सदाशिवगड
दुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. अठराव्या शतकातील गोव्याच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग असणारा सदाशिवगड सध्या कर्नाटक राज्याचा एक भाग आहे. राज्याच्या दक्षिणेकडील काणकोण तालुक्याच्या पोळे सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर काळी नदीच्या अलीकडच्या काठावर उंच टेकडीवर सदाशिवगड वसला आहे. सदाशिवगड पाहायच्या आधी सदाशिवगडविषयी माझ्या कल्पना वेगळ्या होत्या. परंतु सदाशिवगड पाहिल्यावर माझ्या कल्पनांना धक्काच बसला. सदाशिवगड पाहण्यासाठी आम्ही प्रथम माझे परिचित सुरेश काणकोणकर काकांकडे कारवारला गेलो. तिथे मी त्यांना सदाशिवगड पाहायला आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही कारवारला येताना सदाशिवगडातूनच आलात. तेव्हा मी म्हणले आम्हाला वाटेत सदाशिवगड गाव लागले, पण गड काही दिसला नाही. त्यावर काणकोणकर काका म्हणाले काळी नदी तुम्ही पार करून आलात तेव्हा नदीच्या अलीकडे पुलासाठी जो उंच डोंगर कापला आहे तोच सदाशिवगड. काळी नदीवरील पुलासाठी आणि कारवारच्या विकासासाठी सदाशिवगड शहीद झाला आहे. हे सर्व ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. सदाशिवगडावर जाण्यासाठी काळी नदीच्या पुलाच्या अलीकडे चित्ताकुल नावाचे गाव लागते. या गावातून बेळगावला जाणारा फाटा आहे. या फाट्याला लगेच दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर उजवीकडे छोटा फाटा सदाशिवगडाकडे जातो. या फाट्यावर सदाशिवगडावर जाणारा रस्ता आहे. वाटेत दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर सात मोठ्या तोफा वाटेवर ठेवल्या आहेत. मंदिराच्या बाहेर ब्रिटिश राजचिन्हाचा तुटलेला दगडी भाग ठेवला आहे. मंदिरात सदाशिवगडाविषयी इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरास दोन वेळा भेट दिल्याची नोंद आहे. सदाशिवगड सन १७१७ साली सौंधेकर राजा बसवलिंग यांनी बांधून आपल्या पराक्रमी पित्याचे नाव सदाशिव या गडास दिल्याची नोंद आहे. १७९९ साली ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यावर ब्रिटिश राजचिन्ह या ठिकाणी लावले. दुर्गादेवी देऊळ गडाच्या मध्यास आहे तर खाली भव्य दर्गा आहे. हा दर्गा मध्ययुगात ऍबिसिनियातून आलेल्या एका अवलियाचा आहे.
दुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. समोर काळी नदी आणि समुद्राचा दर्यासंगम, नदीपलीकडे नारळाच्या झाडीत आणि हिरव्यागार डोंगराच्या कुशीत दडलेले कारवार शहर. समुद्रात कूर्मगड. अंजदीव आणि इतर छोटी बेटे दिसतात.
इतिहास
सदाशिवगडचा अठराव्या शतकातला इतिहास फार रंजक आहे. सन १७५० मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर कोंदी-द-ताव्हरने पोर्तुगीज राज्य विस्तारासाठी सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु काही काळाने परत तो सौंधेकरांच्या ताब्यात दिला. सन १७६४ साली हैदर अलीने सौंधेकरांचे राज्य जिंकत सदाशिवगडही मिळविला. सन १७६८ मध्ये पोर्तुगिजांनी हैदरच्या सैन्याकडून सदाशिवगड घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान सौंधेकर राजा पोर्तुगिजांच्या आश्रयास बांदोडा येथे येऊन राहिला. पोर्तुगिजांनी सौंधेकरास हैदर अलीकडून राज्य परत मिळवून देण्याचा करार केला होता. परंतु पोर्तुगीज राज्य परत मिळवून देण्याच्या बाबतीत बराच काळ स्वस्थ बसले. तेव्हा सौंधेकराने पुणे दरबारात पेशव्यांशी पत्र व्यवहार करून राज्य हैदरकडून परत मिळविण्यासाठी विनंती केली. तेव्हा पेशव्यांनी सौंधेकरांस पुण्यास वास्तव्यास येण्याचे कळविले. ही गोष्ट पोर्तुगिजांना कळल्यावर सौंधेकर राजास पुण्यास जाण्यास प्रतिबंध केला आणि पोर्तुगीज देत असलेल्या तनख्यावर कायमस्वरूपी बांदोडा येथेच राहावे, असा करार करून घेतला. हा करार होण्यापूर्वीच पोर्तुगिजांनी टिपू सुलतानच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन सदाशिवगड ताब्यात घेतला. २४ जानेवारी १७९१ रोजी पेशव्यांच्या आरमाराने पोर्तुगिजांकडून किल्ला जिंकून घेतला. पण लगेच ३० जानेवारीस परत पोर्तुगिजांनी ताब्यात घेतला. तेव्हा पुणे दरबारातून पोर्तुगिजांस सदाशिवगड ताब्यात घेतल्याबद्दल समज देण्याविषयी अनेक पत्रे आली. परंतु पोर्तुगिजांनी आपण सौंधेकरांसाठी सदाशिवगड ताब्यात घेतला आहे असे कळवले. पण पोर्तुगिजांना हा किल्ला काही सौंधेकरांना द्यायचा नव्हता. पोर्तुगिजांनी सदाशिवगड ताब्यात घेतल्यापासून पुढे दीड वर्ष पुणे दरबारातून सदाशिवगडाविषयी बरेच राजकारण झाले. पेशव्यांचे सरदार पर शुरामभाऊ पटवर्धन टिपू सुलतान विरुद्धच्या मोहिमेनिमित्ताने कारवार भागात आले होते. तेव्हा त्यांनी आणि काणकोण भागातील देसाई निळू नाईक यांनी पोर्तुगिजांकडे सदाशिवडगडाबाबत बरेच राजकारण केले. परंतु पोर्तुगिजांनी टिपू सुलतानशी स्नेह संबंध वाढवून टिपूस सदाशिवगड देण्याचे ठरविले. तेव्हा परशुराम भाऊंबरोबर पेशव्यांचे आरमार दर्यासारंग बाबूराव साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कारवारजवळच होते. मराठा आरमाराने सदाशिवगडावर हल्ला करत सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु पुढे लवकरच टिपू आणि पेशवे यांच्यात तह झाला. तहाच्या अटीनुसार सदाशिवगड परत टिपूस मिळाला. पुढे लवकरच इंग्रजांनी टिपूचे राज्य जिंकले. त्यात सदाशिवगडही मिळाला. सदाशिवगडाच्या अलीकडे पोळे येथे पोर्तुगिजांची चौकी पोर्तुगीज ब्रिटिश राज्यांची सीमा बनली. वरील सर्व घडामोडींत अठराव्या शतकातील राजकारण किती अस्थिर होते हे कळते. या सर्व राजकारणाचा साक्षीदार सदाशिवगड मात्र फार थोड्या अवशेषांसह शिल्लक आहे.