सदाशिव मार्तंड गर्गे
सदाशिव मार्तंड गर्गे (जन्म : लहुरी-बीड, ४ नोव्हेंबर १९२०; - ४ नोव्हेंबर २००५) हे मराठी पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ होते.
गर्ग्यांना मराठी, फारसी व उर्दू या भाषा येत होत्या. त्यांनी मोडी लिपीही अभ्यासली होती. पेशाने पत्रकार असलेल्या गर्ग्यांनी नागपुरात 'तरुण भारत' आणि पुण्यात 'सकाळ' व 'विशाल सह्याद्री' या वृत्तपत्रांतून २७ वर्षे पत्रकारिता केली.
वैवाहिक जीवन
मूळच्या मराठवाड्यातील अंबेजोगाईच्या असणा्या लीलाताई गर्गे या स.मा. गर्ग्यांच्या पत्नी होत्या. इ.स. २००९ साली लीलाताईंचा मृत्यू झाला.
प्रकाशित साहित्य
'भारतीय समाजविज्ञान कोश' हे गर्ग्यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, शंभराहून जास्त लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला. यांचे खालील साहित्य प्रकाशित झाले आहे :
- आकांक्षा पत्रकारितेची
- इतिहासाची साधने : एक शोधयात्रा
- करवीर रियासत
- गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र
- भारताचा स्वातंत्र्यसंग्राम
- भारतीय समाज विज्ञान कोश (सहा खंड)
- भारतीय समाजविज्ञान कोश : पारिभाषिक शब्दसंग्रह (पुरवणी खंडातील पारिभाषिक शब्द संग्रहासह)
- राज्यशास्त्राचा विकास
- समाजवादी समाजरचना
- समाजविज्ञान आणि संस्कृती
- स्वप्न आणि सत्य
- शांतिपर्वातील कथा
- हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास
संस्थात्मक कार्य
स.मा. गर्गे हे अखिल भारतीय इतिहास अभ्यास परिषदेच्या अध्यक्षपदी काही काळ काम करत होते. 'मराठवाडा मित्रमंडळ' ही संस्थाही त्यांनी स्थापली.
पुरस्कार
- गर्ग्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. त्यांना प्रज्ञावंत पुरस्कारही मिळाला.
- स.मा. गर्गे यांच्या नावाने एखाद्या विशेष विषयावरील ग्रंथाला 'समाजविज्ञान कोषकर्ते गर्गे' नावाचे पारितोषिक दिले जाते. पंकज कालुवाला यांच्या 'राजकीय हत्या' या पुस्तकाला हे पारितोषिक मिळाले आहे.
बाह्य दुवे
- महाराष्ट्र टाइम्समधील लेख Archived 2007-03-11 at the Wayback Machine.