Jump to content

समर्थ वेणाबाई संवाद

नमू वागेश्वरी शारदा सुंदरी |श्रोता प्रश्न करी वक्तयासी ||१||

वक्तयासी पुसे जीव हा कवण |शिष्याचे लक्षण सांगा स्वामी ||२||

सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा |बोलिजे अनात्मा तपो कवण ||३||

कवण प्रपंच कोणे केला संच |मागुता विसंच कोण करी ||४||

कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या |कैसे आहे आद्याचे स्वरूप ||५||

स्वरूप ते माय कैची मूळमाया |ईस चाळावया कोण आहे ||६||

आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य |समाधान अन्य ते कवण ||७||

कवण जन्मला कोणा मृत्यू आला |बद्ध जाला तो कवण ||८||

कवण जाणता कोणाची ही सत्ता |मोक्ष हा तत्त्वता कोण सांगा ||९||

सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण |पंचवीस प्रेष्ण ऐसे केले ||१०||


वरील २५ प्रश्न वेण्णाबाईंनी समर्थांना विचारले व त्यांची उत्तरे समर्थांनी दिली टी अशी :


नमू वेदमाता नमू त्या अनंता |प्रश्न सांगो आता श्रोतयाचे ||१||

श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान |जया सर्व ज्ञान तोचि शिव ||२||

शिवपार आत्मा त्यापर परमात्मा|बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य ||३||

वाच्य हा प्रपंच माईक जाणावा |घडामोडी देवापासूनिया ||४||

विषय अविद्या त्यालावी ते त्या विद्या |निर्विकल्प आद्याचे स्वरूप ||५||

कल्पना हे माया तत्त्व मूळमाया |यासी चाळाया चैतन्यापरी ||६||

नकार ते शून्य व्यापक चैतन्य |ईश्वर अनन्य समाधान ||७||

जीव हा जन्मला जीवा मृत्यू आला |बद्धमुक्त झाला तोचि जीव ||८||

ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता |मोक्ष हा तत्त्वता ईश्वरची ||९||

ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण |हेची ब्रह्मखूण दास म्हणे ||१०|||

दास म्हणे सर्व मायेचे करणे |मिथ्यारूपे जाणे अनुभवे||११||