सदानंद भटकळ
सदानंद भटकळ | |
---|---|
जन्म | सदानंद |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
मालक | पॉप्युलर प्रकाशन |
धर्म | हिंदू |
जोडीदार | निर्मला भटकळ |
सदानंद भटकळ हे एक सामाजिक कार्यकर्ते होते. यांनी सुरू केलेल्या पॉप्युलर प्रकाशन या संस्थेच्या व्यवसायात उतरल्यावर सलग ६३ वर्षे त्यांनी या प्रकाशन संस्थेला आपल्या अथक प्रयत्नाने लौकिक मिळवून दिला. "पॉप्युलर'च्या पुस्तकांचा जागतिक मान्यता होती. ग्रंथ प्रकाशनाच्या व्यवसायात असताना, त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची एम.ए. पदवी घेतल्यावर, ते एलएलबी झाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते सहभागी झाले होते. स्वातंत्र्यानंतर, भारतीय युवकांसमोरच्या समस्यांचा वेध घ्यायसाठी त्यांनी "द फ्यूचर ऑफ इंडियन यूथ', हा ग्रंथ लिहिला होता. उत्तम मांडणी, उत्तम छपाई आणि गाजलेल्या लेखकांचे प्रकाशक म्हणजे "पॉप्युलर' असे समीकरण प्रकाशन व्यवसायात झाले होते.
सदानंद भटकळ यांनी इंग्रजी ग्रंथ प्रकाशनाचा प्रारंभ केला. त्यांनी कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह यांबरोबरच विज्ञान, समाजशास्त्र, या विषयांची पुस्तकेही प्रसिद्ध केली. भटकळ यांनी भारतीय लेखकांकडून वैद्यकीय विषयांवरची पुस्तके लिहून घेऊन ती प्रकाशित केली. प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी, प्रा. सदाशिव घुर्ये, या समाजशास्त्रज्ञांचे संशोधन ग्रंथही पॉप्युलर प्रकाशनने प्रसिद्ध केले आहेत.. पॉप्युलरची सूत्रे स्वीकारल्यावर त्यांनी संपादित केलेल्या "होरायझन' या पुस्तकाला माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची प्रस्तावना होती.
जुन्या प्रसिद्ध लेखकांबरोबरच त्यांनी नव्या लेखकांनाही प्रकाशात आणले. कवी ग्रेस, ना. धों. महानोर यांचे कवितासंग्रह त्यांनीच प्रसिद्ध केले होते. "दि कर्नाटक प्रेस सागा', हा ग्रंथ इंग्रजीत लिहून कर्नाटक प्रेसने केलेल्या राष्ट्रीय कार्याचा त्यांनी मागोवा घेतला. याच पुस्तकाचा उषा टाकळकर यांनी केलेला अनुवाद "गाथा कर्नाटक प्रिंटिंग प्रेसची', पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे.
त्यांचा आणि त्यांच्या पत्नी निर्मला भटकळ यांचा एक कवितासंग्रहही आहे. लेखकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांनी भारतीय पुस्तकांना पहिल्ल्यांदा आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात नेले. जर्मनीतल्या फ्रँकफूटमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात भारतीय पुस्तकांचे दालन उघडायची कल्पना भटकळ यांची होती. इंडियन पब्लिशर अँड बुक सेलर या संस्थेचे ते संस्थापक आणि नंतर पस्तीस वर्षे अध्यक्ष होते. मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी न करता, आपला मृतदेह विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी द्यावा, या त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयाकडे सोपवण्यात आले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.