस्पति-१]. हलक्या दर्जाचे तेल साबण उत्पादनासाठी वापरतात. अमेरिकेत प्रक्रिया केलेल्या तेलापैकी बरेच तेल (७२%) लार्ड ( डुकराची चरबी) हिचा पर्याय बनविण्यासाठी, ११% तेल स्वयंपाकात व सॅलड तेल म्हणून, ७% तेल ⇨ मार्गारिनासाठी आणि उरलेला शुद्घ न करता येईल असा भाग साबणासाठी वापरतात. शुद्घ तेलाचे हायड्रोजनीकरण करतात.
http://marathivishwakosh.in/khandas/khand18/index.php?option=com_content&view=article&id=10063